Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स कुणाला कवडी मोलच्या भावात विकले?
आर के फिल्म चे पब्लिसिटी इन्चार्ज बनी रूबेन यांनी त्यांच्या “Raj Kapoor: The Fabulous Showman: An Intimate Biography,”पुस्तकात हा किस्सा लिहिला आहे. एन एफ डी सी यांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक राजकपूर च्या निधना नंतर १९८८ साली वाचकां समोर आले. यात खूप अनभिज्ञ अशा गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. हा प्रस्तुत किस्सा वाचून रसिकांना खूप आश्चर्य वाटेल कारण राज कपूर यांच्या चित्रपटातील एक्स्ट्रा फुटेज आणि डिलीटेड सॉंग्स यांचे फुटेज राज कपूर यांच्याकडे नव्हतेच! मग ते कुणाकडे होते? आणि एवढा किमती ऐवज कवडी मोला च्या भावात कसा काय विकला गेला? खूप इंटरेस्टिंग असा किस्सा या पुस्तकात आहे.
जेव्हा राज कपूर यांचा ‘मेरा नाम जोकर’(१९७०) हा चित्रपट सुपर फ्लॉप झाला आणि राजकपूर डोक्यापासून पायापर्यंत कर्जाच्या विळख्यात अडकले गेले त्या वेळी त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांचे पब्लिसिटी इन्चार्ज बनी रुबेन यांनी एक प्रस्ताव राज कपूर यांच्या समोर ठेवला. बनी रुबेन राज कपूर यांना म्हणाले,” भले तुमचा हा चित्रपट अयशस्वी ठरला असला तरी राज कपूर या नावाची क्रेझ हिंदी सिनेमा मध्ये कायम आहे. एक सिनेमा फ्लॉप झाला म्हणून सगळं संपत नाही!”. बनी रुबेन यांचा तो प्रस्ताव असा होता. १९४८ च्या ‘आग’ या चित्रपटापासून १९७० च्या ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटापर्यंत राजकपूर यांच्या चित्रपटातील अनेक शॉट्स अनेक सीन्स , फुटेज आणि डिलीटेड सॉंग्स जे एडिटिंग करताना बाजूला पडले असतील ते सर्व त्यांच्या संग्रही असावेत असे त्यांना वाटले म्हणून त्यांनी राजकपूर यांची सर्व प्रस्ताव ठेवला.

“आपण हे सर्व फुटेज आणि डिलेटेड गाणी एकत्र कंपाईल करून त्याची एक डॉक्युमेंटरी तयार करूत आणि या डॉक्युमेंटरीला तुमची कॉमेंट्री असेल आणि हे शॉट्स तुम्ही का सिनेमात वापरले नाही किंवा ही गाणी चित्रपटातून का बाद झाली याविषयीचे तुमचे भाष्य असेल. रसिकांना तुमच्या तोंडून हा इतिहास ऐकायला नक्की आवडेल. राजकपूर एक अभिनेता दिग्दर्शक असताना एक एडिटर म्हणून कशा पद्धतीने काम करतो सिनेमा बनवताना त्याचे संकलन करताना त्यांच्या मनात नेमके कुठले विचार चालू असतात आणि कुठला शॉट सिनेमा ठेवायचा आणि कुठला डिलीट करायचा याबद्दलचं राजकपूर चे मत काय हे खूप इंटरेस्टिंग असेल आणि सिनेमाचे अननोन फॅक्ट यामुळे समोर येतील.” राजकपूर यांनी बनी रुबेन यांचे म्हणणे शांतपणे ऐकले.

आपल्या ग्लासातील व्हिस्की संपवत बनी यांना ते म्हणाले,” मित्रा तुझी आयडिया खरोखरच चांगली आहे. पण मी हे करू शकत नाही. कारण एक्स्ट्रा फुटेज आणि तू म्हणतो तसे डीलेटेड सॉंग्स माझ्याकडे नाहीतच.” त्यावर बनी रुबेन म्हणाले,” नाहीत??? म्हणजे कुठे गेले सर्व मटेरियल ?“,.त्यावर राज कपूर म्हणाले,”अक्षरशः कचऱ्याच्या भावात आम्ही विकून टाकले!!”. आता आश्चर्यचकित होण्याची पाळी बनी रूबेन यांची होती. राजकपूर पुढे म्हणाले, “पूर्वी आमच्या आर के स्टुडिओमध्ये स्टोरेजची खूप कमतरता होती त्यामुळे दर दिवाळीच्या वेळेला आम्ही कचरा बाहेर टाकताना या सर्व एक्सट्रा फुटेज फिल्म्स देखील कवडीच्या भावामध्ये भंगारवाल्याला विकून टाकल्या. आता माझ्याकडे तुम्ही म्हणता तसे काहीच मटेरियल नाही.”
================================
हे देखील वाचा : अमिताभ आणि जया यांना हनिमूनहून तातडीने का परत यावे लागले?
================================
बनी रुबेन यांनी कपाळाला हात लावला. खरोखरच ही डॉक्युमेंटरी जर बनली असती तर एक सिनेमाचा जिता जाता इतिहास रसिकांपुढे आला असता. राज कपूर यांनी कळत नकळत पणे आपल्या सिनेमातील डिलीटेड सॉंग्स आणि एक्स्ट्रा फुटेज चा मोलाचा खजिना भंगारवाल्याला विकून टाकले पण कपूर फॅमिलीतील पुढच्या पिढीने तर आख्खा आर के स्टुडिओ च विकून टाकला. आज चेंबूरला आर के स्टुडिओ समोरून जाताना आर के चा सर्व इतिहास, ते चित्रपट आणि गाणी डोळ्यापुढे येतात. आपल्याकडे इतिहासाचे जतन अजिबात होत नाही. सिनेमाचा इतिहास तर कुणाच्या खिजगिनतीत नसतो. आज मुंबईत एका पाठोपाठ फिल्म स्टुडिओ बंद पडत आहेत!