महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
पन्नास वर्षापूर्वीचा प्रोतिमा बेदीचा ‘बोल्ड’ धमाका!
हा किस्सा १९७४ सालातला आहे. साल मुद्दाम सांगतो आहे कारण त्या काळातील भारतातील परिस्थिती लक्षात यावी. या काळात जगभर स्त्री मुक्तीचा नारा उंचावत होता. भारतात देखील त्याची चाहूल लागली होती. याच काळात एक सेन्सेशनल घटना नियतकालिकाच्या दुनियेत घडली. ज्या घटनेने संपूर्ण देशभर मोठा गहजब निर्माण झाला. कारण या पूर्वी असला प्रकार कधी झाला नव्हता. हा एक ‘सांस्कृतिक धक्का’ होता. ज्येष्ठ पत्रकार रूसी करंजिया त्यावेळी ‘सिनेब्लिटज’ नावाचे नवे सिने मॅगझीन सुरू करणार होते. त्या काळात फिल्मफेअर, माधुरी, स्टार डस्ट या मॅगझीनचा मोठा बोलबाला होता. त्यांना तोडीस तोड असे नवीन मॅगझिन लॉन्च करायचे होते. त्यासाठी त्यांना सेंसेशनल स्टोरी हवी होती. त्यांनी आपल्या कलीगसोबत याबाबत मीटिंग घेतली. त्यात त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना असे सांगितले,” परदेशात ज्याप्रमाणे अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी विवस्त्रावस्थेत फिरून व त्याचे फोटोशूट करून खळबळ उडवून देतात, त्या पद्धतीने भारतात कोणी अभिनेत्री तसा प्रयोग करेल का याचा शोध घ्या. या प्रकारात त्या अभिनेत्रीने संपूर्ण नग्न अवस्थेत सार्वजनिक रस्त्यावरून धावत जायचे आहे!” सहकाऱ्यांना ही बोल्ड आयडिया आवडली. मॅगझिन लॉन्च करण्यासाठी याहून मोठी ब्रेकिंग भन्नाट स्टोरी आणखी कोणती असणार ? रूसी करंजिया यांचा हा मोठा बोल्ड डिसिजन होता. लक्षात घ्या तो १९७४ सालचा भारत देश होता. ज्यावेळी असं काही प्रत्यक्षात करण्यापेक्षा त्याचा विचार करणे देखील एक मोठी गोष्ट होती! यात रिस्क होती. जनक्षोभाला सामोरे जावे लागू शकते, कोर्ट कचेऱ्याची लफडी मागे लागू शकतात याची जाणीव होती. पण त्यांनी ही खेळी खेळायचे ठरवले.
सर्वत्र अशा अभिनेत्रींचा मॉडेलचा शोध घ्यायला सुरुवात झाली. सहजासहजी कुणीही तयार होत नव्हती. कारण त्यावेळी देशातील वातावरण वेगळे होते. रूसी करंजिया यांच्या मुलीने कबीर बेदी यांची पत्नी प्रोतिमा बेदी (Protima Bedi)या शूटला तयार होईल असे सांगितले. तिने प्रोतिमाची भेट घेतली. काही दिवसांच्या विचारानंतर प्रोतिमाने या शूटला होकार दिला. प्रोतिमा खुल्या विचारांची स्वतंत्र विचार शैली असलेली तरुणी होती. ती या फोटोसाठी तयार झाली संपूर्ण टीम कामाला लागली. मुंबईच्या फ्लोरा फाउंटनच्या रस्त्यावर पहाटे या एपिसोडचे शूट झाले. नुकताच सूर्योदय होत असतानाचा अंधुक प्रकाशात प्रतिमा बेदी संपूर्णपणे निर्वस्त्र अवस्थेत या रस्त्यावरून धावत होती. तीन-चार कॅमेऱ्यामधून या सर्व प्रसंगाचे शूट करण्यात आले. प्रोतिमाचा (Protima Bedi) मोठा बोल्ड , धाडसी असा हा निर्णय होता. ज्यावेळी हे फोटो डेव्हलप होऊन प्रोतिमा बेदीकडे आले त्यावेळी तिने त्यातील प्रकाश अंधुक असल्याने हवा तो इफेक्ट मिळत नसल्याचे सांगितले! अशा पद्धतीने हे पहिले फोटोशूट प्रोतिमा बेदी कडूनच रिजेक्ट करण्यात आले. मग लोकेशन बदलण्यासाठी आता जुहू बीचवर प्रोतिमाचे पुन्हा एकदा शूट करण्यात आले. प्रोतिमा (Protima Bedi) जुहू बीच वर पहाटे विवस्त्रावस्थेत धावली! यावेळी मात्र फोटो व्यवस्थित आले होते. प्रोतिमाने या फोटोला ग्रीन सिग्नल दाखवला. अशा पद्धतीने धडाकेबाज पद्धतीने सिनेब्लिटजचा पहिला अंक मार्केटमध्ये आला. या अंकावर अक्षरशः लोकांच्या अक्षरशः उड्या पडल्या. कारण यापूर्वी भारतात मुखपृष्ठावर संपूर्णपणे नग्न अवस्थेत धावणारी अभिनेत्री असा फोटो कधीच आला नव्हता. प्रोतिमा बेदी रातोरात मोठी स्टार बनली संपूर्ण भारतभर हा अंक अक्षरशः ब्लॅकमध्ये विकला गेला!
======
हे देखील वाचा : आशा पारेख का आग्रह करत होत्या स्वतःवरच चित्रित झालेलं गाणं डिलीट करण्याचा?
======
प्रोतिमा बेदी (Protima Bedi) उत्तर भारतातील. पण व्यापाराच्या निमित्ताने तिचे कुटुंब मुंबईत स्थलांतरित झाले. तिचे शिक्षण गोवा, मुंबई आणि पाचगणी येथे झाले. मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेज मधून तिने पदवी प्राप्त केली. साठच्या दशकात एक मॉडेल म्हणून ती प्रचंड लोकप्रिय होती. १९७४ सालच्या ‘न्यूड रन’ मुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. अभिनेता कबीर बेदी सोबत तिने लग्न केले. दोन मुलांच्या नंतर त्यांच्यात घटस्फोट झाला. त्यानंतर प्रोतिमा बेदी (Protima Bedi) हिने ओडिसी नृत्य शैलीमध्ये आपले करियर केले. वैयक्तिक जीवनामध्ये तिला अनेक संकटाना सामोरे जावे लागले. तिच्या मुलाने सिद्धार्थ याने (जो स्क्रिझोफेनिया चा शिकार होता) अमेरिकेत आत्महत्या केली. तिची मुलगी पूजा बेदी हिने बॉलिवूडच्या काही चित्रपटात बोल्ड भूमिका केल्या. प्रोतिमा बेदीचे नाव अनेकांसोबत जोडले गेले. पेज थ्री कल्चरमुळे ती चर्चेत असायची. आयुष्याच्या शेवटी ती मन:शांती साठी हिमालयात गेली. तिचा अंत देखील खूप दर्द्नाक झाला. कैलास मानसरोवरच्या यात्रेला गेलेली असताना भूस्खलनामध्ये तिचे निधन झाले. गंमत पहा तिच्यासोबत मॉडेल म्हणून समांतर कारकीर्द करणारी पर्सिस खंबाटा हिचे देखील त्याच दिवशी म्हणजे १८ ऑगस्ट १९९८ रोजी निधन झाले. दोघींचाही जन्म हा ऑक्टोबर १९४८ चा! हा देखील एक विचित्र योगायोग म्हणावा लागेल.
धनंजय कुलकर्णी