‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
रेडिओचे चित्रपटाशी घट्ट नाते…
आज चालत्या फिरत्या टॅक्सीत अगदी मोबाईलवरही रेडिओ ऐकायला मिळतोय. पूर्वीही हातात रेडिओ अथवा छोटा ट्रान्झिस्टर घेऊन कुठेही कधीही जाता येताना स्वतः गाणी अथवा क्रिकेट कसोटी सामन्याचे समालोचन ऐकताना ते सार्वजनिक वाहतूकीत, अगदी रस्त्यावरही ऐकवता येत असे. फारपूर्वी मध्यमवर्गीय कुटुंबात घरी रेडिओ (Radio Movies) आणला रे आणला की, आजूबाजूची गल्लीतील पोरं शेजारी जमत आणि त्यांना चक्क साखर वाटली जात असे हे मी स्वतः अगदी लहानपणी अनुभवलय. गिरगावातील आमच्या खोताची वाडीतील छोट्याश्या घरात वडीलांनी छोटा रेडिओ आणला तोच घरात आजूबाजूचे सगळेच आले आणि घरी रेडिओ आणल्याबद्दल आईने लगेचच सगळ्याना साखर वाटली. ते दिवसच वेगळे होते.
कुटुंबांचे दरवाजे उघडे असत, अपॉइन्टमेंटशिवाय आजूबाजूचे झालेच दुरच्या मित्र अथवा नातेवाईकांकडे जाता येता येत होते आणि अनेकांच्या घरी हळूहळू रेडिओ येत होता. याच रेडिओचा आज १३ फेब्रुवारी हा जागतिक रेडिओ दिवस. काळ बदलला, माध्यमे बदलली. आज तर आपण ऑनलाईनच्या जगात वावरतोय. विशेष म्हणजे चित्रपटातून या सर्वच माध्यमांचे दर्शन घडत आले आहे. रेडिओचे तर खूपच. चित्रपट आणि रेडिओ या नात्यावर फोकस टाकताना बरेच काही सांगता येईल. चित्रपटात ‘रेडिओवरची गाणी अथवा रेडिओचा सहभाग असलेली गाणी ‘ खूप. त्यातील नेमकीच पाच सहा सांगायची तर,(Radio Movies)
चित्रपट- बरसात की एक रात… गाणे- जिंदगीभर नही भुलेगी बरसात की रात
चित्रपट- सन ऑफ इंडिया
गाणे- दिल तोडने वाले तुझे दिल धूंड रहा है
चित्रपट- अभिमान
गाणे– पिया बिना लागेना
खामोशी
गाणे- हमने देखी है उन आखों की खुशबू
अनुरोध
गाणे- आते जाते खुबसुरत
अथवा
आपके अनुरोध पे
चित्रपट– अष्टविनायक…
गाणे- दिसते मजला एक चित्त नवे
चित्रपट- गुपचूप गुपचूप….
गाणे– पाहिले नाही मी तुला
रेडिओ आणि चित्रपट (Radio Movies) या नात्याची आणखीन काही वैशिष्ट्य अगदी थोडक्यात सांगायची तर, सुनील दत्त रेडिओ सिलोनवर बलराज नावाने निवेदक म्हणून कार्यरत होता. ‘रेडू’ या मराठी चित्रपटाची थीम रेडिओभोवती आहे. आणि त्यात ग्रामीण भागातील जीवन शैलीचा अतिशय अनोखा असा प्रत्यय येतो. साठ आणि सत्तरच्या दशकातील रेडिओ सिलोनवरील बुधवारी रात्री आठ ते नऊ वाजता अमिन सयानी आपल्या खास शैलीत सादर करीत असलेल्या बिनाका गीतमालाचे हिंदी चित्रपट गीताशी घट्ट नाते होते. त्यात गाण्याच्या लोकप्रियेचा सकारात्मक प्रत्यय येत असे.
तर विविध भारतीवर शनिवार व रविवार दुपारी नवीन चित्रपटाचे रेडिओ प्रोग्राम्स होत. नवीन चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीसाठीचे ते अतिशय महत्वाचे माध्यम होते.
तसेच विविध भारतीवरील फौजी भाईओ की पसंद, बेला के फूल लोकप्रिय गाण्यांचे कार्यक्रम असत. मुंबई आकाशवाणीवरील दुपारी अकरा वाजताचा कामगार सभा हा कार्यक्रम लोकप्रिय होता. क्रिकेटप्रेमी स्टार पूर्वी सेटवर ट्रान्झिटरवर काॅमेन्ट्री ऐकत. विशेषत: त्या काळात सलूनमध्ये गेल्यावर आपला नंबर उशीरा असला तरी कसलीच तक्रार नसे. कारण, तोपर्यंत रेडिओवर क्रिकेट समालोचन अथवा चित्रपट गीते ऐकायला मिळत. तर भुले बिसरे गीत हा जुन्या चित्रपट गीतांचा कार्यक्रम ऐकणे अनेकांची जणू भावनिक गरज झाली होती.(Radio Movies)
============
हे देखील वाचा : किस्सा : संजूबाबाच्या बारशाचा !
============
खुश है जमाना आज पहली तारीख है… ‘पहली तारीख’ चित्रपटाचे हे गाणे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला हुकमी ऐकायला मिळे. आजही चित्रपट गीत संगीताच्या शौकीनांची जुनी पिढी त्या आठवणीत रमते. आवाज चांगला नाही म्हणून अमिताभ बच्चनला आकाशवाणीने नाकारले, ही चक्क दंतकथा वाटेल पण वस्तुस्थिती आहे. ग्रामीण भागात रेडिओने चित्रपट पोहचवला. अनेक नामवंत गायक सुरुवातीला रेडिओवर गायले.
रेडिओ आणि चित्रपट या नात्याचे हे काही पैलू.