
“’राजा शिवाजी’ची कल्पना माझी होती, पण…”; रवी यांनी Riteish Deshmukh सोबतच्या वादाबद्दल केला मोठा खुलासा!
मराठी चित्रपटसृष्टीतील बिग बजेट चित्रपट ‘राजा शिवाजी’ (Raja Shivaji) याच वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन आणि अभिनय अशी दुहेरी जबाबदारी रितेश देशमुख यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. पण तुम्हाला माहित आहे का? हा चित्रपट आधी मराठीतील ग्रेट दिग्दर्शक रवी जाधव डिरेक्ट करणार होते. परंतु, काही कारणांमुळे त्यांनी माघार घेतली. आता पहिल्यांदाच रितेश आणि त्यांच्यात काही मतभेद झाले होते का? किंवा राजा शिवाजी सोडण्यामागचं काय कारण होतं याचा खुलासा त्यांनी केला आहे. जाणून घेऊयात रवी जाधव काय म्हणाले? (Riteish Deshmukh and Ravi Jadhav)
तर, ‘राजा शिवाजी’ चित्रपट सोडण्यामागे रितेश आणि रवी जाधव यांच्यात वाद झाल्याचं म्हटलं गेलं. यावर रवी जाधव यांनी भाष्य करत खरं काय ते सांगितलं आहे. कॅचअपला दिलेल्या मुलाखतीत रवी म्हणाले की, “तेव्हा चित्रपटाचं नाव ‘छत्रपती शिवाजी’ होतं. २०१५ ला माझ्या डोक्यात कल्पना आली होती की रितेश देशमुख शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये कसे दिसतील…कारण ते कोणाचाच कधी एकेरी उल्लेख करत नाहीत. ते नेहमी अहो जाओ करतात. त्यांचा स्वत:चा एक खानदानी ऑरो आहे. त्यामुळे माझ्या डोक्यात आलं की हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून कसे दिसतील? तिथूनच ही प्रोसेस सुरू झाली होती. आम्ही सिनेमा लिहायला सुरुवात केली. रितेशने सांगितलं की ते त्यांची प्रोडक्शन कंपनी मुंबई फिल्म्स तर्फे सिनेमाची निर्मिती करतील. मला अभिनेता आणि निर्माता दोन्ही मिळाले होते”.(Marathi Movie)

पुढे रवी म्हणाले की, “आम्ही ड्राफ्ट लिहायला सुरुवात केली. आधी तेजपाल वाघ, मग विश्वास पाटील, मग क्षितीज पट)वर्धनने सिनेमा लिहिला. जवळपास ३-४ वर्ष हे सुरू होतं. त्यानंतर आम्ही रितेश देशमुख यांची लूक टेस्ट केली आणि पोस्टरही डिझाइन केलं. त्यानंतर दुर्देवाने माझ्या पर्सनल आयुष्यात काही गोष्टी घडल्या. माझ्या मुलाच्या तब्येतीमुळे मी थोडा मागे पडत गेलो. कदाचित ‘बॅन्जो’च्या अपयशानंतर मला दिग्दर्शन येतं की नाही, असा प्रश्नही निर्मात्यांच्या मनात आला असेल. त्यांना असं वाटलं असेल की याला दिग्दर्शनच येत नाही, मग एवढा मोठा चित्रपट कसा करू शकतो? सगळं काही ठरलं होतं”. त्यामुळे निर्मात्यांमुळे रवी जाधव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं नाही हे त्यांच्या बोलण्यावरुन समोर आलं आणि रितेश व त्यांच्यात काहीच वाद झाला नसल्याचंही स्पष्ट झालं.
रवी पुढे म्हणाले की, “’राजा शिवाजी’ चं शूटिंग सुरू झाल्यानंतर मी त्या सेटवर गेलो होतो. ज्या पद्धतीने रितेश देशमुख हा सिनेमा करत आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी स्वत:ला झोकून दिलंय ते खरंच कौतुकास्पद आहे. आम्ही २०१४-१५ ला एक छोटं स्वप्न बघितलं होतं. पण, आज ते ज्या उंचीचा सिनेमा करत आहेत. त्या पद्धतीने मी या सिनेमाचा विचारच केला नव्हता. माझ्यानंतर नागराज मंजुळे हा सिनेमा दिग्दर्शित करणार होता. तेव्हादेखील रितेश यांनी मला फोन केला होता. जेव्हा ते स्वत: दिग्दर्शन करणार असं ठरलं, तेव्हाही त्यांनी मला फोन केला होता”. (Bollywood)
रितेश आणि आपल्या भांडणाच्या मुद्द्यावर रवी म्हणाले की, “आमचं एकाही शब्दाचं भांडण नाही. आमच्यात विसंवादही नाहीत. जेव्हा जेव्हा आम्हाला एकमेकांना फोन करावासा वाटतो, आम्ही करतो. छत्रपती शिवाजी महाराजांवरचा चित्रपट बनवायचा ही कल्पना होती. पण, ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे हा चित्रपट माझी कल्पना आहे असं मी म्हणू शकत नाही. मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रितेश देशमुख दिसले. हे क्रेडिट मी नक्कीच घेऊ शकतो की महाराष्ट्रात रितेश देशमुख यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत बघणारा मी पहिला दिग्दर्शक आहे. पण, त्यानंतर ते त्या भूमिकेच्या प्रेमात पडले. ते सिनेमा कधीही करूही शकले असते. पण, जोपर्यंत त्यांना वाटलं नाही की त्या उंचीचा सिनेमा बनेल तोपर्यंत ते थांबले होते”.
================================
हे देखील वाचा : २०२५ मध्ये ११० Marathi Movies; पण कमाई फक्त ९९ कोटी… काय गंडतय?
================================
दरम्यान, ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट १ मे २०२६ रोजी देशभरात रिलीज होणार आहे. मराठीसह हिंदी भाषेतही हा चित्रपट रिलीज होणार असून बॉलिवूडमधील तगडी स्टारकास्ट या भव्य ऐतिहासिक चित्रपटाचा भाग असणार आहे. रितेश देशमुखसह या चित्रपटात अभिषेक बच्चन, भाग्यश्री, सलमान खान, संजय दत्त, सचिन खेडेकर, संतोष जुवेकर, जिनिलिया देशमख असे मातब्बर कलाकार असणार आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi