
संगीतकार R.D.Burman यांच्याकडे किशोरकुमार यांनी गायलेलं पहिलं गाणं कोणतं?
संगीतकार आर डी बर्मन यांनी १९६१ सालच्या ‘छोटे नवाब’ या चित्रपटापासून आपली संगीतकार म्हणून कारकीर्द सुरू केली. त्यापूर्वी ते आपल्या वडिलांना म्हणजे संगीतकार एस डी बर्मन यांना असिस्टंट म्हणून काम करत होते. पंचम यांच्या संगीतातील जादू त्यांच्या पहिल्या चित्रपटापासूनच दिसून आली होती. पुढे सत्तर आणि ऐंशी च्या दशकातील ते टॉपचे संगीतकार बनले होते. पार्श्वगायक किशोर कुमार यांच्या सोबत त्यांचे असोसिएशन खूप मोठ आणि महत्त्वाचे होते. या दोघांनी १९६४ सालापासून १९८७ सालापर्यंत एकत्र काम केले. किशोर कुमारने पंचम यांच्याकडे २३३ सिनेमातून ५८८ गाणी गायली आहेत.
१९६९ च्या ‘आराधना’नंतर किशोर कुमार हा लीडचा सिंगर बनला त्याच काळात आर डी बर्मन यांचा बोलबाला फार मोठा होता. त्यामुळे सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये या दोघांनी अतिशय अप्रतिम अशी गाणी रसिकांना बहाल केली. पण या जोडीचं पहिलं गाणं कोणतं होतं ? गंमत म्हणजे हे गाणं किशोर कुमार ने गाऊ नये असं या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आणि अभिनेता यांना वाटत होतं. पण संगीतकार आरडी बर्मन यांनी आग्रहाने हे गाणं किशोर कुमार यांच्याकडून गाऊन घेतलं आणि एक कल्ट क्लासिक गाणं बनले. कोणतं होतं ते गाणं आणि काय होता तो नेमका किस्सा?

आर डी बर्मन यांचा भारतीय सिनेमाच्या दुनियेत संगीतकार म्हणून प्रवेश १९६१ सालच्या ‘छोटे नवाब’ या चित्रपटापासून झाला. हा चित्रपट मेहमूद यांच्या वडिलांनी बनवला होता. या चित्रपटात लता मंगेशकर यांच्या स्वरातील मालगुंजी या दुर्मिळ रागावरील ‘घर आजा घेर आई बदरिया सावरिया’ अप्रतिम गाणं होतं. हे एकच गाणं पंचमच्या कर्तृत्वाची साक्ष द्यायला पुरेसं आहे. या चित्रपटात इतर गाणी रफी यांनी गायली होती. यानंतर १९६४ मेहमूदने एक कॉमेडी हॉरर सिनेमा बनवला. या चित्रपटाचा लेखक, दिग्दर्शक आणि प्रमुख कलाकार मेहमूद स्वतः होता. चित्रपट होता ‘भूत बंगला. ‘ या सिनेमाची गाणी हसरत जयपुरी यांनी लिहिली होती तर संगीत आर डी बर्मन तथा पंचम यांचे होते.
या चित्रपटातील गाणी रफी आणि मन्नाडे यांनी गावी असे मेहमूद यांना वाटत होते. मन्ना डे च्या आवाजात दोन गाणे रेकॉर्ड देखील झाली होती. (आओ ट्विस्ट करे, प्यार करता जा) यातील एक गाणं खास रफी साठी बनवलं होतं. ते गाणं थोडसं दर्द भरे टाइप चे गाणं होतं. पण हे गाणं किशोर कुमारने गावे अशी इच्छा पंचमची होती. मेहमूद यांनी जेव्हा पंचम ला विचारलं,” रफी का नको आणि किशोर का पाहिजे?” त्या वेळेला पंचम ने सांगितले,” रफी ग्रेट सिंगर आहेच. त्यात प्रश्नच नाही. पण या गाण्यातील जे उतार चढाव आहेत ते किशोर आपल्या स्वरात चांगल्या पद्धतीने जाऊ शकेल. असे मला वाटते.”

तोपर्यंत मेहमूद वर चित्रित सर्व गाणी एक तर रफी मुकेश किंवा मन्नाडे यांनी गायले असल्यामुळे त्यांना किशोरच्या स्वराचा आवाका माहीत नव्हता आणि आपल्याला किशोरचा स्वर स्यूट होईल का हा देखील प्रश्न होता. पण पंचमने महमूदचे समाधान केले आणि मेहमूद किशोरच्या आवाजासाठी तयार झाला. नंतर पंचमनी किशोरदाला कॉन्टॅक्ट केले आणि त्याला आपल्या आवाजात हे डमी गाणे ऐकवले. किशोरदा ला खूप आनंद झाला कारण तो पहिल्यांदाच आर डी बर्मन यांच्याकडे गाणार होता. खरंतर सचिन देव बर्मन यांचा लाडका गायक किशोर कुमार असल्यामुळे आरडी आणि किशोर यांच्या बऱ्याचदा रिहर्सलच्या वेळी भेटी व्हायच्या. पण पहिल्यांदाच आर. डी. च्या संगीत नियोजना खाली आता किशोर गाणार होता. किशोरने ते गाणे संपूर्ण ऐकले पण काही न बोलता तो निघून गेला.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
पंचमला आश्चर्य वाटले. त्याला वाटले की गाण्याची चाल त्याला आवडली की नाही. पण रात्री किशोर कुमारचा फोन पंचम यांना आला आणि तो म्हणाला,” पंचम तुझं गाणं चांगलंच आहे. पण अंतऱ्या मध्ये थोडीशी गडबड आहे. तुझी जर हरकत नसेल तर मी तुला त्यात काही बदल सुचवू का?” त्यावर पंचम ने हसत हसत म्हणाला ,” मित्रा, अरे मी संगीतकार आहे म्हणून काय झालं? तुझा अनुभव जास्त मोठा आहे. आपण दोघे मिळून या गाण्याच्या अंतऱ्यातील तुला हवे ते बदल करून घेऊ. “ दुसऱ्या दिवशी किशोर स्टुडिओमध्ये आला आणि अंतऱ्याच्या ठिकाणी त्याला हवे असलेले चेंजेस त्याने पंचम दा ला सांगितले. अशा पद्धतीने दोघांच्या एकत्रित प्रयत्नातून हे गाणं तयार झालं हे गाणं होतं ‘जागो सोने वालो सुनो मेरी कहाणी..’ ‘भूत बंगला’ या चित्रपटाला त्या काळात चांगली यश मिळाले. किशोरच्या या गाण्याला देखील लोकांनी खूप पसंत केले. बिनाका गीतमाला मध्ये या गाण्याला चांगली लोकप्रियता मिळाली. तिथून पुढे पंचम आणि किशोर कुमार हे बेस्ट कॉम्बिनेशन सुरू झालं जे किशोरच्या अंतापर्यंत चालू राहिलं किशोर कुमारने पंचम कडे एकूण ५८८ गाणी गायली. या निमित्ताने महमूद आणि किशोरकुमार हे कॉम्बिनेशन देखील सुरू झालं! आर डी कडचे किशोर चे पहिले गाणे अशा पद्धतीने बनले!