Tamannaah-Vijay : लग्नाच्या चर्चा सुरु असताना तमन्ना-विजयचं ब्रेकअप?

Rashtraguru Samarth Ramdas Movie Teaser: समर्थ रामदास स्वामींच्या जीवनावर आधारित ‘राष्ट्रगुरु समर्थ रामदास’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित!
मराठी सिनेसृष्टीत ऐतिहासिक आणि आध्यात्मिक चित्रपटांचं वेगळंच स्थान आहे आणि आता या यादीत आणखी एक जबरदस्त चित्रपटाची भर पडतेय ती म्हणजे ‘राष्ट्रगुरु समर्थ रामदास’! नुकताच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. हा केवळ ऐतिहासिक चित्रपट नसून, समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक काळात जागर करणारा आहे.या चित्रपटाचं दिग्दर्शन सुप्रसिद्ध व्हिएफक्स डिझायनर अनिकेत साने यांनी केलंय तर कल्पना फिल्म्स अँड व्हिएफएक्स स्टुडिओने सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘जंगलबुक‘ या हॉलिवूडपटासारखा मराठीतही एक सिनेमा व्हावा असा अनिकेत यांनी यावेळी प्रयत्न केला आहे. तब्बल १० वर्षांच्या रिसर्च आणि मेहनतीनंतर हा प्रोजेक्ट उभा राहिलाय. रामदास स्वामींच्या चरित्रावर भरपूर संशोधन करून आणि ‘दासबोध’ चा सखोल अभ्यास करून या चित्रपटाची कथा तयार करण्यात आली.(Rashtraguru Samarth Ramdas Movie Teaser)

साने यांनी या प्रोजेक्टसाठी मराठी सिनेसृष्टीतील अनेक लोकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण अपेक्षित सहकार्य मिळालं नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःच पुढाकार घेत, हा चित्रपट पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यांना या प्रवासात अनेक अडचणी आल्या, पण त्यांचा निर्धार अढळ राहिला. अनिकेत साने हे नाव व्हिएफक्स डिझायनिंगमध्ये मोठं आहे. त्यांनी ‘सनी’, ‘झिम्मा २’, ‘नवरा माझा नवसाचा २’ यांसारख्या सुपरहिट मराठी सिनेमांसाठी व्हिएफक्स केलंय. तसंच ‘गांधी टॉक्स’, ‘सनक’, ‘केरला स्टोरी’ यांसारख्या हिंदी सिनेमांसोबतच, ‘दिल बेकरार’, ‘सनफ्लॉवर १’ या वेबसीरिजमध्येही त्यांनी योगदान दिलंय.

या अनुभवाचा पुरेपूर वापर करून, त्यांनी ‘राष्ट्रगुरु समर्थ रामदास’ मध्ये जबरदस्त व्हिएफक्स आणि ऐतिहासिक दृश्यं निर्माण केली आहेत. चित्रपटाच्या टिझरमध्ये सज्जनगड, काळाराम मंदिर,जांब समर्थ आणि इतर ऐतिहासिक स्थळं व्हिएफक्सद्वारे अगदी हुबेहुब साकारण्यात आली आहेत. यामुळे प्रेक्षकांना १६ व्या शतकात गेल्याची अनुभूती नक्की होते. हा चित्रपट केवळ इतिहास सांगणारा नाही, तर समाजाला दिशा देणारा आहे! समर्थ रामदास स्वामींची शिकवण आणि श्रवण भक्तीचे फायदे, त्यांचा कर्मयोग आणि भक्तीची संकल्पना हे सगळं प्रभावीपणे दाखवण्यात आलंय.(Rashtraguru Samarth Ramdas Movie Teaser)
===========================
हे देखील वाचा:
===========================
सिनेमाबद्दल बोलताना अनिकेत साने म्हणतात की, “‘राष्ट्रगुरु समर्थ रामदास’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा आधुनिक जागर आहे. त्यांनी समाजासाठी दिलेलं योगदान आणि त्यांची शिकवण आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचवणं हा माझा मुख्य उद्देश आहे.” समर्थ रामदास स्वामींच्या विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा हा चित्रपट लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, हा ऐतिहासिक प्रवास अनुभवण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत!