Manoj Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ काळाच्या पडद्याआड

फायटिंगलाही ॲक्टींग लागते यावर शिक्कामोर्तब!
काही काही योग यावे लागतात आणि ते कधी, कसे, केव्हा, का, कशाला असे एकता कपूरच्या मालिकांप्रमाणे ‘क’च्या बाराखडीत न विचारलेले बरे. उत्तर तरी काय करायचयं? एका पिढीने मनमोहन देसाईंचे मसाला मिक्स मनोरंजक पिक्चर एन्जाॅय करतानाही ते विचारले नाही, एकामागोमाग एक पिक्चर हिट केली आणि आजची पिढी रोहित शेट्टीचे चित्रपट एन्जाॅय करताना विचारत नाही.
तसाच हिंदी चित्रपटातील फायटींगचा (Fighting) रुपेरी पडद्यावरील प्रवास ढिश्यूम ढिश्यूम ते व्हीएफएक्स असा बराच मोठा (आणि दुर्लक्षितही) आहे. लुटूपूटूची मारामारी वाटावी यापासून हवेत हेलिकॉप्टरमधून दुसर्या हेलिकॉप्टरवर महाशस्र चालवले जातेय असा हा प्रवास आहे आणि त्यात एक महत्वाचे वळण आहे, फायटिंगलाही (Fighting) ॲक्टींग लागते याचा जणू साक्षात्कार झालाच…

दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद, गुरुदत्त यांच्या ‘नायकपदा’च्या काळात ‘चित्रपटात फायटिंग’ ही कल्पनाच केली जात नव्हती.(जाॅनी मेरा नामपासून देव आनंदने रुपडं पालटलं, हाती पिस्तूल घेतलं, दिलीपकुमारने ‘विधाता’पासून ते केले.) राजेंद्रकुमार, मनोजकुमार, सुनील दत्त, शम्मी कपूर, प्रदीपकुमार, बलराज साहनी यांच्याही युगात ‘मारामारीच्या वाटेला’ फारसं जाणं नव्हतेच. इतकेच नव्हे तर, सुनील दत्तने आपल्या अजंठा आर्टस या बॅनरखाली मोनी भट्टाचार्य दिग्दर्शित ‘मुझे जीने दो’ (१९६३) या डाकूपटाची निर्मिती करताना डाकूमधलं माणूसपण महत्वाचे मानले. माणूस प्रेम करु शकतो, रागावू शकतो, दु:खी होऊ शकतो. पण मारामारी कशी करेल असाच काहीसा समज होता.
साठच्या दशकात मेन स्ट्रीममधील पिक्चरच्या अगदी शेवटी अर्थात क्लायमॅक्सला फायटिंग सुरु होताच पब्लिक समजायचं पिक्चरचा शेवट जवळ आलाय (उदा. यकीन, मेरे हमदम मेरे दोस्त, हिंमत, आमने सामने, नतिजा, हम सब चोर है, वो कोई और होगा, राॅकी मेरा नाम, रिपोर्टर राजू, प्रायव्हेट डिटेक्टिव्ह, मेरे अपने, व्हीक्टोरिया नंबर २०३ वगैरे. यात काही रहस्यरंजक चित्रपट, कधी स्ट्रीट फायटिंग), आणि दुसरं म्हणजे दारासिंग, रंधवा, शेख मुख्तार यांच्या स्टंटपटात मारामारी असे. उदा. तुफान, लुटेरा, आया तुफान, दो उस्ताद, हम सब उस्ताद है, राका, आंधी तुफान, किंगकाॅन्ग वगैरे. (Fighting)
दारासिंग तर उघड्या निधड्या पिळदार छातीने पडदाभर वावरायचा. ताकदीने मारामारी करायचा. या चित्रपटांचे मेन थिएटर पिला हाऊसमधील ताज, निशात, न्यू रोशन वगैरे असे. आणि या चित्रपटाना मुख्य प्रवाहात स्थान नसे. प्रतिष्ठा नसे. अशातच ओ. पी. रल्हन दिग्दर्शित ‘फूल और पत्थर’ (१९६६) च्या आगमनाच्या पोस्टरवर खाटेवरील आजारी मीनाकुमारीसमोर पिळदार उघड्या छातीतील धर्मेंद्र दिसला आणि तो जणू एक प्रकारचा सांस्कृतिक धक्काच होता. ‘हीच वेळ होती’ मुख्य प्रवाहातील चित्रपटात ॲक्शनला स्कोप मिळू लागला. पिक्चर हिट झाले आणि चित्रपटाच्या जगात ‘यश हेच चलनी नाणे’ हे सत्य असल्याने आता मुख्य प्रवाहातील चित्रपटात थोडी थोडी ॲक्शन वाढू लागली. किमत, द ट्रेन, फर्ज, मेला, राजा जानी, सच्चा झूठा अशा चित्रपटात ती थोडी अधिक दिसली. तरी वाटायचं मारामारी करताना ढिश्यूम ढिश्यूम असे तोंडाने आवाज काढले जाताहेत.
राजेश खन्नाच्या क्रेझमध्ये प्रेमपट आणि आदर्शवादी चित्रपट यांची ज्युबिली हिट चलती. आराधना, दो रास्ते, बहारो के सपने, आनंद, अमर प्रेम, कटी पतंग वगैरे वगैरे.
=======
हे देखील वाचा : रहस्यरंजकतेचे ‘अनहोनी’
=======
या सगळ्याला निर्णायक असा ‘जोर का धक्का धीरे से’ दिला तो सलिम जावेद यांची जबरदस्त बंदिस्त पटकथा व धारदार जोरदार संवाद आणि प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जंजीर’ (रिलीज ११ मे १९७३)ने… जब तक बैठने को ना कहा जाए शराफत से खडे रहो… यह पुलीस स्टेशन है, तुम्हारे बाप का घर नही पोलीस इन्स्पेक्टर विजय खन्ना (अमिताभ बच्चन) लाथेने खुर्ची उडवतो आणि त्याचा असा रुद्रावतार पाहून शेरखान (प्राण) आश्चर्यचकित होतो… थिएटरचे छप्पर उडून जाईल की काय अशा आणि इतक्या उत्फूर्तपणे पब्लिकने या आणि ‘जंजीर’मधील सर्वच धमाकेदार संवादाना टाळ्या वाजवल्या आणि हिंदी चित्रपटातील ॲन्ग्री यंग मॅन जन्माला आला, सूडनायकाचा काळ सुरु झाला आणि अमिताभची ॲक्शन पाहून म्हटलं गेलं, फायटिंगलाही ॲक्टींग लागते याचा उदय झाला. हिंदी चित्रपटाने कात टाकली. रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (रिलीज १५ ऑगस्ट १९७५) यात निर्णायक बळ दिले आणि मुख्य प्रवाहातील चित्रपटात ‘मारधाड’ जणू आवश्यक ठरली. अमिताभ सूडनायक म्हणून लोकप्रिय झाला.
चित्रपटातील हीच फायटिंग (Fighting) आज स्पेशल इफेक्ट्स, व्हीव्हीएस यांनी जमिनीवर अशी कुठेही नेली असली तरी ती प्लॅस्टिकची वाटते. पूर्वीची तडफ, जोश, आव्हान त्यात खरंच दिसते का हो? इतकेच नव्हे पहिल्या दृश्यापासून पिक्चर संपेपर्यंत आधुनिक शस्त्रांनी जीवघेणी फायटिंग (Fighting) असलेल्या चित्रपटात दिग्दर्शक दिसतो काय? दिसत असेल तर ॲक्शन दिग्दर्शक आणि स्पेशल इफेक्ट्सचा कारागीर. फायटिंगमध्येही जान हवी होती. ‘जंजीर ‘पासून आली, अनेक वर्ष होती. अमिताभ शस्त्र खाली ठेव असं म्हणेपर्यंत होती. पण तो थरार आज हरवलायं. सगळं कसं तांत्रिक झालेय. फायटिंगलाही ॲक्टींग लागते हे जन्मले त्याचा आता फ्लॅशबॅक राहिलाय, तो असा.