
Punha Ekda Saade Maade 3 Trailer : कुरळे बंधू परतले… आणि यावेळी गोंधळ दुप्पट!
अशोक सराफ, मकरंद अनासपुरे आणि भरत जाधव यांची प्रमुख भूमिका असणारा पुन्हा एकदा साडे माडे ३ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खरं तर कुरळे ब्रदर्सचा मराठीच वेगळाच फॅन फॉलॉईंग आहेच आणि आता त्यांच्याच मनोरंजनासाठी संपूर्ण टीम डबल धमाका घेऊन येणार आहे. आणि यावेळी गोंधळ, गैरसमज आणि धमाल अधिकच वाढलेली दिसतेय! नुकताच प्रदर्शित झालेला ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चा ट्रेलर पाहिला की, एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे हा चित्रपट फक्त हसवणारा नाही, तर शेवटपर्यंत उत्सुकता टिकवून ठेवणारा आहे.
रतन, मदन आणि चंदन यांच्या आयुष्यात ट्रेलरमध्ये सतत काही ना काही विचित्र घडत असतं. कधी परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाते, कधी गैरसमजांचा गुंता वाढतो, तर कधी बबनची खट्याळ एन्ट्री सगळंच गणित बदलून टाकते. वेगवेगळ्या स्वभावांची चार माणसं एकत्र आली की, काय काय घडू शकतं, याची भन्नाट झलक हा ट्रेलर देतो. याच गोंधळात रिंकू राजगुरूची एन्ट्री लक्ष वेधून घेते. ती नेमकी कोण आहे, ती त्यांच्या आयुष्यात का आली आहे आणि तिच्या येण्याने सगळेच इतके अस्वस्थ का झाले आहेत, याचं उत्तर चित्रपटात मिळणार आहे. आता तिची एन्ट्री योगायोग आहे की, एखाद्या मोठ्या वळणाची सुरुवात? हे येत्या ३० जानेवारी २०२६ रोजी स्पष्ट होणार आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणतो, ” ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट म्हणजे निव्वळ विनोद नाही, तर माणसांच्या स्वभावातून, परिस्थितीतून आणि अचानक घडणाऱ्या प्रसंगांतून निर्माण होणाऱ्या गोंधळाची धमाल गोष्ट आहे. ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना जी मजा, गडबड आणि हास्य दिसतंय, त्यापेक्षा अनेक पटींनी मोठा अनुभव चित्रपटात मिळणार आहे. प्रत्येक पात्राची एक वेगळी ओळख आहे आणि ती एकमेकांवर आदळली की, जी मजेशीर साखळी तयार होते, ती मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासारखी आहे. प्रेक्षकांनी थिएटरमध्ये येऊन हा गोंधळ, हा विनोद आणि ही एनर्जी प्रत्यक्ष अनुभवावी.”
================================
================================
अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत रिंकू राजगुरूची भूमिका या गोंधळात नेमकं काय वळण आणते, हे पाहाणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरणार आहे. तसेच संजय नार्वेकर हेसुद्धा पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत. सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी मीडिया उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केले आहे.