राजा परांजपे यांच्या मराठी चित्रपटांवरून प्रेरित होते ‘हे’ हिंदी चित्रपट!
पन्नासच्या दशकातील मराठी चित्रपटाच्या दुनियेतील अग्रणी व्यक्तीमत्व म्हणजे राजा परांजपे! ९ फेब्रुवारी १९७९ रोजी त्यांचे निधन झाले. आज त्यांचा स्मृती दिन. एक अग्रगण्य अष्टपैलू अभिनेता, असामान्य प्रतिभासंपन्न दिग्दर्शक आणि द्रष्टा निर्माता या नात्याने या ‘राजा’ने मराठी चित्रपटसृष्टीवर अनेक वर्षे अधिराज्य गाजवले.
सत्यजित रे यांनी बंगाली चित्रपटात जो नववास्तववाद आणला, अगदी त्याच धर्तीवर राजाभाऊंनी मराठीत ‘पुढचं पाऊल’, ‘उनपाऊस’, ‘देवघर’ असे काही कलात्मक चित्रपट देण्याचा धाडसी प्रयोग केला. चाकोरीबाहेर जाऊन काहीतरी वेगळं करण्याची जिद्द राजाभाऊंमध्ये होती.
मा. विनायक यांनी निर्माण केलेली विनोदी चित्रपटांची अभिजात परंपरा राजाभाऊंनी ‘पेडगावचे शहाणे’, ‘लाखाची गोष्ट’, ‘इन मिन साडेतीन’, ‘गंगेत घोडं न्हालं’, ‘आधी कळस मग पाया’, ‘बायको माहेरी जाते’, ‘गुरुकिल्ली’ असे विनोदी चित्रपट देऊन यशस्वीपणे चालवली. चित्रपटाच्या कथेतील आशयाला ते सर्वात जास्त महत्व देत. कथा सुचण्यासाठी त्यांना एखादी ओळ देखील पुरेशी असे. त्यांच्या एका गाजलेल्या सिनेमाचा जन्म अशाच गोष्टीतून झाला.
एकदा गदीमा आणि राजाभाऊ असेच गप्पा मारत होते या मैफीलीत गोविंद घाणेकर सामील झाले. घाणेकरांनी गमतीने सहज एक प्रश्न विचारला, “जर वेड्याच्या इस्पितळातून पळालेला एखादा वेडा शहाण्या माणसांच्या घरात घुसला तर काय होईल?”
घाणेकर बोलून गेले, पण या दोघांच्या डोक्यात लगेच चक्र फिरू लागली आणि ‘पेडगावचे शहाणे’ या चित्रपटाचा जन्म झाला. मा. विनायक यांच्या प्रतिभासंपन्न विनोदी चित्रपटाच्या परंपरेतील हा चित्रपट तूफान लोकप्रिय ठरला. यात राजाभाऊंचा डबल रोल होता. म्हणजे ते निर्माते दिग्दर्शक तर होतेच, पण अभिनय करताना देखील ते दुहेरी भूमिकेत होते.
या मराठी चित्रपटाचे अफाट यश बघून हिंदीतील नामवंत निर्माते ए आर कारदार यांनाही याचा मोह पडला. त्यांनी लगेच १९५३ साली या चित्रपटाचा हिंदी अवतार ‘चाचा चौधरी’ या नावाने हिंदीत आणला. स्वत: हिंदीतील नामांकीत दिग्दर्शक असतानाही त्यांनी हा सिनेमा राजाभाऊंकडे दिग्दर्शनासाठी सोपवला. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यातील दुहेरी भूमिका त्यांनाच करायला लावली.
====
हे देखील वाचा: तब्बल अठरा वर्षाचा काळ लागला ‘हे’ गाणे बनायला
====
‘पेडगावचे शहाणे’ चित्रपटात सारंग मामाची भूमिका धुमाळ यांनी केली होती. ती इतकी गाजली की या सिनेमाच्या हिंदी आवृत्तीत तर ते होतेच, पण त्यांच्याकरीता हिंदी सिनेमाचे प्रवेशद्वार उघडणारी ही भूमिका ठरली.
१९५५ साली राजा परांजपे यांचा ‘गंगेत घोडं न्हालं’ हा चित्रपट आला होता; राजा गोसावी आणि रेखा कामत यांच्या त्यात भूमिका होत्या. या कथानकावर आर सी तलवार यांनी १९६३ साली हिंदीत ’एक दिल सौ अफसाने’ हा सिनेमा बनविला. ज्यात राजकपूर, वहिदा रहमान यांच्या भूमिका होत्या.
१९६४ साली राजा परांजपे यांनी ‘पाठलाग’ हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला होता. हिंदीत त्यांचा रिमेक राज खोसला यांनी केला ‘मेरा साया’ या नावाने. म्हणजे आपल्या मराठी सिनेमावरून त्याकाळी हिंदीत रिमेक होत होते. ही किमया राजा परांजपे यांची होती. त्यांच्या एका गाजलेल्या सिनेमाचा किस्सा तुम्हाला देखील रंजक वाटेल.
बी आर मूव्हीजचा ‘बागबान’ हा २००५ साली आलेला सिनेमा गाजला त्यातील व्यक्तीरेखा आणि कथानकाने! अनेक खस्ता खात मुलाबाळांना वाढवायचं व ती मुलं मोठी झाली की, त्यांनी आपल्या पालकांचे हे उपकार नुसते विसरायचेच नाहीत, तर ज्या वयात एकत्र रहाणं जास्त गरजेचं असतं त्याच वयात त्यांची ताटातूटही करायची.
अमिताभ बच्चन व हेमामालीनी यांनी साकारलेल्या या भूमिकांमधून हे दु:ख प्रेक्षकांपर्यंत पोचलं. या सिनेमात चकचकीत सेटवर घडणारं कथानक मूळ विषयाचं गांभीर्य कमी करणार होतं. पण हाच विषय आपल्याकडे अनेक सिनेमातून मांडला गेलाय. त्यातील १९५४ साली आलेल्या ’उन पाऊस’ या मराठी सिनेमाचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेलं. आयुष्याच्या उत्तरार्धातील हा कौटुंबिक छळ राजा परांजपे व सुमती गुप्ते जोगळेकर यांनी आपल्या अभिनयातून रसिकांच्या काळजाला हात घातला. गदीमांच्या या कथेला प्रेरणा होती ‘मेक वे फॉर टूमारो’(दि. लिओ मॅककॅरे) या १९३७ साली आलेल्या अमेरीकन चित्रपटाची.
सत्तरच्या दशकात याच कथानकाला घेवून १९७६ साली रवी टंडन यांनी संजीव कुमार माला सिन्हाला घेवून ‘जिंदगी’ हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. मराठीत मोहन जोशी – सुहास जोशी यांना घेवून याच कथेवरील ‘तू तिथं मी’ हा चित्रपट स्मिता तळवळकर यांनी बनवला होता. या सर्व सिनेमात टेलीफोनवरील संवादचा भावस्पर्शी प्रसंग आहे. बागबान मध्ये याच प्रसंगात अमिताभ भावूक होऊन गाताना दाखवला आहे.
====
हे देखील वाचा: ‘या’ कारणामुळे वहिदा रेहमान आणि राज खोसला पुन्हा कधीही एकत्र आले नाहीत
=====
तरी पण आपल्या मराठीतील राजा परांजपे यांचा मूळ सिनेमा ‘ऊन पाऊस’ हा नंतर आलेल्या सर्व सिनेमांहून अधिक काळजाला भिडतो. ‘या कातरवेळी पाहिजेस तू जवळी’, ‘खेड्यामधले घर कौलारू’ ही गाणी या चित्रपटात होती. या चित्रपटाच्या पारितोषिकाबाबतचा एक किस्सा सांगण्यासारखा आहे. हा सिनेमा १९५४ साली प्रदर्शित झाला त्या वेळी राष्ट्रीय पारितोषिकांची नुकतीच सुरूवात झाली होती. १९५३ साली बनलेल्या आ.अत्रे यांच्या ‘श्यामची आई’ला पहिला राष्ट्रीय पुरस्काराचा बहुमान मिळाला होता.
१९५४ साली अत्र्यांनी ‘महात्मा फुले’ हा चित्रपट बनविला व तो देखील राष्ट्रीय पुरस्कारांच्या स्पर्धेत दाखल झाला. मराठीत त्याला स्पर्धा होती राजा परांजपे यांच्या ‘ऊन पाऊस’ची. राष्ट्रीय पुरस्कारांच्या स्पर्धेतील चित्रपटाची कथा ओरीजनल असावी असा नियम होता. ‘ऊन पाऊस’ची कथा ‘मेक वे फॉर टूमारो’ वरून प्रेरणा घेवून लिहिली होती.
आचार्य अत्र्यांनी याच नियमाचा आधार घेत ‘मराठा’त या सिनेमावर लेख लिहिला. लेखाचा मथळा होता ‘चांगला पण चोरलेला!’ झालं, यामुळे ’ऊन पाऊस’ राष्ट्रीय पुरस्कारांच्या स्पर्धेतून बाद झाला. महात्मा फुले चित्रपटाला रौप्य पदक मिळाले. खरी गंमत पुढेच आहे.याच कथानकावर १९५९ साली ‘स्कूल मास्टर’ हा कन्नड सिनेमा बी आर पंथलू यांनी बनवला त्याला मात्र राष्ट्रीय पुरस्कार मिळाला!
मराठीत तमाशापटाची चलती असताना राजा परांजपे यांनी शहरी, मध्यमवर्गीय अभिजन वर्गातील कथांना पडद्यावर आणून यशस्वी करून दाखवले. बंगालमध्ये सत्यजित रे यांनी चोखाळलेला मार्गच त्यानी मराठीत पत्करला. दुर्दैवाने त्यांच्या कर्तृत्वाची दखल त्या काळात फारशी घेतली गेली नाही. आज राजा परांजपे यांच्या मृत्युनंतर ४३ वर्षानी त्यांचे स्मरण करताना आपण या मराठी सिनेमाच्या वैभवशाली वारशाला विसरता कामा नये!