‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
राम जन्मला गं सखे राम जन्मला…
उद्या रामनवमी! प्रभू रामचंद्राचा जन्मदिन. त्यानिमित्ताने गीतरामायणातील (Geetramayana) रामजन्माच्या गाण्याचा हा किस्सा. हे वर्ष गीतरामायणाचे अडूसष्टावे वर्ष आहे. पुणे आकाशवाणी केंद्रावर १९५५-५६ या वर्षी एकाच कवीने (गदीमा) रचलेला व एकाच संगीतकाराने (सुधीर फडके) स्वरबध्द केलेला हा आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेवाद्वितिय सांस्कृतिक होता. सारे रसिक श्रोते रविवारी सकाळी स्नान करून रेडीओला हार घालून उदबत्ती लावून मोठ्या भक्ती भावाने याचा आनंद घेत असत. या गीतरामायणाच्या (Geetramayana) कार्यक्रमाचे खूप काही किस्से आहेत. त्याच्या पहिल्याच भागातील एक किस्सा याच सदरात आपण मागच्या आठवड्यात वाचला होता. आज आणखी एक.
गीतरामायणातील (Geetramayana) सहावे गीत श्रीरामाच्या जन्माचे होते. या गीताला एक अनन्य साधारण महत्व होते. गदीमा मोठ्या उत्साहाने आपल्या पंचवटी बंगल्यामध्ये तुळशी वृंदावनाच्या शेजारी गीत लिहायला बसले. पण मनासारखे शब्द काही सुचत नव्हते. मनात शब्दांचा ओघ दाटून येत होता पण कागदावर मनासारखं उतरत नव्हतं. अयोध्या नगरीतील आपल्या राजपुत्राची आतुरतेने वाट पाहणारे निवासी, मातृत्वाच्या ओझ्याने वाकलेली कौसल्या माता, रामाच्या जन्माने चराचरात पसरलेलं चैतन्य… या भावना गीतात आणण्यासाठी गदीमाची लेखणी सज्ज झाली होती पण हवं ते त्यातून उमटत नव्हतं..गदीमा लिहिलेलं आवडलं नाही कि त्या लिहिलेल्या कागदाचे बोळे करून टाकत होते… हवे ते शब्द काही लेखणीतून स्त्रवत नव्हते. गदीमा आता वैतागले. आता रात्रीचे दोन वाजून गेले होते. कां कां शब्द माझ्या पासून दूर जाताहेत? गदिमा अस्वस्थ पणे येरझरा मारीत होते. कागदांच्या बोळ्याचा खच झाला होता. गदिमांची पत्नी विद्याताईंना ज्या आधीच झोपल्या होत्या त्यांना मध्येच जाग आली. गदीमांचा अवतार बघून त्या म्हणाल्या ’ अहो काय झालयं? झोपा आता..पहाट व्हायची वेळ झालीय.’ झालं..गदीमा आधीच वैतागले होते त्यात पुन्हा हा घरचा आहेर! ते चिडून विद्याताईंना म्हणाले ’ इथे गजानन माडगूळकरांचा जन्म होत नाहीए..प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र जन्म घेणार आहेत.. तेव्हा तेवढ्या प्रसव वेदना मला सोसाव्या लागतीलच नं? तू जा आणि निवांत झोप. माझं काम मला करू दे’ विद्याताई निरूत्तर झाल्या व बिचाऱ्या पुन्हा झोपायला निघून गेल्या. पहाटेच्या रामप्रहरी गदीमांची थंड वाऱ्याच्या लहरीने रूसलेली प्रतिभा जागी झाली आणि त्यांची लेखणी लिहू लागली.
“चैत्रमास,त्यात नवमी हि तिथी,
गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती
दोन प्रहरी कां ग शिरी सूर्य थांबला,
राम जन्मला ग सखे राम जन्मला….”
ज्या शब्दांसाठी गदिमा तळमळत होते ते अखेर आले. आणि एका अप्रतिम गीताचा जन्म झाला. ६ मे १९५५ रोजी हे गीत आकाशवाणी वरून प्रसारीत झालं. सुधीर फडके यांनी मिश्र मांड रागात स्वरबध्द केलेलं हे गीत त्यावॆळी जानकी अय्यर, सुमन माटे, कालिंदी केसकर यांनी गायलं होतं. गीतरामायणातील रामजन्माच्या या गीताची ही कथा ही आठवण गदिमा यांच्या वेबसाईटवर दिली आहे. प्रभाकर जोग यांनी देखील त्यांच्या पुस्तकात याचा उल्लेख केला आहे.
=====
हे देखील वाचा : जेव्हा गीतरामायणाचे पहिलेच गीत हरवते तेव्हा…
=====
तब्बल आठ कडवी असलेलं हे गीत ग दि माडगुळकर यांनी झरझर एक टाकी लिहून काढले. या गीतातील शब्द सौंदर्य पहा. किती अप्रतिम आणि चपखल शब्द त्यांनी वापरले आहेत ! नुसतं वाचलं ऐकलं तरी डोळ्यापुढे चित्र उभे राहते. (गीताचे शब्द गुगल वरून साभार)
चैत्रमास त्यांत शुद्ध नवमी ही तिथी
गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती
दोन प्रहरी का गं शिरीं सूर्य थांबला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
कौसल्याराणि हळूं उघडि लोचनें
दिपुन जाय माय स्वतः पुत्रदर्शनें
ओघळले आंसु सुखे कंठ दाटला
ओघळले आंसु सुखे कंठ दाटला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राजगृहीं येई नवी सौख्य पर्वणीसौख्य पर्वणी
पान्हावुन हंबरल्या धेनू अंगणी धेनू अंगणी
दुंदुभिचा नाद तोच धुंद कोंदला
दुंदुभिचा नाद तोच धुंद कोंदला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
पेंगुळल्या आतपांत जागत्या कळ्या
काय काय करित पुन्हा उमलल्या खुळ्या
उच्चरवें वायू त्यांस हसून बोलला
उच्चरवें वायू त्यांस हसून बोलला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
वार्ता ही सुखद जधीं पोंचली जनी पोंचली जनी
गेहांतुन राजपथी धावले कुणी
युवतींचा संघ एक गात चालला
युवतींचा संघ एक गात चालला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
पुष्पांजली फेकी कुणी कोणी भूषणे
हास्याने लोपविले शब्द भाषणे
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला
वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
वीणारव नूपुरांत पार लोपले पार लोपले
कर्ण्याचे कंठ त्यात अधिक तापले अधिक तापले
बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला
बावरल्या आम्रशिरीं मूक कोकिला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
दिग्गजही हलुन जरा चित्र पाहती
गगनांतुन आज नवे रंग पोहती
मोत्यांचा चूर नभी भरुन राहिला
मोत्यांचा चूर नभी भरुन राहिला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
बुडुनि जाय नगर सर्व नृत्यगायनी नृत्यगायनी
सूर रंग ताल यात मग्न मेदिनी मेदिनी
डोलतसे ती ही जरा शेष डोलला
डोलतसे ती ही जरा शेष डोलला
राम जन्मला गं सखी राम जन्मला
राम जन्मला गं सखी राम जन्मला