राजेंद्रकुमार यांना मेहबूब यांचा मृत्यू आयुष्यभर लक्षात राहिला
हिंदी सिनेमाच्या इतिहासातील काही घटना कलाकारांच्या काळजाचा ठाव घेऊन जातात आणि आयुष्यभर त्यांच्या त्या लक्षात राहतात. अभिनेता राजेंद्र कुमार यांनी देखील एक आठवण अशीच आकाशवाणी वरील एका कार्यक्रमात शेअर केली होती. जी आठवण त्यांच्या काळजात आरपार रुतून बसली होती. राजेंद्र कुमार यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा चित्रपट म्हणजे ‘मदर इंडिया’. दिग्दर्शक मेहबूब यांचा महत्त्वकांक्षी चित्रपट. (Mehboob)
या चित्रपटानंतर राजेंद्रकुमार यांची कला कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरून निघाली. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात मेहबूब यांचे खूप महत्त्वाचे स्थान होते. ‘मदर इंडिया’ चित्रपटानंतर मेहबूब यांनी ‘सन ऑफ इंडिया’ या चित्रपटाची निर्मिती केली. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरला. या सिनेमाच्या अपयशाने मेहबूब पुरते कोलमडले. कारण तब्बल चार लाख रुपयांचे कर्ज त्यांच्या डोक्यावर झाले होते. या विवंचनेत असतानाच एकदा त्यांनी अभिनेता राजकुमार राजेंद्र कुमार यांना फोन केला. ती तारीख होती २६ मे १९६४. (Mehboob)
फोनवर मेहबूब यांनी असे विचारले,” बेटा राजेंद्रकुमार क्या तुम मुझे कल मिलने आ सकते हो?” राजेंद्रकुमार तेव्हा रामानंद सागर यांच्या ‘आरजू’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. परंतु दुसऱ्या दिवशी कुठलेही शूटिंग नसल्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी महबूब यांच्याकडे जायचे ठरवले. त्याप्रमाणे २७ मे १९६४ या दिवशी राजेंद्रकुमार आपल्या पत्नीसोबत मेहबूब यांच्या घरी त्यांना भेटायला गेले. घरी गेल्यानंतर राजेंद्र कुमार यांनी मेहबूब यांना वाकून नमस्कार केला आणि विचारले,” कैसे इस नाचीज को आपने याद किया?” त्यावर मेहबूब म्हणाले,” बेटा राजेंद्रकुमार, तुला माहीतच आहे माझा ‘सन ऑफ इंडिया’ चित्रपट पूर्णतः फ्लॉप झाला आहे.
या सिनेमाच्या अपयशाने माझ्या डोक्यावर चार लाख रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे. सावकार माझ्याकडून हे पैसे मिळवण्यासाठी आता दबाव टाकत आहेत. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मला चार लाख रुपये द्या. त्या बदल्यात मी तुम्हाला माझा मेहबूब स्टुडिओ तुमच्याकडे गहाण ठेवत आहे.” मेहबूब यांचे शब्द ऐकल्यानंतर राजेंद्र कुमार यांच्या काळजात चर्र झाले. पहाडासारखा माणूस आज कोलमडल्या सारखा दिसत होता. राजेंद्रकुमार म्हणाले,” तुम्ही मला एकीकडे आपला मुलगा मानता आणि दुसरीकडे व्यवहाराची भाषा करता. उद्या सकाळी मी तुम्हाला चार लाख रुपये आणून देतो. स्टुडिओ गहाण ठेवण्याची काहीही गरज नाही.” (Mehboob)
पण मेहबूब म्हणाले,” ते ठीक आहे. पण सध्या मी हृदयरोगाने त्रस्त आहे. केव्हा काय होईल कोणी सांगू शकत नाही. तेव्हा मी स्टुडिओ गहाण ठेवण्याचे कागदपत्र उद्या तयार ठेवतो तुम्ही मला पैसे द्या. मी मरण्यापूर्वी कर्जमुक्त होऊ इच्छितो आणि माझ्या मृत्यूनंतर माझ्या मुलांना देखील त्यांची जबाबदारी समजायला पाहिजे. जेव्हा स्टुडिओ तुमच्याकडे गहाण राहिला तर तो सुरक्षित राहील आणि माझी मुले ते कर्ज फेडून पुन्हा स्टुडिओ आपल्या ताब्यात घेतील!” राजेंद्र कुमार उठले आणि मेहबूब यांच्या गळ्यात पडले दोघांना अश्रू अनावर झाले होते. त्याच वेळी एक बातमी रेडिओवर त्यांना कळाली की भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना तीव्र हृदयाचा झटका आला असून त्यांना दवाखान्यात ऍडमिट केले आहे. मेहबूब ती बातमी ऐकून व्यथित झाले.
राजेंद्र कुमार घरी पोहोचेपर्यंत नेहरूंच्या मृत्यूची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचली होती. देशात सर्वत्र दुःखाचा महासागर लोटला होता. त्या रात्री राजेंद्र कुमार यांना झोप लागलीच नाही. दुपारी मेहबूब यांनी केलेली निरवानिरवी ची भाषा आणि नंतर पंडित नेहरू यांच्या निधनाची वार्ता यामुळे राजेंद्रकुमार रात्रभर झोपूच शकले नाहीत. पण खरा धक्का त्यांना सकाळी मिळणार होता. सकाळी सहा वाजता त्यांचा फोन खणखणला. पलीकडच्या बाजूने मेहबूब यांचे चिरंजीव अयुब खान बोलत होते. त्यांनी सांगितले,” पहाटे दोन वाजता अब्बा ना जोराचा हार्ट अटॅक आला. त्यांना लगेच आम्ही लीलावती रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांचे निधन झाले!” राजेंद्र कुमार यांच्या साठी हा फार मोठा धक्का होता. (Mehboob)
============
हे देखील वाचा : धर्मेंद्रला खऱ्या अर्थाने स्टारडम मिळवून देणारा सिनेमा !
============
दिग्दर्शक मेहबूब आणि नेहरू यांचे परस्परांशी खूप चांगले संबंध होते. पं.नेहरू यांच्या मृत्यूचा धक्का मेहबूब पचवू शकले नाहीत आणि त्यातच त्यांचे प्राणोत्क्रमण झाले. २८ मे १९६४ या दिवशी सकाळी ११ वाजता मेहबूब (Mehboob) यांच्या अंत्ययात्रा निघाली आणि खरंतर याच वेळी राजेंद्र कुमार त्यांना भेटून चार लाख रुपये देणार होते पण ती मदत देखील ते करू शकले नाही. मेहबूब यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलांनी त्यांचा मेहबूब स्टुडिओ खूप चांगल्या पद्धतीने सांभाळला आणि पुढच्या आठ दहा वर्षात त्यांनी सर्व कर्ज फेडून टाकले. राजेंद्र कुमार यांना मात्र आयुष्यभर आपण शेवटच्या क्षणी मिळवून यांना मदत करू शकलो नाही ही सल कायम राहिली.