महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
रणवीर ‘दाखवतोय’ ना दाखवू दे की… बघायचं तर बघा.. नाहीतर राहू दे
अभिनेता रणवीर सिंगनं दोन दिवसांपूर्वी आपलं नग्न फोटोशूट काय केलं.. इकडे तर गहजब उडाला. फोटो टाकल्यावर २४ तास उलटायच्या आत रणवीरविरोधात मुंबई पोलिसांत एफआयआर दाखल झाला. याचं कारण काय, तर म्हणे महिलांच्या भावना दुखावल्या. (Ranveer Singh’s Nude Photoshoot Controversy)
कमाल आहे! जो महाराष्ट्र आपण पुरोगामी म्हणवतो, परिवर्तनवादी म्हणवतो आणि तितकाच सुशिक्षित समजतो त्याच महाराष्ट्रात अशी तक्रार दाखल व्हावी? तुलनेने भारतातली इतर राज्य फार मागास आहेत. मागास आर्थिकदृष्ट्या नव्हे, तर आकलनाच्या दृष्टीने. त्या राज्यातून या फोटोशूटबद्दल काहीच ओरड झालेली नाही. पण आमच्या मुंबईत जिथे रणवीर राहतो. जिथे हजारो कोटींची बॉलिवूड इंडस्ट्री टेचात उभी आहे, तिथेच ही अशी तक्रार दाखल होते आहे.
अर्थात गेल्या काही वर्षांपासून कोणत्याही कारणाने आपल्या भावना दुखावू लागल्या आहेत. त्यात आता फोटोंचीही भर पडली आहे. अर्थात रणवीर सिंग खूप नंतर आला. त्याआधी भारतात आणि मुंबईत राहणाऱ्या कलाकारांना अनेकदा अशा तक्रारींना सामोरं जावं लागलं आहे. पण त्यातून निष्पन्न काय झालं? तर काही नाही.
नग्न फोटोशूट केल्याचा पहिला सांस्कृतिक धक्का लोकांना दिला होता तो मिलिंद सोमण आणि मधू सप्रे यांनी. १९९५ मध्ये या दोघांनी एका प्रोडक्टसाठी गळ्यात साप घालून फोटोशूट केलं होतं. त्यानंतरही बरीच ओरड झाली होती. तक्रारी दाखल झाल्या होत्या. पुढे हा खटला १४ वर्षं चालला. त्यानंतर त्यात काही दम उरला नव्हता.
पुढे २००७ मध्ये शिल्पा शेट्टीलाही या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. जेव्हा, रिचर्ड गिअरने भर कार्यक्रमात शिल्पाचं चुंबन घेतलं होतं. हा प्रकार शिल्पालाही नवखा होता. अचानक घडलेल्या त्या घटनेनं सगळेच आवाक झाले. रिचर्डसाठी हा प्रकार नवा नव्हता. कारण, त्यांची संस्कृतीचं तशी होती. पण भारतीय संस्कृतीसाठी ते नवं होतं. यासाठी शिल्पालाही जबाबदार धरण्यात आलं. याचं कारण काय तर, शिल्पाने हे घडत असताना त्याला हवा तेवढा प्रतिकार केला नाही. या केसचा जानेवारीमध्ये निकाल लागला तेव्हा कोर्टाने शिल्पाला ‘क्लीन चिट’ दिली होती. इतकंच नाही तर, ती आरोपी नसून पीडित असल्याचंही म्हटलं होतं. परंतु अलवार (राजस्थान) पोलिसांनी कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देत सेशन कोर्टात याचिका दाखल केल्याची बातमी नुकतीच समोर आली आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी मिलिंद सोमण पुन्हा चर्चेत आला. कारण, त्याने समुद्र किनाऱ्यावर नग्न अवस्थेत धावतानाचा फोटो त्याने त्याच्या सोशल मिडियावर टाकला होता. त्यावरूनही गोंधळ माजला. तक्रारी दाखल झाल्या. पण पुढे काही घडलं नाही. हे सगळं ताजं असताना आता रणवीर सिंगने नग्न फोटोशूट केलं आहे. त्याने पुन्हा एकदा वातावरण तापलं आहे. (Ranveer Singh’s Nude Photoshoot Controversy)
रणवीरला तसं फोटोशूट करायची गरज काय होती.. इथपासून त्याला काय जातंय तसं करायला इथपर्यंत अनेक मतं ऐकू येऊ लागली आहेत. बिभत्स वर्तन.. असभ्य वर्तन.. या कॅटेगरीत हे बसतं का, हाही मुद्दा महत्त्वाचा आहेच. पण यात रिचर्ड गिअरचं उदाहरण सोडलं, तर कुणीही असभ्य वर्तन केलेलं नाही. प्रत्येक गोष्टीला आपण आपला चष्मा लावून पाहू लागलो, तर ती आपल्याला कशी बघायची आहे तशीच ती दिसणार आहे.
मुळात कोणत्याही कलेमध्ये मानवी शरीर हे ‘टूल’ म्हणून वापरलं जातं. कलाकारासाठी त्याचं शरीर हे ‘टूल’ म्हणजे शस्त्र आहे. त्यामार्फत तो आपल्या कलेचं सादरीकरण करत असतो. त्या शरीराकडे बघण्याचा त्याचा असा दृष्टिकोन असतो. मिलिंद सोमण, मधू सप्रे, रणवीर सिंग आदींना आपलं शरीर बिभत्सपणेच दाखवायचं असतं, तर त्यांना ते फोटोशूट कसंही करता आलं असतं. पण तसं त्यांनी केलं नाही. उलट रणवीरचं फोटोशूट झाल्यानंतर काहीही विकृत आणि बिनडोक लोकांनी त्याचे ऑफकॅमेरा फुटेज चोरून शूट करून व्हायरल करायचा प्रयत्न केला आहे. (Ranveer Singh’s Nude Photoshoot Controversy)
आता त्या क्लिप्सही व्हायरल होतायत. खरंतर या क्लिप्स व्हायरल करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल व्हायला हवेत. पण ते आपण करत नाही. गावागावांत चालणारी पोर्नोग्राफीची केंद्रं पोलीस यंत्रणेला माहीत नसतात अशातला भाग नाही. मोबाईलवर युवकांची चाललेली ‘क्रीडा’ आजही सहज फॉरवर्ड होते आणि तितक्याच चवीने ती पाहिली जाते. खरंतर इथे भावना दुखावल्या गेल्या पाहिजेत. पण तिथे आपल्याला काहीच वाटत नाही. पण ‘आर्टिस्टिक’ पॉइंट ऑफ व्ह्यूने एखादा कलाकार आपलं ‘बॉडी टेक्च्शर’ दाखवत असेल, तर तो त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ज्याला ते बघायचं नाहीय त्याने ते पाहू नये. इतकं कशाला, रणवीरने आपला फोटो पोस्ट केल्यावर त्याच्या फोटोला इन्स्टाग्रामवर २३ लाख लाईक्स मिळाले आहेत. म्हणजे त्या लाखो लोकांनी रणवीरच्या फोटोशूटला अप्रत्यक्ष स्वीकारलं आहे. त्यातल्या काहींना कदाचित हे फोटो आवडले नसतीलही. पण प्रॉब्लेम काय आहे?
कळत नकळत महाराष्ट्रही नक्की कुठल्या वाटेने चालतो आहे, हे पाहायची वेळ आली आहे. काळ बदलतो आहे. केवळ महाराष्ट्रात नव्हे, तर जगभरातली नग्नता आता आपल्या हातात आली आहे. मुद्दा फक्त आपण ते फोटो किंवा व्हिडिओ क्लिक करायचे की नाही आणि जर ते क्लिक केले, तर पुढे ते व्हायरल होण्यासाठी फॉरवर्ड करायचे की नाही इतकाच आहे. (Ranveer Singh’s Nude Photoshoot Controversy)
आता फक्त मानवी शरीर हा मुद्दा असेल तर अनेक मोठ्या शिल्पकारांना, चित्रकारांना मानवी शरीराचा मोह झाला आहे. आता ‘मानवी शरीराचा मोह होणं’ हे वाक्य कसं घ्यायचं हे ज्यानं त्यानं आपल्या बौद्धिक कुवतीवर ठरवावं. तो तो त्यानुसार घेईल. खुजराहोची शिल्पं असोत किंवा अगदी अजिंठा वेरूळची लेणी अनेकांना मानवी शरीराची भूरळ पडली आहे. अनेक कलाशाखांमध्ये तो वेगळा विषय आहे. पण आता हे समजून कोण घेणार? त्यापेक्षा भावना दुखावल्याची ढाल पुढे केली की मामला लवकर मार्गी लागतो आणि पुन्हा मिळणारी प्रसिद्धी वेगळी. असो.
=======
हे देखील वाचा – थिएटर्सही मिळतील, फक्त मकरंद अनासपुरे यांनी सुचवलेल्या प्रभावी तोडग्याचा विचार व्हायला हवा…
=======
या सगळ्यात आपण काय करणार आहोत ते आपण ठरवायचं आहे. जे चूक ते चूकच. पण काही गोष्टी जशा दिसतायत तशा असतातच असं नाही. कारण त्यांचा प्ले वेगळा असतो. (Ranveer Singh’s Nude Photoshoot Controversy)