पुष्पा..आय हेट टिअर्स! मराठी चित्रपटांसमोर आता नवं आव्हान
जवळपास गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून पुष्पा (Pushpa: The Rise) चित्रपटाचं कौतुक ऐकून होतो. म्हणून अखेर सिनेमा पाहायचं ठरवलं. मुळात अल्लू अर्जून हा माणूस आपल्याला आवडतो. तसे दक्षिणेतले बरेच नट आवडतात. पण अल्लू अर्जून हा नट माझ्या मनात पार आर्या या सिनेमापासून रुतून बसला आहे.
आर्या हा सिनेमा आला होता तेव्हा मी कोल्हापुरात होतो. तिथे व्हिनस थिएटरला हा सिनेमा लागला होता. प्रचंड गर्दीत तो चालला. गंमत अशी की, माझ्या माहितीप्रमाणे तो दक्षिणी भाषेतच लागला होता. तरीही लोक तो सिनेमा पाहात होते. त्यातली गाणी तर कोल्हापुराातल्या गल्लीगल्लीत वाजत होती. “आ आंटे..” हे त्यातलं जबर हिट झालेलं गाणं. हे सगळं सांगण्यामागचा हेतू असा की, अल्लूबद्दल मला तेव्हापासून उगीचंच सॉफ्ट कॉर्नर आहे. अगदी अलिकडे मी त्याला सोशल मीडियावरही फॉलो करू लागलो आहे, जाऊ दे. पण तो आजच्या लेखाचा विषय नाही.
कोल्हापुरात ‘आर्या’ या सिनेमाची जशी चर्चा होती, तशी ती सध्या त्याच्या ‘पुष्पा’ (Pushpa: The Rise) या सिनेमाची आहे आणि आता सध्या ही चर्चा कोल्हापुरापासून पार पुण्या-मुंबईपर्यंत येऊन ठेपली आहे. तर अखेर पुष्पा पाहून झाला. अर्थात या लेखात पुष्पाचं समीक्षण नाहीये. पुष्पा का चालला? त्या सिनेमात काय चूक आहे, काय बरोबर आहे, आदी अनेक गोष्टींवर भरपूर वाद घालता येईल. पण तोही या लेखाचा मुद्दा नाही.
मुद्दा हा आहे की, पुष्पाला जर माझ्या गावात, माझ्या राज्यात इतका तगडा प्रतिसाद मिळत असेल, तर माझ्या सिनेमाला तो का मिळत नाही.? आणि हा विचार मनात आला की मराठी सिनेमाची अवस्था मला आठवते आणि खरंच डोळ्यात फक्त पाणी यायचं राहतं. “बिकॉज, आय हेट टिअर्स!”
पुष्पाच्या यशाने दोन गोष्टी आपल्याला भरभक्कम जाणवून दिल्या आहेत. त्या अशा की, आता दक्षिणी चित्रपटाला आणि चित्रपट निर्मात्यांना महाराष्ट्रातल्या कोपऱ्याकोपऱ्यात पसरलेल्या चित्रपट वेडाची कल्पना आली आहे. ती तशी आली म्हणूनच कधी नव्हे ते पुष्पा एकाचवेळी अनेक भाषांत प्रदर्शित झाला आणि तो पाहिला गेला. आता पुष्पा पाठोपाठ इतर दक्षिणी चित्रपटही महाराष्ट्रात येणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. आता सगळेच सिनेमे काही पुष्पा (Pushpa: The Rise) इतका गल्ला करतील याची खात्री देता येत नाही. पण स्पर्धा होणार हे आलंच.
आधी केवळ हिंदी, इंग्रजी सिनेमांसोबत टक्कर असायची. आता त्यात तामीळ, तेलुगु सिनेमेही येणार आहेत. अशावेळी मराठी चित्रपटांनी, मराठी चित्रपट निर्मात्यांनी आणि एकूणच चित्रपट बनवणाऱ्या सर्वच घटकानी एकत्र येऊन साकल्याने विचार करण्याची गरज आहे. अर्थात, साकल्याने विचार करायचा आहे, तो आपल्या सिनेमाबद्दल. म्हणजे, त्या सिनेमाचं कथानक, पटकथा, संवाद, छायांकन यांच्यासोबत त्याचं बजेट आणि पब्लिसिटीसुद्धा.
एक महत्वाची गोष्ट अशी की, पुष्पा (Pushpa: The Rise) हा सिनेमा मी काही थिएटरमध्ये जाऊन पाहिलेला नव्हता. कारण मला तशी गरज वाटली नव्हती. पण हळूहळू त्याचं लोण इतकं पसरत गेलं की, पुष्पा कसा आहे हे नंतर बघू. पण आधी तो मला पाहायला हवा असं वाटून जाऊ लागलं.
=====
हे देखील वाचा: पाहूया झिम्मा गं …झिम्मा चित्रपट कुठल्याही अन्य भाषिकांनी जरी पाहिला तरी तो त्याला आपला वाटेल
=====
पुष्पा कित्येकांना आवडलेला नाही. हरकत नाही. पण तो सिनेमा खिळवून ठेवतो. त्याक्षणी तो हिप्नोटाईज करतो आणि तुमचे दोन-अडीच तास भूल दिल्यासारखा रंजन करतो. त्याची भूल सिनेमा संपल्यानंतर अवघ्या काही तासांत उतरते. मग त्यातला फोलपणा, त्यातला अतिरंजितपणा, त्यातल्या आतर्क्य गोष्टी समजून आपण तो सिनेमा माशी झटकावा तसा झटकू पाहातो. पण त्या सिनेमानं आपलं काम केलेलं असतं. तुम्हाला तीन तास त्याने गुंतवून ठेवलेलं असतं. इतकं होऊन, त्यातल्या व्यक्तिरेखांच्या प्रेमात तुम्ही असताच. मग तो पुष्पा असो किंवा शेखावत किंवा अगदी कटलेट. तसं होतं, कारण, अनेकदा तो सिनेमा आपल्याला चकित करतो. गंमत आणतो. त्यातल्या सर्वच कलाकारांनी या सिनेमाला कमालीचं सीरिअसली घेतलेलं असतं.
आता या तुलनेत आपला मराठी सिनेमा कुठं आहे, हे तपासून पाहायची वेळ आली आहे. हे अगदीच मान्य आहे की, आपला सिनेमा काही दक्षिणी सिनेमासारखा नाही. आपला सिनेमा हिंदीसारखाही नाही. ना तो भोजपुरी सिनेमासारखा आहे. कधीमधी बंगाली सिनेमासारखा वाटतो तो, पण क्वचित. पण आपला सिनेमा नक्की कसा आहे, हे आपण ठरवायची गरज आहे. अर्थात सिनेमा म्हणजे काही छाप नाही.
सगळ्यात महत्वाची बाब अशी की, सिनेमाचा विषय आणि त्याची पब्लिसिटी अशी व्हायला हवी की, मला तो सिनेमा पाहायला हवा असं वाटायला हवं. नव्या मराठी सिनेमाची सुरूवात इथून करायची गरज आहे. पुढचा काळ फारच स्पर्धेचा असणार आहे. त्यात राज्यात मराठीची अवस्था अशी की, पाट्या मराठीत करा अशी सक्ती केली तरी त्या निर्णयावर चार दिशांनी चर्चा होते. मग, मराठी बोलणं तर फार दूर. अशावेळी सिनेमा हे माध्यम मराठी मनावर जादू करू शकतं. पण आपण ते आणखी गांभीर्यानं घ्यायला हवं. काळ मोठा कठीण होऊन बसणार आहे.
=====
हे देखील वाचा: ‘83’ चित्रपटाच्या निमित्ताने
=====
पुष्पा (Pushpa: The Rise) पाहून झाल्यानंतर माझ्याही मराठी मनाला वाटून गेलं की, आपला सिनेमा असा धो धो चालायला हवा. म्हणून मी आगामी सिनेमावर नजर टाकायची ठरवली. यात काही सिनेमे मला नजरेला पडले.
‘झोंबिवली’ हा तर आत्ताच प्रदर्शित झाला आहे. शिवाय, फास, लोच्या झाला रे, लॉ ऑफ लव, सोयरिक, पांघरूण, का रे देवा, मजनू, पावनखिंड अशी काही नावं नजरेस पडली. यातले कुठले सिनेमे मी पाहायलाच हवेत असा प्रश्न मनात केला तेव्हा माझ्या मनात दोन सिनेमांची नावं आली. आता तुमच्या तीन येतील किंवा एकही येणार नाही. असं होऊच शकतं. पण ज्यावेळी येणारे सगळे सिनेमे पाहायलाच हवेत असं माझ्या मनात येईल अशी तयारी चित्रपटकर्त्याने करणं आवश्यक बनलं आहे.
यापूर्वी आलेल्या झिम्मा आणि पांडू या दोन्ही सिनेमांनी क्लास आणि मास यांना सिनेमाघरात यायला प्रवृत्त केलं आहे. ते सातत्य कसं राहील याकडे लक्ष द्यायला हवं. पण तसं जनरली होत नाही. आधीचे दोन सिनेमे थिएटरवर चाललेत, असं कळलं की सगळं गाव त्यानंतर पुढच्या शुक्रवारी सिनेमे रिलीज करायला फटाक्यांची माळ फोडल्यागत सिनेमे जाहीर करतात. फार लांब नाही. या ४ फेब्रुवारीला चार सिनेमे लागतायत थिएटरवर. हे म्हणजे, भुकेल्या वेळी ताटाावर बसावं आणि ताटातले जिन्नस बघूनच पोट भरावं असं होण्यासारखं आहे.
आता पुष्पा (Pushpa: The Rise) या सिनेमाने या सगळ्यासमोर मोठ्ठी लाईन मारून ठेवली आहे. आता पुष्पापेक्षा मोठी लाईन मारायची तयारी करायला हवी. पण आपण तिकडं लक्ष दिलेलं नाही.
याला कारणीभूतही आपल्या मनोरंजनविश्वातल्या लोकांची मानसिकता कारणीभूत आहे. त्यावरही सविस्तर लिहिणार आहेच. पण पुढच्या भागात. आत्ता फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की, “पुष्पा.. आय हेट टिअर्स!”
बाय द वे,
सिनेमानेच दोन भाग करायचं असं कुठं असतं? लेखाचेही दोन भाग आहेत.
मनोरंजनसृष्टीचं कुठं चुकतंय, यावर पुढच्या भागात लिहीन.
तोवर हा लेख वाचा आणि नाचा!