रणदीप हुडा: ट्रोलर्सच्या कमेंट्सना माध्यमांचीच फूस
आपण काय बोलतो.. कुठं बोलतो.. आणि का बोलतो.. याचं काही सोयरसुतक आता उरलेलं नाहीये. विशेषत: आजच्या सोशल मीडियाने जगातल्या प्रत्येकाला आपआपली हक्काची वॉल देऊ केल्याने लेखनाला उधाण आलेलं आहे. हे केवळ आपल्या वॉलपुरतं असतं, तर बरं झालं असतं. पण तेवढ्यापुरतं ते उरत नाही. उलट कमेट्स सेक्शनचा सढळ वापर करत अलिकडे त्यावर वैयक्तिक मतं मांडली जातात. दुसऱ्याला अपमानास्पदरित्या ट्रोल केलं जातं. यातून अमिताभ बच्चनही सुटले नाहीत, तिथे इतर कलाकारांबद्दल आपण काय बोलणार?
काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ‘सावरकर’ चित्रपटाची घोषणा केलीच शिवाय, त्यातला अभिनेता रणदिप हुडा (Randeep Hooda) याचा गेटअप प्रकाशित केला. रणदिपनेही इन्स्टाग्रामवर हा फोटो शेअर करत आपण सावरकरांची भूमिका साकारत असल्याचं सांगितलं. त्याच्या या गेटअपची चर्चा खूपच झाली. पण त्याचसोबत तो ट्रोल झाल्याचंही कळलं. अनेक माध्यमांनी त्याच्या बातम्या केल्या. (Randeep Hooda gets trolled)
“रणदिप हु़डा झाला ट्रोल” अशा आशयाच्या त्या बातम्या होत्या. या ट्रोलिंगमध्ये “तुला दुसरं काम मिळालं नाही का” अशा आशयाच्या टीका जास्त होत्या. पण गंमत अशी की, त्याला या भूमिकेबद्दल अनेकांनी शुभेच्छाही दिल्या होत्या. अनेक कशाला, आपण बहुतांश म्हणू. कैक लोकांनी त्याला या गेटअप बद्दल दाद दिली होती, त्याचं कौतुक केलं होतं. पण माध्यमांंनी बातम्या करताना केवळ ट्रोलिंगच्या केल्या. म्हणजे असं समजू की, रणदिपच्या इन्स्टावरच्या पोस्टवर जर १०० कमेंट्स आल्या असतील, तर त्यात साधारण १० कमेंट्स या नकारात्मक म्हणता येतील. म्हणजे उरलेल्या ९० कमेंट्स या सकारात्मक होत्या. पण माध्यमांनी बरोब्बर या नकारात्मक कमेंट्सना अधोरेखित करून दाखवलं आणि त्याची बातमी झाली. (Randeep Hooda gets trolled)
काही दिवसांपूर्वी डॉ. अमोल कोल्हे यांनीही ‘व्हाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटात नथुरामाची मध्यवर्ती भूमिका सााकारली होती. हा चित्रपट ओटीटीवर येणार होता. त्यावेळीही अमोल यांनी नथुरामाची भूमिका केलीच कशी, अशी जोरदार विचारणा झाली. त्यावर अमोल यांनी आपलं म्हणणं मांडलं. पण त्यांच्या या चित्रपटातल्या भूमिकेला आणि अमोल यांच्या खासदारकीला एकाच पिंजऱ्यात उभं केलं गेलं.
खरंतर हा प्रकार फार आधीपासून सुरू आहे. अनेकांना माहीत नसेल, पण अभिनेते शरद पोंक्षे यांना सोशल मीडिया नसल्यापासून ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. त्यावेळचं ट्रोलिंग हे आतापेक्षा जास्त भयानक होतं. शरद यांच्या भूमिकेचं कौतुक सर्वत्र झालं. ‘मी नुथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकाचे प्रयोग देशा-परदेशातही झाले. पण या कामाची पावती पुरस्कार रुपातून त्यांना कधीच मिळाली नाही. इतकंच नव्हे, तर नाट्यसृष्टीतल्या अनेक कलाकार-दिग्दर्शकांनी हे नाटक पाहिलंही नाही. म्हणजे, तुमची विचारधारा एका बाजूला. नट म्हणून शरद पोंक्षे या नाटकात नक्की काय करतात ते पाहायला हवं होतं. पण तसं झालं नाही. पोंक्षे अनेकदा बोलताना ही खंत व्यक्त करतात.
पोंक्षे यांच्या बाबतीत झालेला प्रकार दुर्दैवी आहेच. पण तो ट्रोलिंगचाच एक प्रकार आहे. कलाकार म्हणून इंडस्ट्रीत वावरत असताना कोणताही कलाकार संबंधित व्यक्तिरेखा साकारण्याचा निर्णय घेण्यामागे अनेक कारणं असतात. ती बऱ्याचदा आर्थिक असतात. कधी ती तत्वाचा भाग असतात किंवा अनेकदा ती भूमिका त्या कलाकारासाठी आव्हानाचा एक भाग असते. म्हणजे या भूमिकेमुळे त्या कलाकाराच्या अभिनयाच्या कक्षांना आव्हान मिळणारं असतं. अशा अनेक गोष्टी असतात. प्रत्येकवेळी त्या भूमिकेतून त्याला मानधनच मिळत असेल असा तर्क आपण लढवणं हे तितकंसं खरं नसतं. पण ही बाब आपण लक्षात घेत नाही. कारण आपल्याला आपलं मत व्यक्त करायची पुरती घाई झालेली असते. आणि ते माध्यमही आपल्या हातात सहज खेळत असतं. त्यामुळे व्यक्त व्हायला ही घाई पुरेशी ठरते.
खरंतर या ट्रोलिंगच्या बातम्यांना हवा देण्याचं काम माध्यमं करत असतात. अलिकडे बोकाळलेल्या वेबपोर्टल्सना काहीतरी खमंग बातमी हवी असते. बऱ्याचदा नकारात्मक बातम्या शोधण्यातच धन्यता मानली जाते. यात बऱ्याच नामांकित ब्रॅंडसची पोर्टल्सही असतात. वेबसाईटवर आलेल्या वाचकांना हुक करण्यासाठी अशा नकारात्मक बातम्यांना हवा दिली जाते आणि त्या बातम्या फुलवल्या जातात. म्हणूनच मग शंभरपैकी दहा नकारात्मक कमेेट्स असल्या, तरीही त्यांची बातमी मोठी होते आणि इतर ९० कमेंट्सकडे डोळेझाक केली जाते. (Randeep Hooda gets trolled)
=======
हे ही वाचा: मराठी चित्रपटसृष्टीत भगवं वादळ!
डॉक्युमेंटरी… गरज आहे प्रेक्षकांच्या प्रतिसादाची!
=======
ट्रोल करणारे बऱ्याचदा कलाकाराचं लक्ष वेधून घेण्यासाठी हुल्लड बोलत असतात. बऱ्याचदा त्या लोकांना ती संबंधित व्यक्तिरेखा आवडत असते किंवा बऱ्याचदा उगाच बसून टीका करत रहाण्यात धन्यता मानणारेही अनेक आहेत. त्यांच्या जोडीला वेगगेवळ्या पक्षांचे आयटी सेल्सही आहेतच. हा सगळा प्रकार पाहता हे ठरवून केलेलं दिसतं. एखाद्या कलाकारावर दबावतंत्र आणून त्याला नामोहरम कसं करता येईल, ते सतत पाहात राहायचं अशा या वागण्याने या ट्रोलर्सची भीड चेपते. (Randeep Hooda gets trolled)
पण पुन्हा मुद्दा वाचक म्हणून…माध्यम म्हणून…आपण डोळे उघडण्याचा आहे. कुणाला किती महत्व द्यायचं ते ठरवायचा आहे. कुणी कोणती भूमिका करायची हा त्या त्या कलाकाराचा व्यक्तिगत प्रश्न असतो. भूमिका करणे आणि भूमिका घेणे यात फार फार फरक आहे. तो जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपण भूमिका घेऊ शकू. भूमिका करायला आपल्याला येणार नाही. ती करायला आपण काही अभिनेते किंवा अभिनेत्री नाही, पण सजग भूमिका तर घेता येऊ शकते. त्याची सुरुवात या ट्रोलिंग विरोधातून करता येईल.