दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
राजेश खन्ना १८ जुलै बारावा स्मृतिदिन
दिवस बघा कसे भरभर पुढे सरकताहेत. बरोबर बारा वर्षांपूर्वीचा १८ जुलै २०१२… मी साकी नाकाजवळील एस. जे. स्टुडिओत एका टी. व्ही. शोच्या सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी जात असतानाच बातमी समजली, माझ्या शाळा काॅलेजच्या काळातील आमचा “सुपरस्टार” राजेश खन्नाचे (Rajesh khanna) निधन…
राजेश खन्ना (Rajesh khanna) एकेकाळी आमच्या गिरगावात राह्यचा हे मी आयुष्यात अतिशय अभिमानाने सर्वाधिक वेळा उच्चारलेले वाक्य आहे. आमचं गिरगाव आहेच तसे (आता कोणी सांगेल होतं हो तसे आणि राजेश खन्नाची क्रेझही तशीच भारी होती. केवढे किस्से, गाॅसिप्स गोष्टी, कथा, दंतकथा काही विचारु नका. आजही त्या रंगवून खुलवून सांगितल्या जातात.) मी अगदी शालेय/महाविद्यालयीन वयापासून ते अगदी मिडियात येऊन हाताने खिळे लावण्याच्या पध्दतीपासून (पूर्वी वृत्तपत्र, मासिकाचे काम तसे चाले) ते आजच्या डिजिटल पिढीत झूमवर मुलाखत करेपर्यंत अनेक बदल अनुभवतोय. पण तरी ‘राजेश खन्ना मूळचा गिरगावकर हो’ हे आवर्जून सांगतोच.
मराठी भाषा, स्वाभिमान आणि बाणा याच्याशी गिरगावचे असलेले घट्ट नाते सर्वश्रृत आहे. आज डिजिटल युगात यू ट्यूबवरही ते दिसतेय. राजेश खन्नाचा (Rajesh khanna) जन्म पंजाबमधील अमृतसर येथील पण गिरगावात राजेश खन्ना शालेय वयापासून लहानाचा मोठा झाला, गिरगावातील ठाकूरव्दार नाक्यावरच्या सरस्वती निवासच्या तिसरा मजल्यावर तो आपल्या काका आणि काकीसोबत (त्यांचा तो दत्तक मुलगा) राहू लागला. तेथून जवळच असलेल्या सेंट सॅबॅस्टियन हायस्कूलमध्ये त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले (आजही ही शाळा राजेश खन्नाची शाळा म्हणून ओळखली जाते हे विशेष.) आणि मग चर्चगेटच्या के. सी. काॅलेजमध्ये त्याने उच्च शिक्षण घेतले.
अशातच टाईम्स ग्रुपच्या फिल्म फेअरने युनायटेड पोड्युसरच्या संयुक्त विद्यामाने घेतलेल्या नवीन चेहरे पाहिजेत स्पर्धेत तो पहिल्या क्रमांकाने जिंकताच त्याला सर्वप्रथम निर्माते जी. पी. सिप्पी यांनी ‘राज‘ ( १९६७) साठी साईन केले तर चेतन आनंद दिग्दर्शित ‘आखरी खत‘ (१९६६) हा त्याचा प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट ठरला. मग नौनिहाल, औरत, डोली वगैरे चित्रपट पडद्यावर आले, ‘आराधना‘ (१९६९) गिरगावातील राॅक्सी थिएटरमध्ये रिलीज झाला आणि फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच पब्लिकने डोक्यावर घेतला आणि काही आठवड्यातच राजेश खन्नाने गिरगाव सोडले आणि तो वांद्र्याच्या कार्टर रोडवरील राजेन्द्र कुमारकडून विकत घेतलेल्या ‘डिंपल’ नावाच्या बंगल्यात राह्यला जाताना त्याचे नाव त्याने ‘आशीर्वाद’ केले.
राजेश खन्नाच्या सुपर स्टार क्रेझवर कितीही लिहिले, सांगितले, ऐकले, पाहिले, मुलाखती दिल्या तरी त्या गप्पांना शेवट नाही.
मी मिडियात आल्यावर ज्यांना पहावे, भेटावे असे अतिशय उमाळ्याने वाटत होते त्यात राजेश खन्नाला प्रचंड प्रायोरीटी होती हे वेगळे ते काय सांगायचे?
राजेश खन्ना (Rajesh khanna) आणि टीना मुनिम यांच्या भूमिका असलेल्या विजय सदनाह दिग्दर्शित ‘अधिकार‘ (१९८६) या चित्रपटाच्या जुहूच्या एका प्रशस्त बंगल्यातील मुहूर्ताचे आमंत्रण हाती आले आणि कधी बरे तो दिवस उजाडतोय आणि राजेश खन्नाचे दर्शन घडतेय असे झाले. राजेश खन्ना अगदी सवयीने आणि आठवणीने सेटवर उशिरा येतो हे माहित असले तरी मी वेळेपूर्वी गेलो. काय सांगावं, आज नेमका वेळेवर यायचा. अखेर दीड दोन तासांनी अतिशय आलिशान गाडीतून तो आला. लगेचच निर्माते आणि दिग्दर्शक पुढे झाले. थोड्या वेळाने अलगद दरवाजा उघडला गेला आणि प्रसन्न हसतच राजेश खन्ना उतरला.
ज्याला आपण आराधना (राॅक्सी थिएटरमध्ये), दो रास्ते (ऑपेरा हाऊस), हाथी मेरे साथी (नाॅव्हेल्टी), अपना देश (लिबर्टी), सच्चा झूठा (शालिमार), अमर प्रेम (राॅक्सी,कटी पतंग (राॅक्सी), नमक हराम (नाॅव्हेल्टी), अजनबी (लिबर्टी), दाग (मिनर्व्हा), आनंद (स्वस्तिक)….. वगैरे वगैरे बरेच चित्रपट गिरगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील थिएटरमध्ये पाहिले आणि आपणही ज्याच्या व्यक्तिमत्व, स्टाईल, मॅनॅरिझम यांवर फिदा झालो तो साक्षात माझ्यापासून काही फुटांवर होता हे जणू स्वप्नच वाटत होते. पण तेच खरे याचे भान मला पत्रकार म्हणून सोडता येत नव्हते. हे चांगले की वाईट काय माहीत?
त्यानंतर कधी या अथवा आखिर क्यू, अमृत, नजराना इतर चित्रपटाच्या सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी आणि त्याची भूमिका असलेल्या उंचे लोग वगैरे चित्रपटांच्या मुहूर्ताला त्याचे लाईव्ह दर्शन घडले आणि तेच लिहिले (त्या काळात चित्रानंद साप्ताहिकात मी ‘शूटिंगचा ऑखो देखा हाल’ असे वाचकप्रिय सदर लिहित होतो… लोकप्रभात तर अनेक विषयांवर भरभरुन लिहिले.
त्याच्या भेटीचे दोन अनुभव सांगायला हवेत.
खार येथे त्याच्या निर्मिती संस्थेचे कार्यालय होते आणि त्याचा सेक्रेटरी अच्चा आनंद अथवा पब्लिसिस्ट संदीप शर्मा राजेश खन्नाच्या (Rajesh khanna) भेटीचे आयोजन करीत. त्या काळातील चित्रपटसृष्टीतील सेक्रेटरी, पीआरओ “मैत्रीपूर्ण” वागत. ‘मिलते रहो” हा त्यांचा आवडता शब्द. साधारण बारा वाजताची वेळ असे. समोर सगळी फिल्मी मॅगझिन, अनेक वृत्तपत्रे असली तरी लोकसत्ता लक्ष वेधून घेई (कधी काळी तो गिरगावात राहिल्याचा हा परिणाम असावा) तेवढ्यात मोठ्या ग्लासात गरम चहा येई. त्या दिवशी नशीब चांगले असेल तर त्यात ड्रायफूट कुटून टाकलेली असत. आले किती असायचे ते विचारु नका. तो सावकाश पिऊन झाला. मासिके चाळून झाली. एक वाजला तरी राजेश खन्ना आलेला नसे. माझी एकाच वेळेस चुळबुळ आणि धकधक वाढते. त्या काळात लहान मोठे कलाकार एकाच दिवशी एकच सविस्तर मुलाखत देत. त्यांचा फोकस स्पष्ट असे.
अखेर दीड वाजता तो येतो आणि थेट आपल्या केबिनमध्ये जातो. आम्हा दोघांत आता काही श्वासांचे अंतर असेच म्हणतो.
कानावर निरोप पडतो, साबने बुलाया है… केबिनचा दरवाजा हळूच उघडून आत जातो आणि तोंडातून शब्दच फुटत नाही. अवती भवती सगळीकडे त्याच्या सुपर हिट चित्रपटाच्या ट्राॅफीज, फिल्म फेअर पुरस्कार, आणखीन काही पुरस्कार यावर नजर टाकू की राजेश खन्नाच्या (Rajesh khanna) नजरेला नजर देऊ? गोष्ट छोटी वाटते. पण खूप महत्वाची. लाईव्ह म्हणा.
राजेश खन्नाने एव्हाना माझी परिस्थिती ओळखलेली असते. आतापर्यंत त्याने ढीगभर मुलाखती दिलेल्या असतात. मी महाराष्ट्रीय आहे आणि मराठी वृत्तपत्रांतून लिहितोय हे लक्षात येताच तो मराठीत बोलू लागला. अशातच माझ्या तोंडून बाहेर पडले, मी देखिल गिरगावकर…. राजेश खन्ना (Rajesh khanna) यावर छान मनापासून हसला आणि चक्क तासभर मुलाखत दिली. नंतर मात्र हिंदीत बोलू लागला, मध्येच स्वगत म्हणून पंजाबी शिवी हासडू लागला. अशातच आणखीन एकदा चहा झाला. राजेश खन्नाची ‘पहिली भेट’ ही अशी. एक अनुभव म्हणावा तशी. राजेश खन्नाच्या ऑफिसामधील चहा यावर मी एक स्वतंत्र लेख लिहिला. मोठ्या स्टार्सच्या छोट्या छोट्या गोष्टीही लिहायच्याच असतात.
त्यानंतर १९८८ साली त्याने निर्मिलेल्या ‘जय शिव शंकर‘ या चित्रपटाच्या मुहूर्ताचे आमंत्रण हाती येताच त्यात राजेश खन्ना आणि डिंपल हे एकत्र भूमिका करणार असे म्हटल्याचे सुखद धक्का होता (आजच्या ग्लोबल युगात ती ब्रेकिंग न्यूजच.) याचे कारण म्हणजे ते तेव्हा वेगळे राहत होते. गाॅसिप्स मॅगझिनमधून त्यावर तिखट मीठ मसाला हिंग खारट जिरं टाकून बरेच काही लिहिले जात होते. राजेश खन्ना आणि त्याच्या पत्नीच्या बिघडलेल्या संबंधावर ते होते हो. ते अळणी पुचाट कसे असेल? हा चित्रपट पूर्ण होवून, पोस्टर्स लागूनही थिएटरमध्ये रिलीज झाला नाही.
येथे एक छान आठवण सांगतो. लग्नानंतर काही दिवसांनी राजेश खन्ना (Rajesh khanna) आपल्या या स्टार पत्नीला घेऊन सरस्वती निवासमधील आपले जुने घर दाखवायला गिरगावात आल्याची बातमी अशी काही पसरली की ठाकूरव्दार, मुगभाट परिसरात प्रचंड गर्दी उसळली. त्याची तेव्हा क्रेझच तशी होती. आता बाहेर पडणार कसे? जवळपास पहाटेपर्यंत थांबून एकदाचे ते दोघे तेथून निघाले. मराठमोळ्या गिरगावात राहिल्याने राजेश खन्ना चांगले मराठी बोलायचा तसेच डिंपलचेही मराठी उत्तम आहे.
शक्ती सामंता दिग्दर्शित ‘अलग अलग‘ (१९८५) च्या निर्मितीनंतर राजेश खन्ना आता एस. व्ही. चंद्रशेखर दिग्दर्शित ‘जय शिव शंकर’ची निर्मिती करीत असताना त्याने अंधेरीवरुन गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीपर्यंत आम्हा सिनेपत्रकारांसाठी विशेष बसचे आयोजन केले. तिकडे देवळात हा मुहूर्त होता आणि राजेश खन्ना आणि डिंपल खूप वर्षांनी एकत्र दिसणार म्हणून आम्ही सिनेपत्रकार तसेच फोटोग्राफर जणू आम्ही दबा धरुन बसलो होतो.
==========
हे देखील वाचा : पती व पत्नी संबंधावरील “आविष्कार”ची पन्नाशी वैशिष्ट्यपूर्ण
==========
राजेश खन्ना (Rajesh khanna) स्वतः या चित्रपटाचा निर्माता असला तरी नारिंगी साडीतील डिंपल अगोदर आली आणि मग राजेश खन्ना आला ( या छोट्याश्या गोष्टीचीही मोठी बातमी झाली हो!). आता राजेश खन्ना निर्मात्याच्या भूमिकेत असल्याने त्याने आम्हा प्रत्येक सिनेपत्रकाराला हस्तांदोलन केले, छान हसला. या चित्रपटात जितेंद्र, पूनम धिल्लाॅ, चंकी पांडे यांच्याही भूमिका आहेत.
या मुहूर्ताचा लांबलेला सोहळा पार पडल्यावर आणि अनेक पाहुणे निघून गेल्यावर राजेश खन्ना पुन्हा आम्हा सिनेपत्रकारांजवळ आला आणि औपचारिक गप्पा झाल्या. त्यातही तो ‘मी राजेश खन्ना आहे’ हे अजिबात विसरला नाही आणि आम्हालाही तसा विसर पडू दिला नाही…
असो. प्रभाकर निकळंकर दिग्दर्शित ‘सुंदरा सातारकर‘ या मराठी चित्रपटातही त्याने पाहुणा कलाकार म्हणून भूमिका साकारली. त्याच्या हिंदी चित्रपटाच्या सेटवर त्याला भेटायला आलेल्या महाराष्ट्रीय पत्रकार/फोटोग्राफर्सशी तो आवर्जून मराठीत बोलायचा. सतत वलयात वावरायची त्याला सवय लागली होती तरी त्याचे असे गुण महत्वाचे आहेत. त्याच्या निधनाच्या वेळची (१८ जुलै २०१२) एक आठवण. मी त्यावेळी वांद्र्याच्या कार्टर रोडवरील त्याच्या आशिर्वाद बंगल्याबाहेरील गर्दीत असताना एकेक करत सर्वच मराठी वृत्तवाहिन्यांशी राजेश खन्नावर बोलत होतो.
याच आशीर्वाद बंगल्याबाहेर एकेकाळी मी देखिल ‘एक फॅन’ म्हणून राजेश खन्नाचे तो गाडीतून बाहेर पडेल अथवा येईल आणि त्याचे दर्शन घडेल अशा भाबड्या आशेने आणि स्वप्नाळू भावनेने उभा असे हेदेखील म्हटले. अशातच एबीपी माझा या मराठी उपग्रह वृत्त वाहिनीचा स्पेशल रिपोर्ट करणारा अश्विन बापटचा फोन आला, आपण राजेश खन्नाच्या गिरगावातील घरी जाऊन स्पेशल स्टोरी करुयात….. कल्पना अतिशय चांगली आणि एक्स्युझिव्हज असल्याने मी हो म्हणालो. जाताना अगोदर राॅक्सी थिएटरबाहेर थांबून कव्हरेज केले.
==========
हे देखील वाचा : दिलीप कुमार दिग्दर्शित “कलिंगा” पाह्यला मिळणार….
==========
राजेश खन्नाची (Rajesh khanna) भूमिका असलेल्या बहारो के सपने, आराधना, अमर प्रेम, कटी पतंग, अनुरोध या चित्रपटांनी येथे यश संपादले तर त्याची भूमिका असलेले ‘फिर वही रात’, ‘रेड रोझ’, अगर तुम न होते, ‘नसिहत’ येथे रिलीज झाल्याच्या आठवणी मी सांगितल्या आणि मग आम्ही सरस्वती निवासला गेलो आणि या मराठी वृत्तवाहिनीसाठी अतिशय वेगळे नि एक्स्युझिव्हज कव्हरेज केले. तेव्हा माझ्या बोलण्यात सतत, राजेश खन्ना आमच्या गिरगावात राह्यचा हे आवर्जून आले…
‘राजेश खन्नाचे गिरगाव कनेक्शन’ असा तो अर्ध्या तासाचा शो रंगला. पुन्हा पुन्हा दाखवला गेला. हे कव्हरेज अगदी वेगळे होते. विशेष म्हणजे अगदी आजही गिरगावातील राजेश खन्नाच्या घराच्या गॅलरीत त्याचे काका चुनीलाल खन्ना, रेल्वे काॅन्ट्रॅक्टर असा फलक कायम असून गिरगावातील मराठी माणसे नवीन पिढीला सांगते, राजेश खन्ना पूर्वी गिरगावात राह्यचा….. आणि जगभरात कुठेही असलेल्या मूळ गिरगावकराला याचा विलक्षण अभिमान वाटतोच वाटतो. आजही प्रत्येक गोकुळाष्टमीला ठाकुरद्वारला सरस्वती निवासला राजेश खन्नाच्या (Rajesh khanna) नावाची दहीहंडी असते आणि त्याची बातमी होते आणि हवे तरी काय? राजेश खन्नाच्या स्मृतिदिनानिमित्त सांगावे तेवढे थोडेच. इस्टमनकलर सुपर स्टार होता हो तो.