‘बॉबी’ नंतरचा राज कपूर
“बॉबी” रिलीज (२८ सप्टेंबर १९७३. पन्नास वर्ष होऊनही हा चित्रपट तारुण्यात आहे ) झाला रे झाला आणि राज कपूरच्या ‘आवारा’, ‘बरसात’, ‘श्री ४२०’ अशा कृष्ण धवल चित्रपटांच्या दिग्दर्शनावर आणि मग ‘मेरा नाम जोकर’च्या अपयशावर सहानुभूती असणारे रसिक म्हणाले, राज कपूरचा क्लासिक टच हरवला. तो आता खरोखरचा ‘शोमन’ झाला. मात्र, तेव्हाची युवा पिढी या मोकळ्या ढाकळ्या रोमॅन्टीक चित्रपटावर विलक्षण फिदा होती. ‘बाॅबी’ने प्रेमपटाची चौकट मोडली, नवीन शैली, भाषा, स्टाईल आणली. राज कपूर काळानुसार बदलला असं त्यांना वाटले आणि पुन्हा पुन्हा ते ‘बाॅबी’ एन्जाॅय करायला जाऊ लागले. (Raj Kapoor)
जुन्या पिढीतील सिनेमावाले, प्रसार माध्यमातील चित्रपट अभ्यासक, विश्लेषक, पत्रकार आणि जुन्या चित्रपटावर प्रेम करणारे चित्रपट रसिक आपलं म्हणणं ( की हट्ट?) सोडायला तयारच नव्हते. ते ठामपणे म्हणतं होते की, ‘बॉबी’ राज कपूरच्या (Raj Kapoor) शैलीचा चित्रपटच नाही. एकीकडे ही चर्चा तर त्याच्यातच ‘मेरा नाम जोकर’ फ्लॉप झाल्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या, त्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी, बातम्या, किस्से, कथा, दंतकथा प्रसिद्ध झाल्या. अगदी आजही म्हणजे जवळपास पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ जास्त चर्चेत आहेत हे असं भाग्य एखाद्याच चित्रपटाला येऊ शकते. (आर. के. स्टुडिओ म्हणे गहाण ठेवला वगैरे) काहींनी मात्र ‘बाॅबी’कडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं. राज कपूरने कात टाकली असंही कौतुकाने म्हटलं. टीनेजर लव्ह स्टोरी म्हणून आपला मुलगा ऋषी कपूर म्हणजे चिंटू आणि फ्रेश चेहरा म्हणजे नवीन चेहरा डिंपल यांची जोडी जमवून या रोमँटिक आणि अगदी वेगळ्या भाषेत सांगायचं तर अतिशय मोकळ्या ढाकळ्या धाडसी प्रेमाला ‘सिनेमाच्या पडद्यावर’ आणले. पन्नास वर्षांपूर्वीच्या सामाजिक सांस्कृतिक वातावरणाच्या तुलनेत तर सांगायचं झालं तर हम तुम एक कमरे में बंद हो हे फारच भारी होतं.
‘बॉबी’ नंतरच्या संकलक व दिग्दर्शक राज कपूरच्या (Raj Kapoor) चित्रपटांची खासियत काय माहितीय? ते सगळे चित्रपट नायिकाप्रधान किंवा स्त्री व्यक्तीरेखेभोवती केंद्रित झालेल्या अशा कथानकांवरचे आहेत. अरे काही कौतुक कराल की नाही? ‘बाॅबी’देखील नायिकाप्रधानच. ‘सत्यम शिवम सुंदरम’ ( १९७८) मध्ये झीनत अमान, ‘प्रेम रोग’ (१९८२) मध्ये पद्मिनी कोल्हापुरे,” राम तेरी गंगा मैली”( १९८५) मध्ये मंदाकिनी आणि त्यानंतर ‘हीना’ (१९९१) चित्रपट हे राजकपूरचं केव्हापासून तरी स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण करायला वेळ लागला कारण त्याच्या पटकथेवर सखोल काम करणं भाग होतं. राज कपूरची कलाकृती म्हणजे खूपच मोठा प्रवास असतो. चित्रपटाची जी थीम आहे की, काश्मीर खोऱ्यामधून पावसामध्ये नायकाच्या (ऋषि कपूर) गाडीला अपघात होतो आणि नंतर मग तो त्या नदीतून वाहत वाहत पाकिस्तानमध्ये जातो आणि पाकिस्तानमध्ये त्याची हीना ( झेबा बख्तियार)सोबतची प्रेमकथा रुजते, खुलते, रंगते आणि त्याची त्यावेळेला स्मृती गेलेली असते आणि अखेरीस त्याची स्मृती आल्यानंतर मग पेच निर्माण होतो की आता तो पुन्हा हिंदुस्थानामध्ये जाणार आणि मग त्या प्रेम कथेचे काय? ही थीम राज कपूरच्या मनामध्ये बराच काळापासून होती. ‘हीना’ची दोन गाणी रवींद्र जैन यांनी ध्वनीमुद्रित केली. लता मंगेशकर यांच्या आवाजातली दोन गाणी होती आणि दोन गाण्यांच्या रेकॉर्डिंग नंतर दुर्दैवाने राज कपूरचे निधन झालं आणि त्यानंतर रणधीर कपूरने दिग्दर्शन केले.
‘बॉबी’ नंतर राज कपूरच्या (Raj Kapoor) दिग्दर्शनात स्त्रीकेंद्रित विषय आल्याचे दिसते. पण तात्कालीक समीक्षकांनी त्याच्यावर ग्लॅमरस दृष्टिकोनातून फोकस टाकला की, ‘सत्यम शिवम सुंदरम’ मध्ये गोड गळ्याची नायिका आहे जिच्या गालाला एका बाजूला डाग आहेत नायक तिच्या आवाजाच्या आणि सौंदर्याच्या प्रेमात पडतो त्याला तो डाग दिसत नाही. ग्रामीण पाश्र्वभूमीवरील ही गोष्ट आहे आणि कालांतराने लक्षात येतं की, नायिकेचा चेहरा एका बाजूने असा विद्रूप झालेला आहेत अशी एक वेगळी तरल प्रेम कथा होती. परंतु त्या चित्रपटांमध्ये झीनत अमानला ज्या पद्धतीने ग्रामीण रुपात दाखवलीय, प्रसंगी ओलेती दाखवलीय किंवा मादकता दिसते त्याच्याविषयी चर्चा झाली त्यामुळे राज कपूर आपल्या चित्रपटातील नायिकांना अशा पद्धतीने लाऊड दाखवतो किंवा आपला शोमनशीपपणा दाखवतो अशी त्याच्यावर टीका झाली. ‘ प्रेम रोग’चे दिग्दर्शन करत जैनेंद्र जैन करत होते. परंतु पहिल्या काही दिवसांच्या चित्रीकरणानंतर राज कपूरने चित्रपटाचं दिग्दर्शन आपल्या हाती घेतला. विधवा विवाह हा त्या चित्रपटाचा विषय होता एक सामाजिक विषय. राज कपूरचे अतिशय उत्तम सादरीकरण. ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरेची जमलेली जोडी ही जमेची बाजू. पद्मिनी कोल्हापुरीचे विजेंद्र घाटगेशी लग्न होतं आणि काही महिन्यातच त्याचं निधन होतं आणि मग ती विधवा आणि ऋषी कपूर यांचे प्रेम आणि या प्रेमाच्यामध्ये आलेले अडथळे, श्रीमंती गरिबी, त्याचबरोबर पारंपरिक, मूल्य, सभ्यता आणि मग तो सगळा अडथळा… त्यावर मात करणारे असे कथानक होतं. रसिकांना ते आवडलं. चित्रपटाने मुंबईत अप्सरा थिएटरमध्ये रौप्यमहोत्सवी यश संपादले.
राज कपूरची (Raj Kapoor) काही खास वैशिष्ट्य असत. आपल्या चित्रपटातील नायिका निवडण्यात तो बराच वेळ घेई आणि म्हणून तर ‘कोण बरे आर. के. फिल्मच्या नवीन चित्रपटाची नायिका असेल ‘ याबाबतची उत्सुकता ताणली जाई. मिडियातही त्याची बातमी होई, चर्चा रंगे. ‘ राम तेरी गंगा मैली’च्या वेळी हा डाव फारच रंगला. ही भूमिका आपल्याला मिळावी म्हणून डिंपल कापडियानेसुद्धा ग्रामीण धारण करून राज कपूरची आर. के. स्टुडिओत भेट घेतली असं आपल्याला सिद्धार्थ राॅयने राज कपूरवर केलेल्या डॉक्युमेंटरीमध्ये दिसतं. नेमक्या त्याच वेळेस डिंपलने अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले होते. राज कपूरने निवड केली मंदाकिनी उत्तर प्रदेशातील एक शहरातील होती. चित्रपटाची पूर्वप्रसिद्ध सुरु झाली त्यात धबधब्याखाली बसलेली मंदाकिनी आणि राज कपूर व मंदाकिनी यांचे चुंबन दृश्य याच्यावर जास्त फोकस दिसला आणि त्यामुळे त्या चित्रपटाबद्दल एक वेगळी अशी एक प्रतिमा तयार झाली. चित्रपट प्रदर्शित व्हायच्या वेळेस राज कपूरने आपल्या चित्रपटाचे प्रसिद्धी अधिकारी बनी रुबेन यांच्याद्वारे असा खुलासा केलाय की, तुम्ही समजत कसं काही नाहीये. कथेच्या ओघांमध्ये आलेले ही दृश्य आहेत आणि कथा अशी आहे की, जी गंगा आहे , त्या पवित्र गंगेच्या प्रवासामध्ये वेगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती कशा येत जातात आणि त्यातील वाईट प्रवृत्तींचा पराभव होतो आणि सत्तप्रवृत्तींचा विजय होतो असे कथानक होते. ‘गंगा’ नदी एक प्रतिक होते.
राज कपूरची (Raj Kapoor) नायिकांची निवड कायमच चर्चेत. झीनत अमानचे करिअर अतिशय उंचीवर असतानाच राज कपूरने तिला ‘सत्यम शिवम सुंदरम’साठी निवडले. ती देवानंदची फाईण्ड म्हणून ओळखली जात असतानाच देवानंदच्या नवकेतनमधून राज कपूरच्या आर. के. कॅम्पमध्ये असा प्रवास केल्याने त्या काळात गाॅसिप्स मॅगझिनमधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिखट मीठ लावून खारट जीरं वाढवून रंगवून लिहिले गेले. ‘प्रेम रोग’ची पद्मिनी कोल्हापुरे ही ‘सत्यम शिवम सुंदरम’ मध्ये बालकलाकार होती. इतर चित्रपटांमध्येही तिने बालकलाकार म्हणून भूमिका साकारल्यानंतर वयात आल्यावर तिला नासिर हुसेन दिग्दर्शित ‘जमाने को दिखाना है’ मध्ये ऋषी कपूरची नायिका म्हणून संधी मिळाली. त्यात ऋषि कपूर तिचा नायक होता. राज कपूरच्या ‘प्रेम रोग’ मध्ये ती ऋषी कपूरची पुन्हा नायिका झाली. ‘हीना’ साठी झेबा बख्तियार ही पाकिस्तानातील अभिनेत्री निवडली. चित्रपटाची कथा भारत पाकिस्तानच्या सीमा रेषांवरील गावांमध्ये आहे त्यामुळे चित्रपटाची नायिका पाकिस्तानातील आहे असं चित्रपटांमध्ये आल्यावर चित्रपट रसिक तिच्याशी कनेक्ट झाले.
=========
हे देखील वाचा : ‘गाईड’ पुन्हा अनुभवताना…
=========
तात्पर्य राज कपूरने ‘बॉबी’ नंतरच्या दिग्दर्शनीय वाटचालीत निश्चितच ‘नायिकांचा’ वेगळा ट्रॅक ठेवलाय. ‘बॉबी’ पूर्वीचा राज कपूर हा वेगळा होता, निश्चितच वेगळा होता अर्थात तो काळच वेगळा होता त्या काळातील चित्रपटाची शैली, भाषा, संस्कृती वेगळी होती राजकपूरच्या चित्रपटावर कम्युनिस्ट विचारसरणीचा प्रभाव आहे असं सुद्धा म्हटलं गेलं. राज कपूर रशियामध्ये लोकप्रिय झाला. ‘संगम’ हा आर. के. फिल्मचा पहिला रंगीत चित्रपट. ‘मेरा नाम जोकर’ राज कपूरचे एक खूप मोठे स्वप्न होतं महत्वाकांशी चित्रपट होता. ‘नायक’ म्हणून त्याची इनिंग येथेच संपली. दिग्दर्शक म्हणून नवीन दृष्टिकोन घेतला. ‘बॉबी’पासून सेकंड हॅनिंग सुरू झाली. त्याच्या पहिल्या इनिंग वर प्रेम करणारे राज कपूरचा रुपेरी भाबडेपणा किंवा चार्ली चापलीनचा प्रभाव होता त्याच्यावर प्रेम करत होता. ‘बॉबी’ नंतरची राज कपूरची (Raj Kapoor) इनिंग ही वेगळी वाटली की, त्याच्यासाठी ती वेगळी ठरली हे मात्र खरं परंतु त्याच्यामध्ये एक मुद्दा काॅमन होता ते म्हणजे ते सगळे चित्रपट म्हणजे बॉबी, सत्यम शिवम सुंदरम, प्रेम रोग व राम तेरी गंगा मैली नायिकाप्रधान आहेत. स्त्री व्यक्तीरेखेभोवती आहेत. स्त्रियांच्या मन भावना, त्यांची जगण्याची पद्धत याचा राज कपूरने आपल्या कथानकांमध्ये कशा पद्धतीने वापर केला हे सुद्धा त्यामध्ये आपल्या पाहायला मिळतं.
राज कपूर दिग्दर्शनातील जुन्या पिढीतील फॅन्सना ‘बाॅबी’ पासूनच ग्लॅमरस रुप, बोल्डपणा बराचसा खटकला. पण आता हिंदी चित्रपटाच्या नायिकेच्या दिसण्याला, ग्लॅमरस रुपाला जरा जास्तच महत्व आले त्याच चालीवर राज कपूर चालला यात गैर काय? आणि त्यात तो यशस्वीही ठरलाय. चित्रपटाच्या जगात ‘यश हेच चलनी नाणे’ असल्यावर या यशाला दाद देऊयात. त्यातही राज कपूर टच होता आणि तोच जास्त महत्त्वाचा आणि कौतुकाचा आहे.