क्वीन्स गँबिट: बुद्धिबळाचा नेटफ्लिक्सवर रंगलेला डाव
बेथचा जन्मच मुळी अनौरस नात्यातून झालेला. बाहेरख्याली प्रकरण दडविण्यासाठी जन्मतः तिच्या वडिलांनी बेथ आणि तिच्या आईशी असलेले संबंध नाकारले. वयाची सात वर्षे ती आपल्या आईसोबतचं वाढली. पण ज्या टप्प्यावर आपण मुलीची आणि स्वतःची काळजी घेण्यास असमर्थ आहोत हे तिच्या आईला लक्षात आलं, तिने आत्महत्या करून स्वतःला या जबाबदारीतून मुक्त केलं. सहाजिकच बेथचा ताबा एका अनाथालयाकडे गेला. तिकडे बेथला ‘आदर्श मुलगी’ होण्याचे धडे देण्यात येऊ लागले. वयाच्या पंधराव्या वर्षी आल्मा आणि अल्स्टोन व्हेअत्ली जोडपं तिला दत्तक घेतं. आपल्या फिरतीच्या नोकरीमुळे घरामध्ये एकट्या पडलेल्या आल्माच्या करमणुकीसाठी अल्स्टोनने केलेली ही सोय असते. एखाद्या मुलीची शोकांतिका इथवर मर्यादित राहिलेली बेथची कहाणी अनाथालयाच्या तळघरात एक वेगळं वळण घेते.
कामासाठी तळघरात गेलेल्या बेथची ओळख शैबेल नामक एका वृद्ध कर्मचाऱ्याशी होते. काळ्यापांढऱ्यापटावर काही सोंगट्यासोबत रंगलेला शैबेलचा खेळ बेथच्या कुतुहलाचा विषय होतो. ती त्याला या खेळाविषयी विचारते पण तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो. पण ती स्वतःच्या बुद्धिचातुर्याने त्याला जिंकते आणि बेथची ओळख बुद्धिबळाशी होते. दर रविवारी लपूनछपून बेथ तळघरात जाऊन शैबेलकडून खेळ शिकू लागते. त्यानंतरची कहाणी पहायला मात्र ‘क्वीन्स गँबिट’ ही नेटफ्लिक्सवरील सध्या प्रचंड गाजणारी सिरीज पहायला चुकवू नका.
एरवी एखाद्या खेळाडूची कहाणी सांगायची असेल, तर शक्यतो पुरुष पात्राची निवड केली जाते. ही सिरीज नेमक्या याचं ‘फॉर्म्युला’ला धक्का देते. त्यात अगदी अपवादात्मक प्रसंगी स्त्री व्यक्तिरेखा निवडलीच तर तिचा खेळाडू म्हणून प्रवास दाखविण्यापेक्षा प्रेम, घरातील संघर्ष, समाज यावर लक्ष केंद्रित केलं जातं. कदाचित हेच सगळं टाळण्यासाठी बेथला सुरवातीलाच अनाथ दाखवून आगाऊ संघर्ष टाळला आहे. म्हणायला आल्मा तिच्या आईच्या भूमिकेत येते, पण तीही काही काळासाठी. ही सिरीज पूर्णपणे बेथचा एक बुद्धिबळपटू होण्याकडे लक्ष केंद्रित करते.
बेथचं लहानपणापासून ते तारुण्यातील निरागसतेपर्यंतचे टप्पे सिरीजमध्ये येणं सहाजिकच आहे. पण हे टप्पे दाखवताना तिच्या वैयक्तिक आयुष्याचं उद्दात्तीकरण होणार नाही याकडे मात्र सिरीजकर्त्यांनी प्राधान्य दिलं आहे. पण त्याचवेळी बेथला तिच्या शाळेतील समवयीन ‘लोकप्रिय’ मुलींच्या जीवनशैलीच असलेलं आकर्षण, लहानपणापासून कधीच चांगले कपडे, नटणमुरडणं यासाठी संधी मिळाली नसल्यामुळे हातात पैसे आल्यावर उंची कपडे, मेकअप खरेदी करण्याची तिची हौस, पहिल्या प्रेमाची चाहूल, पहिल्या मासिक पाळीनंतरची चुळबुळ असे एखाद्या मुलीच्या आयुष्यात येणारे क्षण हळुवारपणे हाताळले आहेत. लहान बेथ ते उत्तम बुद्धिबळपटू म्हणून तिच्यामध्ये जगाला भिडण्याचा आलेला आत्मविश्वास इथपर्यंतचा प्रवास प्रेक्षकांना गुंतवून ठेवतो.
हे हि वाचा: भाग बिनी भाग: अपुऱ्या संवादाविना गडबडलेले कथानक
सिरीजमध्ये ५०च्या दशकाचा काळ रंगविलेला आहे. त्यामुळे तेव्हाच सामाजिक, आर्थिक, राजकीय चित्र सिरीजमध्ये उभं राहतं. कुटुंबापासून विभिक्त झालेली तरुण अमेरिकन पिढी, नात्यातील ओलावा हरवलेलं जोडपं, अमेरिका आणि रशियातील व्दंव्द, टीव्ही आणि रेडियोचा काळ हे सगळं बेथच्यानिमित्ताने पहायला मिळत. वेबसिरीज असली, तरी त्याच्या निर्मितीमूल्यावर कुठेच तडजोड केलेली सिरीजमध्ये जाणवत नाही. बेथला छतावर दिसणारा बुद्धिबळाचा भव्य सेट हा सिरीजचा महत्त्वाचा दुवा आहे. हे त्याच्या सादरीकरणातूनसुद्धा लक्षात येतं.
समोर शांतपणे बुद्धिबळाचा सामना रंगत असताना बेथच्या डोक्यात चाललेली प्रत्येक चालीपूर्वी असंख्य शक्यतांची उजळणी पटावरसुद्धा रंगते. हे सगळं कॅमेरामध्ये व्यवस्थितपणे पकडलं आहे. बुद्धिबळातील संयमता आणि तेव्हाच बेथच्या आयुष्यात आणि मनातील वादळ या दोन्हीचा वेग सिरीजमध्ये पकडला आहे. यंदा नवीन वर्षाच स्वागत घरातूनच करणार असाल, तर थोडी सवड काढून ही सिरीज नक्की बघा. सरत्या वर्षामध्ये काहीतरी उत्तम पहिल्याचा आनंद नक्कीच मिळेल.