राजेश खन्नाचा ‘हा’ शेवटचा प्रदर्शित झालेला सिनेमा
भारतीय हिंदी सिनेमातील पहिला ऑफिशियल सुपरस्टार राजेश खन्ना याने सलग १६ सिल्वर जुबली सिनेमी देऊन एक रेकॉर्ड निर्माण केले आहे जे आज देखील कायम आहेत. १९६९ ते १९७४ हा पाच वर्षाचा काळ राजेश खन्नासाठी मंतरलेल्या काळात या काळातील त्याचे अगदी टुकार सिनेमा (शहजादा) देखील प्रचंड यशस्वी झाले या काळात अक्षरशः राजेश खन्ना (Rajesh Khanna) ‘मिडास’ झाला होता तो ज्या सिनेमाला स्पर्श करत होता तो सुपरहिट होता. पण काळ सदैव कायम नसतो. दिवसानंतर रात्र येतच असते. तसाच काहीसा प्रकार राजेश खन्नाच्या बाबत झाला. १९७३ साली प्रकाश मेहरा यांचा ‘जंजीर’ प्रदर्शित झाला आणि नवीन सुपरस्टारचा जन्म झाला. राजेश खन्नाचे ‘रोटी’ ‘अविष्कार’,’प्रेम कहानी’ हे चित्रपट हळूहळू लोकप्रियता विसरत चालले होते. राजेश खन्नाचा सुपरस्टार पदाचा अस्त होत होता पण राजेश खन्ना मात्र हे मान्य करायला कधीच तयार नव्हता. त्याचा रुतबा. त्याची ऐट, त्याचा एटीट्यूड हा कायम आपण सुपरस्टार आहोत असाच असायचा. सिनेमाच्या शूटिंग लेट जाणे, पत्रकारांना मोठमोठ्या गप्पा मारणे, आपण अजून संपलेलो नाहीत हे सदैव तो दाखवून द्यायचा. हे तो स्वत: किती जरी मानत असला तरी राजेश खन्ना सुपरस्टार म्हणून संपला होता हे नक्की. तरीही त्या काळात ‘थोडीशी बेवफाई’, ‘सौतन’, ‘आखिर क्यूं’ या चित्रपटातून तो त्याच्या जुन्या अभिनयाची झलक दाखवत होता.
अमिताभ बच्चन तेव्हा सुसाट वेगात धावत होता. त्याच्या सिनेमांचा एकामागून एक लोकप्रियतेचा उच्चांक गाठला जात होता. राजेश खन्ना (Rajesh Khanna) हे सर्व पाहत होता. त्याच्या मनाला हे सर्व पटत होतं पण मान्य होत नव्हतं. त्यामुळे तो अट्टाहासाने अमिताभ बच्चन ला कॉपी करायचा प्रयत्न करत असे. अमिताभ सारखे सिनेमे त्याला करायचे होते. त्यामुळे बऱ्याचदा त्याचे प्रयत्न हास्यास्पद व्हायचे. अमिताभ बच्चन याने ‘चिनी कम’ (२००७) हा एक चित्रपट केला होता. या सिनेमात एका अल्पवयीन मुलीच्या तो प्रेमात असलेला दाखवला होता. दोघांच्या वयामध्ये प्रचंड अंतर असून देखील त्यांची प्रेम कहानी दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमात झाला होता. राजेश खन्नाने देखील लगेच याच टाईपचा एक सिनेमा करायचे ठरवले. चित्रपट होता ‘वफा: अ डेडली लव्ह स्टोरी’. (२००८) जर अमिताभ करू शकतो तर मी का नाही? असा त्याचा प्रश्न होता. पण अक्षरशः हास्यास्पद असा सिनेमा झाला होता !
राजेश खन्ना (Rajesh Khanna) स्वतः कधीच मान्य करत नव्हता; मी संपलो आहे. त्याच्यातला एटीट्यूड हा कायम जिवंत असायचा. अमिताभ राजकारणात आला पाठोपाठ राजेश देखील. राजेश खन्नाच्या फॅमिलीमध्ये प्रचंड प्रॉब्लेम झाले. ऐंशीच्या दशकात डिंपल कापडिया त्याच्यापासून वेगळी राहू लागली. नव्वद च्या दशकात राजकारणात जाण्याचा त्याचा एक प्रयत्न झाला पुन्हा तो चित्रपटात आला पण आता तो राजेश खन्ना राहिला नव्हता हे कधीच त्याने समजून घेतले नव्हते. त्यामुळे अट्टाहासाने देव आनंद प्रमाणे तो रसिकांच्या समोर येऊ लागला. या काळात त्याचा आशीर्वाद बंगला हा इन्कम टॅक्स ने सील करून टाकला होता. लिंकिंग रोडवरील ऑफिसमध्येच तो राहत होता. या काळात त्याचे पिणे बेसुमार वाढले होते यातून तब्येतीच्या प्रॉब्लेम सुरू झाले होते. पण राजेश खन्ना ला कसलीच तमा नव्हती. ‘मी सुपरस्टार होतो, आहे, आणि राहणार!’ या एटीट्यूड मध्ये तो कायम वावरत होता.
दिग्दर्शक अशोक त्यागी यांची एक मुलाखत विविध भारतीवर झाली होती. त्यांनी राजेश खन्नाच्या एका चित्रपटाची आठवण त्यात सांगितली होती. दुर्दैवाने हा राजेश खन्नाचा (Rajesh Khanna) शेवटचा रिलीज झालेला सिनेमा ठरला. सिनेमाचे नाव होते ‘रियासत’. राजेश खन्नाच्या मृत्यूनंतर दोन वर्षांनी म्हणजे १२ जुलै २०१४ या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपट अतिशय सुमार झाला होता. राजेश खन्नाने यात प्रमुख भूमिका निभावली होती. हा सिनेमा हॉलिवूडचा क्लासिक ‘गॉड फादर’ यावर याची कथा आधारीत होती. याच कथानकावर अमिताभ बच्चन यांनी २००५ मध्ये ‘सरकार’ या चित्रपटात भूमिका केली होती. पुन्हा राजेश खन्ना यांचा इगो जागा झाला. जर अमिताभ ‘सरकार’ मध्ये ‘गॉड फादर’ रंगवू शकतो तर मी का नाही असे म्हणून त्यांनी अशोक त्यागी यांना हा चित्रपट बनवायला भाग पाडले. हा चित्रपट करताना राजेश खन्ना पुरता थकला होता. तब्येत साथ देत नव्हती. आवाज निघत नव्हता. पण हट्टाने त्याने हा चित्रपट बनवला. अक्षरशः पाच ते सहा महिन्यात राजेश खन्ना वरील सर्व शूटिंग अशोक त्यागी यांनी पूर्ण केले.
=============
हे देखील वाचा : मनोज कुमारमुळे बदललं प्रेम चोप्रा यांचं आयुष्य
=============
जून २०११ मध्ये राजेश खन्नाची तब्येत खूपच बिघडली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागले. या काळात अशोक त्यागी त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांनी चित्रपट लवकरात लवकर पूर्ण करा अशी विनंती केली. याच काळातील एक आठवण अशोक त्यागी यांनी मुलाखतीत सांगितली होती. एकदा सिनेमाचे शूटिंग संपल्यानंतर राजेश खन्ना आपल्या गाडीतून अशोक त्यागीना घेऊन ‘आशीर्वाद’ या बंगल्याच्या समोर येऊन थांबला. तेव्हा तो बंगला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने सील केला होता. तेथील एका बेंचवर बसून त्याने सांगितले की ‘इथे हजारो प्रेक्षक चाहते रोज माझी एक झलक पाहण्यासाठी वाट पाहत असायचे’ अशोक त्यागी म्हणाले,” थांबा आपला चित्रपट प्रदर्शित होऊ द्या. तुमचे ते सर्व चाहते पुन्हा तुमच्याकडे येतील!” तेव्हा राजेश खन्नाने हलके स्मित केले होते पण त्यांचे डोळे मात्र पाणावले होते. १८ जुलै २०१२ या दिवशी राजेश खन्नाचे कॅन्सरने निधन झाले. त्यानंतर या सिनेमाच्या राहिलेले चित्रीकरण रखडले गेले आणि कसाबसा दोन वर्षांनी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि दोन दिवसात तिथून उतरवावा लागला. आज राजेश खन्नाचा शेवटचा चित्रपट अशीच या सिनेमाची आठवण उरली आहे !