गुणवत्ता, दूरदृष्टी, माणुसकी आणि व्यावसायिकता यांची उत्तम केमिस्ट्री म्हणजेच रमेश देव
कसा आहेस मित्रा?
समोरची व्यक्ती पहिल्यांदाच भेटत असो अथवा अगणित वेळा रमेश देव (Ramesh Deo) गप्पांना सुरुवात करताना ती अशी करणार आणि समोरच्याला कन्फर्ट झोनमध्ये आणणार ही त्यांच्या यशाची पहिली पायरी आहे. याचे कारण, त्यांनी चित्रपट, रंगभूमी आणि दूरदर्शन अशा तीनही माध्यमातून दीर्घकाळ भूमिका साकारताना अनेक प्रकारच्या स्वभावाच्या, मानसिकतेच्या, दृष्टिकोनाच्या निर्माता, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार यांच्यासोबत काम करताना एकूणच ते सोपे कसे होईल यावर कायमच लक्ष ठेवले. एखाद्या क्षेत्रात दीर्घकाळ नांगर टाकून वाटचाल करण्यासाठी हा गुण खूप महत्वाचा आहे. तो अनुभवातून येतो. पण खूप महत्वाचा ठरतो.
रमेश देव यांच्या पहिल्या चित्रपटाची आठवण अगदी वेगळीच. निर्माते आणि दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांच्या ‘रामराम पाव्हणं’ (१९५०) या चित्रपटात रमेश देव यांना छोटीशी भूमिका मिळाली आणि टायटलमध्ये त्यांचे नावही आले. पण गंमत म्हणजे, त्यानंतर सिनेमाची लांबी वाढतेय म्हणून त्यांची भूमिका कापली गेली. पण श्रेयनामावलीत त्यांचे नाव मात्र आले.
हे नक्की वाचा: स्वतःचे अस्तित्व सिनेसृष्टीत निर्माण करणारा: अजिंक्य देव
त्यानंतर दिनकर पाटील यांच्याच ‘पाटलाचा पोर’ या चित्रपटात छोटीशी भूमिका साकारतच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली आणि मग त्यांची अनेक वळणे घेत घेत वाटचाल सुरु झाली आणि गुणवत्ता, दूरदृष्टी, माणुसकी आणि व्यावसायिकता यांच्या केमिस्ट्रीने त्यांच्या बहुरंगी वाटचालीचा प्रवास आकार घेत घेत सुरु राहिला. त्यांच्या मराठी व हिंदी चित्रपटांची नावे जरी सांगायचे ठरवले तरी मोठीच सूची होईल.
एकीकडे अभिनयाचा प्रवास आणि दुसरीकडे सीमाताईंशी लग्न (त्या मुळच्या नलिनी सराफ), संसारात दोन मुले (अजिंक्य आणि अभिनय), या मुलांची कारकिर्द आणि लग्ने, त्यांची मुले (म्हणजे रमेश देव यांची नातवंड) असा खूपच मोठा प्रवास करत करत आज ते ९४ वा वाढदिवस साजरा करीत आहेत. त्यांना खूप खूप शुभेच्छा. (Ramesh Dev’s 94th birthday)
त्यांच्या यशोगाथेतील गोष्टी सांगाव्यात तेवढ्या थोड्याच. महाराष्ट्र राज्य स्थापनेला १९८५ साली पंचवीस वर्षे पूर्ण झाली त्यानिमीत्ताने मी नवशक्ती दैनिकासाठी मान्यवर सिनेमावाल्यांच्या मुलाखती घेताना रमेश देव यांची त्यांच्या जुहू कोळीवाडा कॉर्नरवरच्या मेघदूतमधे पहिली भेट झाली (विशेष म्हणजे, देव कुटुंबिय सत्तरच्या दशकात जुहूला रहायला गेले ही मराठी चित्रपट साप्ताहिकात बातमी झाली होती). तेव्हा रमेश देव यांनी अजिबात नवखेपण जाणवू दिले नाही. त्यांना मराठी चित्रपटसृष्टीची आणि राज्याची प्रगती यांचे उत्तम भान असल्याचे मला लक्षात आले. (आता देव कुटुंबिय जुहू वर्सोवा लिंक रोडला राहतात).
रमेश देव यांच्या रुपेरी पडद्यावरील गाण्यांच्या स्कोर कार्डवर फारसा कधी फोकस पडत नाही. ती त्यांची वेगळी शैली आहे. काही उदाहरणे ऐका.
हे वाचलंत का: सचिन पिळगावकर… ‘एक की अनेक’ असा प्रश्न पडावा इतका तो अष्टपैलू आहे
अपराध’ ( गाण्याचे बोल, सूर तेची छेडता, सांग कधी कळणार तुला, स्वप्नात पाहिले मी रुप तेच होते, असेच जुळले गीत सुरात), भाग्यलक्ष्मी (चंद्र दोन उगवले), तीन बहुरानिया (आमदनी अठ्ठनी खर्चा रुपय्या), शेवटचा मालुसरा (तुझे रुप राणी कुणासारखे गं), वरदक्षिणा (एक हात पंखावरुन फिरुन), कसौटी (बेबी हो गई जवान), जैसे को तैसा (जैसे को तैसा मिला हे गाणे जितेंद्र त्याना चापकाने फटकावताना गातो.
मूळ चित्रपट ‘राम और श्याम ‘मध्ये प्राणने साकारलेली भूमिका रिमेकमध्ये रमेश देव यांनी साकारली. गंमत म्हणजे अनेक मराठी चित्रपटात रमेश देव यांनी व्हीलन साकारला म्हणून त्यांना मराठीतील प्राण असे म्हणत), लक्ष्मण रेषा (शपथ या ओठांची), आनंद (मैने तेरे लियेही सात रंग के सपने चुने, राजेश खन्नावरील या गाण्यात रमेश देव आणि सीमाताई यांचाही सहभाग आहे) मोलकरीण (हसले आज कुणी तू का मी) ही गाणी आजही लोकप्रिय आहेत.
त्यांच्याबद्ल काही तपशील सांगायचे तर, रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ ते मूळचे कोल्हापूरचे, मूळ आडनाव ठाकूर. असे रमेश देव वयाच्या नव्वदीनंतरही आजही कार्यरत याबाबत त्यांचा आदर्श ठेवायलाच हवा. आपली आई, गुरु राजा परांजपे आणि पत्नी सीमा देव यांचा आपल्याला घडवण्यात वाटा असे ते नेहमीच सांगतात.
साठच्या दशकातील मराठी चित्रपटातील राजबिंडा नायक अशी त्यांची ओळख.
नायक, सहनायक, खलनायक, चरित्र अभिनेते अशा दीर्घ वाटचालीत त्यांची अशाच अनेक रुपात सतत भेट होत राहिली. आणि ते अतिशय गप्पिष्ट असल्याने अनेक तरी जुन्या आठवणी, गोष्टी, अनुभव, किस्से कायमच ऐकायला मिळाले. आपण अगदी वेळीच मराठी चित्रपटसृष्टीतून हिंदी चित्रपटसृष्टीत झेपावलो याचा त्यांना कायमच अभिमान. साठच्या दशकातच त्यानी चेन्नई (तेव्हाचे मद्रास) तील निर्मिती संस्थांच्या हिंदी चित्रपटात भूमिका साकारत आपले पाय रोवले. आणि ‘तीन बहुरानीया’ (जेमिनी पिक्चर्स), प्रेम नगर (सुरेश प्रॉडक्शन), ‘जैसे को तैसा’ इत्यादी हिंदी चित्रपटात भूमिका साकारत जम बसवला. भूमिका छोटी असो वा मोठी, हिंदी चित्रपटसृष्टीत वाटचाल होत राहणे खूप महत्वाचे असते यात त्यांची दूरदृष्टी दिसतेय.
तर आपल्या कार्यविस्तारात त्यांनी राजदत्त दिग्दर्शित ‘सर्जा’, गजेन्द्र अहिरे दिग्दर्शित ‘वासुदेव बळवंत फडके’ या चित्रपटांची निर्मिती आणि ‘चोर चोर’, ‘जिवा सखा’, ‘चल गंमत करु’ इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन असे त्यांचे बहुगणी प्रगती पुस्तक आहे. ‘सर्जा’ची राज्य चित्रपट महोत्सवात पहिल्या तीन सर्वोत्कृष्ट चित्रपटात निवड न झाल्याने आश्चर्यचकित झालेले रमेश देव यांना याच चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाल्याने तेवढेच सुखावले. आपल्या दिग्दर्शनातील ‘जीवा सखा’ या चित्रपटातील पत्रकार परिषदेसाठी त्यांनी सिनेपत्रकाराना आवर्जून संधी दिली आणि आम्ही चक्क पत्रकाराचा अभिनय केला. नवीन पिढीला साने गुरुजी यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख व्हावी म्हणून त्यांनी ‘सेनानी साने गुरुजी’ (१९९५) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. एका शाळेत ते सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गेले असता विद्यार्थ्यांना वासुदेव बळवंत फडके यांच्याविषयी फारशी माहितीही नाही हे लक्षात आल्याचे त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी त्याच नावाच्या चित्रपटाची निर्मिती करताना राजाबाई टॉवरमध्ये मुहूर्त केला. गजेन्द्र अहिरे दिग्दर्शित या चित्रपटात अजिंक्य देवने शीर्षक भूमिका साकारली.
जिद्द, मेहनत, व्यावसायिक वृत्ती या गुणांवर ते कलेच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी ठरले. आणि तेच त्यांच्या फिटनेसचे रहस्य आहे.
त्यांनी साकारलेला ‘भिंगरी’तील खलनायक जबरा होता. सुषमा शिरोमणीच्या दिग्दर्शनातील हा मसालेदार मनोरंजक चित्रपट आहे. रमेश देव यांची एक खासियत म्हणजे, ते शक्यतो एखाद्या चित्रपटासाठी अथवा व्यक्तिरेखेसाठी नाही म्हणत नाहीत. समजा, त्यात काही गोष्टी पटत नसतील तर त्यातून ते मध्यममार्ग काढण्याचा निश्चित प्रयत्न करतात. या क्षेत्रात मुरण्यासाठी अशीच व्यावसायिकता हितकारक आहे हे त्यांच्या मनावर त्यांनी जणू घट्ट बिंबवले आहे.
खरं तर रमेश देव यांचा राज्यातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये ‘दोस्तांना’, आणि एकदा त्याना चक्क निवडणूक लढवण्याचाही योग आला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात १९९८ साली शिवसेना उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. त्यात विजय मिळाला नाही, पण ‘निवडणुकीच्या राजकारणाचा अनुभव’ मात्र घेतला. या निवडणुकीत सर्व देव कुटुंबिय बरेच दिवस कोल्हापूरमध्ये ठाण मांडून बसले होते. रमेश देव मूळचे कोल्हापूरचे आणि सीमाताईंशी लग्नही या कोल्हापूरताच झाले. या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या देव कुटुंबियांनी जुहूच्या इस्कॉनमध्ये आयोजिलेल्या भव्य सोहळ्यास सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अगणित मान्यवर आवर्जून हजर होते ही खरी रमेश देव यांची खूप मोठी मिळकत आहे. आपल्या वागण्यातून/स्वभावातून त्यांचा सर्वदूर लोकसंग्रह वाढत राहिला.
आजच्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देताना त्यांच्याबद्ल सांगावे तेवढे थोडेच आहे. १९५० ते २०२० अशी तब्बल सत्तर वर्षांची त्यांची कारकीर्द म्हणजे त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, माध्यमे, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात केवढे तरी बदल अनुभवलेत. ब्लॅक अॅण्ड व्हाईट अर्थात कृष्ण धवल सिनेमातून सुरुवात करुन आज ते मल्टीप्लेक्सचा विशाल पडदा आणि उच्च दर्जाची साऊंड सिस्टीम यापर्यंत कार्यरत आहेत. इतका काळ आपला फिटनेस फंडा आणि मागणी टिकवणे सोपे नाही हो.
‘आपलं गिरगाव २०२०’ हे कॅलेंडर देण्यासाठी त्यांच्या घरी गेलो असता मला समजले ते जुहूच्या क्लबमध्ये आहेत. तेथे पोहोचलो तर ते अतिशय उत्साहात पत्यांच्या डावात असे रमले होते की, ते नव्वदीपार आहेत यावर विश्वास बसू नये.
म्हटलं ना, कामातील सातत्य व आनंद, कौटुंबिक बांधिलकी, उत्साह आणि भविष्याची तजवीज यांची उत्तम केमिस्ट्री म्हणजे रमेश देव! या देव कुटुंबियांशी माझे दीर्घकालीन कौटुंबिक नाते असल्याचा मला म्हणूनच कायमच अभिमान वाटतो.