दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
नाटककार पुलंच्या बहुरंगी आठवणी
नाटककार म्हणून पुलंची अनेक नाटकं रंगभूमीवर गाजली. पण खुद्द: पुलंच्या अभिनयाने मराठी रंगभूमीला एकपात्री प्रयोगांतून जे काही देऊ केलं तेही तितकंच कमाल आहे. बटाट्याची चाळ, असा मी असामी हे पुलंचे एकपात्री प्रयोग रंगभूमीवर प्रचंड गाजले. एका व्यक्तीने रंगमंचावर इतकी सारी पात्र एकट्याने उभी करणं सोपं नव्हतं पण लहानपणापासूनचा अनुभव पुलंच्या कामी आला.
लहानपणी पुलंनी “बेबंदशाही” नाटकातील सर्व स्त्रीपात्र काढून एकट्याने प्रयोग केला होता. नरसोबाच्या वाडीला पुलंची सकाळी मुंज झाली.भटजींनी मुंज कशी लावली याचा लागलीच संध्याकाळी एकपात्री प्रयोग घरच्यांसमोर रंगला. तो इतका धमाल होता की,मुंज लावणारे भटजीही स्वत: हसत होते.
या सगळ्या अनुभवांचा निश्चितच पुलंना भविष्यातील एकपात्री प्रयोगात फायदा झाला. पुलंना ‘एकपात्री’ हा शब्द खटकायचा. त्यांच्यामते तो ‘बहुरुपी’ प्रयोग असतो.
हा प्रयोग कठीण ठरतो कारण रंगमंचावर जे काही घडणार ते सगळं त्या नटाला एकट्याच करावं लागतं.विविध पात्रं कशी वागतील,बोलतील हे ठरवावं लागतं. ‘बटाट्याची चाळ’ चा एकपात्री प्रयोग बसवत असताना साडेतीन तासाचं स्क्रीप्ट समोर आरसा ठेवून पुलंनी पाठ केलं होतं. त्यात अनेक पात्रं होती. त्या पात्रांच्या वेड्यावाकड्या हालचाली पुलं खोलीभर हिंडून करत. संध्याकाळी प्रयोग असला की त्या पूर्ण दिवसभरात पुलं कुणालाही भेटायचे नाही. संपूर्ण साडेतीन तासाचं स्क्रीप्ट पुलं अखंड म्हणून घेत. “असा मी असामी” च्या वेळी तर पुलंनी कामशेत गाठलं. तिथल्या माळावर जाऊन उघड्यावर असामीच्या तालमी झाल्या. स्क्रीप्ट व्यवस्थित असली की आत्मविश्वास वाढतो हा पुलंच्या नाट्यसादरीकरणाचा मूलमंत्र होता.
आजकालच्या पिढीला हे कदाचित खूपच आश्चर्यकारक वाटू शकतं पण पुलंची ही मेहनत आणि नाटकावरची निष्ठा खूप काही सांगून जाते.
बटाट्याची चाळ आणि असा मी असामी तुफान चालले असताना,आताच्या भाषेत फुलफॉर्मात असताना पुलंनी ते थांबवण्याचा घेतलेला धाडसी निर्णय तर त्याहीपेक्षा कमाल! तीन साडे तीन तास सलग सादरीकरण करुन पुलं थकून जात आहेत हे त्यांच्या पत्नीच्या सुनीताबाईंच्या ध्यानात आल्यावर त्यांनी पुलंना त्याची व्यवस्थित कल्पना दिली. अभिनेता पुलं थकत गेले तर नाटककार,लेखक पुलंवर त्याचा परिणाम होणार आणि उत्तमोत्तम नाटकं, साहित्य याला वाचक ,रसिक मुकणार हे जाणून प्रचंड गर्दीत आणि आर्थिक फायद्यात चाललेले हे एकपात्री प्रयोग योग्यवेळी थांबवण्याचा सूज्ञ निर्णय पुलंनी घेतला. कलेशी तडजोड होता कामा नये आणि नेमकं कुठे थांबायचं ते कळणं किती जरुरी असतं हे पुलंसारख्या व्यक्तीमत्वाकडे पाहून कळतं. विशेष करुन कामाचा ताण सहन न झाल्याने रंगमंचावरच कायमची एक्झीट घेणारे कलाकार पाहून तर हे अगदी अधोरेखित होतं.