Bollywood Movies : महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी बॉलिवूडच्या सुपरहिट चित्रपटांचं झालंय

Ram Gopal Varma : ‘जंगल’ चित्रपटाची पंचवीशी…
नव्वदच्या दशकातील दिग्दर्शक रामगोपाल वर्मा एकदम भारी होता, इतरांपेक्षा वेगळाच होता….. केवढी तरी विविधता त्याच्या दिग्दर्शनातील चित्रपटात दिसायची. ‘द्रोही’, ‘रंगीला’, ‘दौंड’, ‘सत्या’, ‘कंपनी’, ‘रात’, ‘भूत’, ‘सरकार’, ‘सरकारराज’ या नावातच त्या चित्रपटांचे वैशिष्ट्य व व्यक्तिमत्त्व दिसते. अनेक लहान मोठ्या कलाकारांना आपण रामूच्या चित्रपटात लहान मोठी भूमिका साकारावी असे मनोमन वाटे आणि ते रामूच्या ‘फॅक्टरी’ या नावापासूनच वेगळेपण असलेल्या कार्यालयात जाऊन रामूला भेटत. त्यात अनेक मराठी कलाकारही असत. रामूची पारख अतिशय उत्तम असल्यानेच आपल्याला त्याच्या दिग्दर्शनातील चित्रपटात एखादी भूमिका नक्कीच मिळेल असा विश्वास असे.

काही मराठी कलाकार रामूची रोखून पाहणारी नजर, तीक्ष्ण स्मरणशक्ती, त्याच्या बोलण्यात दिसणारा त्याचा सिनेमा याचे विशेष कौतुक करतात. त्या काळात रामूचा विलक्षण दबदबा होता. नव्वदच्या दशकात बदलत चाललेल्या हिंदी चित्रपटावर रामूचा प्रभाव होता. रामूचा वाटा होता. त्याचा असाच एक चित्रपट ‘जंगल’. मुंबईत प्रदर्शित १४ जुलै २०००. म्हणजेच आता पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत. मुंबईत मेन थिएटर इरॉस होते. रामूचे फेवरेट.
या चित्रपटाची गोष्ट त्याच्या नावातच आहे. अतिशय उत्साहात जंगल सफारीला गेलेल्यांचे एक खौफनाक, क्रूर डाकू दुर्गा नारायण चौधरी (सुशांत सिंग) अपहरण करतो. पर्यटकांत प्रेमी युगुलांसह (फरदीन खान व उर्मिला मातोंडकर) आणखीन बरेच जण असतात. प्रत्येकाचे भटकंतीला येण्याचे कारण वेगळे. आणि याच प्रत्येकाची डाकूंना घाबरण्याची पद्धतही वेगळी. या चित्रपटाचे लेखन जयदीप साहनी यांचे आहे. चित्रपट थोडासा पसरट झाला आहे. रामूकडून असे व्हावे हे आश्चर्य. जंगलातील वातावरण, त्यात पिकनिकचा मूड आणि अचानक डाकू व त्यांच्या टोळीचा हल्ला, त्यांच्या तावडीतून सुटण्याचा आटापिटा वा प्रयत्न, पोलिसांकडून होणारी कारवाई यात उडालेली घाबरगुंडी असा घटनाक्रम आपली उत्सुकता वाढत वाढत नेतो.अशा पध्दतीच्या घडलेल्या गोष्टींवर आधारित हा चित्रपट आहे. आजच्या भाषेत ज्याला आपण वन टाईम वॉच म्हणतो तसा हा चित्रपट एकदा नक्कीच पाहायला हवा.

================================
हे देखील वाचा: दादा कोंडके यांचे दोन गुरु भालजी आणि बाळासाहेब!
=================================
रामूच्या दिग्दर्शनातील एक रोमांचक चित्रपट म्हणून तरी पाह्यला हवा. चित्रपटात उर्मिला मातोंडकर, फरदीन खान, सुनील शेट्टी, राजपाल यादव, मकरंद देशपांडे, काश्मिरा शहा, राजू खेर, स्वाती चिटणीस, विजय राज, हिमांशु मलिक इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष उल्लेखनीय गोष्ट नवाजुद्दीन सिद्दीकीचीही छोटीशी भूमिका आहे. तोपर्यंत तो नावारुपास आला नव्हता. विजयकुमार अरोरा यांचे छायाचित्रण व चंदन अरोराचे संकलन यांचाही उल्लेख हवाच. खऱ्याखुऱ्या जंगलात जाऊन चित्रीकरण केल्याने एका वेगळ्याच वातावरणाचा फिल आला. रामूची ती खासियत. थीमनुसार प्रत्यक्षातील स्पॉट घ्यायचे. मग कितीही मेहनत लागू देत, वेळ जावू देत, बजेट वाढत राहू देत. तो त्याकडे दुर्लक्ष करीतच आपल्या चित्रपटावर लक्ष केंद्रित करतोय हे स्पष्टपणे पडद्यावर दिसे. त्याने आपल्या अनेक सहाय्यक दिग्दर्शकांनाही स्वतंत्र दिग्दर्शनाची संधी दिली..

रामगोपाल वर्माच्या दिग्दर्शनाचा खूपच मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. ‘भूत’ प्रदर्शित व्हायच्या दिवसापर्यंत त्यात असलेली चार गाणी त्याने चित्रपटाची लांबी वाढतेय, चित्रपटाची दाहकता कमी होतेय हे लक्षात येताच कापली. आपला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचेपर्यंत रामू त्यावर काम करत असे. चित्रपटाचा व चित्रपट रसिकांना विचार करत असे. तो उगाच यशस्वी ठरला नाही. तो इतरांपेक्षा सर्वच बाबतीत वेगळा. ‘सत्या’ मध्ये ट्रायलच्या वेळेस असलेले एक प्रेमगीत अनावश्यक वाटल्याने त्याने कापले.
रामूचे चित्रपट कधी फसतही.’मस्त’ चित्रपट तसा होता. ती फॅण्टसी तशीच. याच रामूने रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ ची रिमेक करण्याचा अनावश्यक अट्टाहास केला तेथेच तो फसला. ‘रामगोपाल वर्मा की आग’ या नावाने हा चित्रपट त्याने पडद्यावर आणला. कधी नव्हे ते भरमसाठ मुलाखती दिल्या (तोपर्यंत त्याचे चित्रपट जास्त बोलत,चांगले बोलत) चित्रपट मात्र आग न ठरता शेकोटी ठरला. पडद्यावर येताच बिझला हा चित्रपट आणि एका अतिशय चतुरस्र, गुणी, फोकस्ड दिग्दर्शकाची उतरंड सुरु झाली. त्यानंतर त्याच्या दिग्दर्शनातील चित्रपटापेक्षा त्याचे ट्वीट वादग्रस्त ठरु लागले. रामूचे हे वेगळेच रुपडं होतं.
================================
हे देखील वाचा: दादा कोंडके यांची हिंदीतील भन्नाट मुशाफिरी…
=================================
या त्याच्या दिग्दर्शनातील चित्रपटात ‘नायक’ या चित्रपटाची भर पडायची दुर्दैवाने राहिली. या चित्रपटात संजय दत्त, उर्मिला मातोंडकर, अजिंक्य देव व अश्विनी भावे यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हैदराबादला एक भारी चित्रीकरण सत्रही पार पडले. पण मुंबईतील बाॅम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तला दुसर्यांदा अटक झाल्याने हा चित्रपट पहिल्याच चित्रीकरण सत्रानंतर बंद पडला. (अनिल कपूरने भूमिका साकारलेला ‘नायक’ चित्रपट वेगळा. हे केवळ नामसाम्य.) ‘जंगल’चित्रपटाच्या प्रदर्शनास पंचवीस वर्ष पूर्ण होत असतानाच सर्वप्रथम आठवतो तो दिग्दर्शक रामगोपाल वर्मा…हेच त्याचे यश आहे.