Ashok Saraf : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने अशोक सराफ यांच्याशी अनेक

Raftaar : विनोद मेहरा-मौशमी चटर्जी जोडी युग
अभिनेता व अभिनेत्री जोडी कशी जमते?
सुपर हिट चित्रपटातील नायक नायिका (actor-actress) यांना नवीन चित्रपटासाठी करारबद्ध करण्यात चित्रपटासाठीचे अर्थपुरवठादार (त्याशिवाय चित्रपट बनेलच कसा?) निर्माते व दिग्दर्शक प्रत्येक काळात इच्छुक असतातच. आपली चित्रपटसृष्टी अशा अनेक अलिखित नियमानुसार चालते आणि तीच तर या क्षेत्राची गंमत आहे. यश हेच येथील चलनी नाणे.

त्या जमलेल्या जोडीलाही एकमेकांचा सहवास, स्वभाव आवडत जाणे स्वाभाविकच! मुळात तीही आपल्यासारखीच संवेदनशील माणसेच. चेहर्यावर रंग लावला, भूमिकेत ते शिरले, दिग्दर्शक लाईट्स कॅमेरा ॲक्शन असे म्हणताच तेच कलाकार भूमिकेत शिरतात आणि एका यशस्वी चित्रपटानंतर आणखीन एका चित्रपटात, तर कधी एकाच वेळेस चार पाच चित्रपटात एकत्र काम करता करता त्यांच्यात कॅमेऱ्यासमोर सहजता येते, प्रेम दृश्यात आणखीन रंग भरतो. संकोच नसतो. कॅमेऱ्यापलिकडे अथवा कॅमेऱ्यामागे एकमेकांच्या सवयी, आवडीनिवडी माहित होत जातात, त्या जपल्या जातात. या सगळ्याच गडबडीत गाॅसिप्स मॅगझिनमधून त्याच जोडीबद्दल खरं खोटे अथवा वास्तव/ आभासी असे प्रसिद्ध होत जाते.
सत्तरच्या दशकातील अशीच एक लोकप्रिय व बहुचर्चित रुपेरी जोडी विनोद मेहरा व मौशमी चटर्जी. या जोडीच्या दिग्दर्शक दिनेश रमणेश या जोडीच्या “रफ्तार” ( अर्थात वेग वा स्पीड) या चित्रपटाच्या मुंबईतील प्रदर्शनास पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. १४ फेब्रुवारी १९७५ रोजी “रफ्तार” मुंबईतील गंगा व अन्य चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. याच दिवशी मुंबईत मेट्रो थिएटर व इतरत्र गुलजार दिग्दर्शित “आंधी” देखील प्रदर्शित झाल्याने प्रसार माध्यम आणि चित्रपट रसिकांचे लक्ष त्याकडे असले तरी “रफ्तार”कडे दुर्लक्ष झाले नाही.

Vinod Mehra बालकलाकार म्हणून चित्रसृष्टीत आला आणि मग वयात येताच नायक झाला. एफ. सी. मेहरा निर्मित व के. रमणलाल दिग्दर्शित “ऐलान” (elaan) (१९७१) या चित्रपटात रेखासोबत काम करता करता त्यांनी चक्क लग्नदेखील केले. या लग्नापेक्षा त्यांची एकमेकांना सोडचिठ्ठी आणि मग रेखाचा शिळा उपमा खावून केलेला आत्महत्येचा प्रयत्न जास्त गाजला. तिने यावर चक्क पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरचा फोकस कायम ठेवला. मग दोघेही आपापल्या मार्गाने पुढे निघाले, खाजगी संबंध बाजूला ठेवून त्यांनी माणिक चटर्जी दिग्दर्शित ‘घर’, सावनकुमार टाक दिग्दर्शित “प्यार की जीत” इत्यादी चित्रपटात एकत्र काम केले याला व्यावसायिकता म्हणतात. गाॅसिप्सवाल्यांनी तेव्हापासून रेखाबद्दल एवढ्या नि अशा गोष्टी शिजवल्या, रंगवल्या, पिकवल्या की तिच्यातील अतिशय मेहनती आणि अष्टपैलू गुणी कलाकाराकडे त्यांचे बरेचसे दुर्लक्षच झाले.

Moushumi Chatterjee चे कोलकात्यात (तेव्हाचे कलकत्ता) असतानाच संगीतकार व पार्श्वगायक हेमंत कुमार यांचा मुलगा रितेश याच्याशी लग्न झाले आणि मग सासर्यांच्या प्रोत्साहन आणि ओळखीतून ती मुंबईतील चित्रपटसृष्टीत आली आणि तिला सुरुवातीस मिळालेल्या चित्रपटात शक्ती सामंता निर्मित व दिग्दर्शित “अनुराग” (१९७३) हा चित्रपट होता. त्यात अशोककुमार, नूतन, मा. सत्यजित, खास भूमिकेत राजेश खन्ना तसेच विनोद मेहरा व मौशमी चटर्जी यांची रोमॅन्टीक जोडी.
मौशमी दृष्टीहीन असून चित्रपटाच्या क्लायमॅक्सला तिला त्या कुटुंबातील बालकाच्या कर्करोगाने झालेल्या मृत्यूनंतर त्याचे डोळे दिले जातात व तिला दृष्टी प्राप्त होते. मुंबईत ऑपेरा हाऊस चित्रपटगृहात ‘अनुराग’ यशस्वी रौप्य महोत्सवी वाटचाल करत असतानाच विनोद मेहरा व मौशमी चटर्जी जोडीला अनेक निर्माता व दिग्दर्शकांनी करारबद्ध करुन चित्रपटाचे मुहूर्त करुन शूटिंग सुरुदेखील केले. चित्रपटाच्या यशाची हीच तर गंमत असते. ते प्रसार माध्यमांपासून सगळ्यांचेच लक्ष वेधून घेते.
=============
हे देखील वाचा : Yaadein : जगातील पहिल्या एकपात्री चित्रपटाला ६१ वर्ष
=============
“Raftaar”ची गोष्ट ग्रामीण भागात घडते. त्या काळात योगायोगानेच खच्चून भरलेल्या गोष्टी रुपेरी पडद्यावर अनेक येत आणि पब्लिकचीही पसंती मिळे. खरं तर त्या काळातील पब्लिक फारसा चौकस नसे. एक साधी गोष्ट आणि त्यात गीत संगीत व नृत्य यांचा तडका इतकीच अपेक्षा असे. तो फसला तर पिक्चर फ्लाॅप. जमला तर पिक्चर किमान पन्नास वा शंभर दिवसांचे यश निश्चित. त्यानंतर काही वर्षातच मॅटीनी शो, गल्ली चित्रपट यातून अशा चित्रपटाचा प्रवास सुरु.
चित्रपटात थीमनुसार नायिका रानीचा (मौशमी चटर्जी) नदीत बुडून मृत्यू झाला असा सगळ्यांचाच समज होतो पण तसे नसते. ती त्या संकटातून बचावते आणि शहरात जाऊन रिना नावाने नवीन आयुष्य सुरु करते, याभोवतीच्या योगायोगाच्या नाट्यमय गोष्टी म्हणजे “रफ्तार” चित्रपट. राजवंश यांची ही गोष्ट आणि एस. आय. शिवदासानी यांची ही निर्मिती. चित्रपटात डॅनी डेन्झोपा, रणजित (या दोघांची आजही अतिशय उत्तम मैत्री आहे असे मध्यंतरी रणजितने मला एका मुलाखतीच्या निमित्ताने सांगितले.) मदन पुरी, सुंदर, मोहन चोटी, बिरबल, जानकीदास, ललिता कुमारी, अपर्णा चौधरी यांच्या भूमिका. चित्रपटाचे छायाचित्रणकार चमन के. बाजू. तर संकलन गोविंद दलवानी यांचे.

चित्रपटाची गीते वर्मा मलिक, ओमकार वर्मा व अभिलाष यांची तर संगीत सोनिक ओमी यांचे! यातील संसार है एक नदीया सुख दुख के दो किनारे है हे मुकेश व आशा भोसले यांनी गायलेले गाणे लोकप्रिय आहे. या गाण्यातील आशय खूपच महत्वाचा. या गाण्यामुळे “रफ्तार” अनेकांच्या लक्षात.
विनोद मेहरा व मौशमी चटर्जी यांनी अनुराग, रफ्तार, सबसे बडा रुपय्या, उमर कैद, दो झूठ, उस पार, मजाक, जिंदगी अशा अनेक चित्रपटांत नायक नायिका साकारले. स्वर्ग नरक या चित्रपटात दोघेही होते. पण… पण मौशमी चटर्जी जितेंद्रची तर शबाना आझमी विनोद मेहराची नायिका होती असेही घडलयं.