‘गाईड’ पुन्हा अनुभवताना…
मल्टीप्लेक्सच्या भव्य पडद्यावर पस्तीस एम. एम. मधील ‘गाईड’चे (Guide Movie) सेन्सॉर प्रमाणपत्र दिसले, त्यावर बावीस रिळे असे वाचले आणि हाऊसफुल्ल गर्दीतील उत्साह आणखीन संचारला. हा अगदी थेट सकारात्मक प्रतिसाद होता आणि मग शीर्षक सुरु झाली. एकेक नाव पडद्यावर येऊ लागले. देव आनंदच्या नावाला टाळ्या वाजल्या, वहिदा रेहमान या नावालाही असाच उत्फूर्त प्रतिसाद, संगीतकार सचिन देव बर्मन यांचे नाव येईपर्यंत वातावरणातील उत्साह आणखीन वाढला आणि दिग्दर्शक विजय आनंद या नावाच्या वेळेस चक्क उत्फूर्तपणाचा हायपाॅईंट गाठला. ही क्लासिक कलाकृती ‘दिग्दर्शक, संवाद लेखक व संकलन विजय आनंद’ यांच्यासाठी जास्त ओळखली जाते. त्यांनीच या चित्रपटात ‘स्टार’ देव आनंदपेक्षा ‘अभिनेता’ रसिकांसमोर आणला. देव आनंदनेच आपल्या अफाट वाचनातून आर. के. नारायण यांची ‘गाईड’ कादंबरी वाचल्यावर विजय आनंद अर्थात गोल्डीला यावर चित्रपट दिग्दर्शित करण्याचे सुचवले.
आणि मग याच सकारात्मक वातावरणात प्रत्येक गाणे आणि अर्थपूर्ण चमकदार संवादाला मनापासून दाद मिळत राहिली. शैलेंद्रची गाणी आणि सचिन देव बर्मनचे मधुर संगीत आजही दिलखुलास दाद. यश म्हणतात ते यापेक्षा वेगळे काय असते? कांटो से खिच के यह ऑंचल, गाता रहे मेरा दिल, तेरे मेरे सपने, मोसे छल, क्या से क्या हो गया (ही गाणी लागोपाठ येतात, त्यामागचे लाॅजिक चित्रपट पाहताना लक्षात येते) प्रत्येक गाण्याला उत्फूर्त दाद. कॅमेरामन फली मिस्रीची कमाल चित्रपटभर आहेच पण कांटो से खीच के यह ऑंचल राजस्थानातील चितोड किल्ल्यावर चित्रीत केलेय त्यात तर फारच दिसते.
मध्यंतर कधी आला हे समजलेच नाही. कोणी महागडे पाॅपकाॅन, शीतपेय, समोसा यांच्या कॉम्बोसाठी गेले, कोणी आणखीन कशाला गेले. तर कोणी शेवटच्या रांगेत बसून आपल्याच या क्लासिक कलाकृतीचा ‘पुन्हा एकदा’ (पण कितव्यांदा काय माहित? दर्जेदार कलाकृती आपण किती वेळा पाहिली याची कोणी नोंद ठेवतो काय?) अनुभव व आनंद घेत असलेल्या वहिदा रेहमान यांच्याकडे वळले. कोणी छोटीशी मुलाखत घेतेय, कोणी त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक करतयं, कोणाला त्यांच्यासोबत देखील महत्वाचा असतो तो चित्रपट.) मी देखील वहिदा रेहमान यांच्या स्वाक्षरीसाठी पुढे होतो. खरं तर सेल्फीच्या युगात ऑटोग्राफ हेच आश्चर्याचे. पण स्वाक्षरीत त्या व्यक्तीचा आनंद उतरतो. वहिदाजींच्या बाजूलाच बसलेल्या जॅकी श्राॅफला यातूनच मी नजर देतो. तेवढ्यात वहिदाजी बोलतात, चलो पिक्चर शुरु हुई…(Guide Movie)
मी एकेक पायरी सांभाळत उतरत माझ्या सीटवर बसतो आणि अर्थातच ‘राजू गाईड’ सोबत पुढचा प्रवास सुरु करतो. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर एखादा चित्रपट वेगळा दिसतो अथवा भावतो का? याचे उत्तर ‘होय’ असेच आहे. देव आनंदचा मी आयुष्यात पाहिलेला पहिला चित्रपट ‘जाॅनी मेरा नाम’ (१९७०). त्याकाळात मध्यमवर्गीय कुटुंबात आपण कोणता चित्रपट पाहायचा याची बरीच चर्चा होई आणि मराठी चित्रपटाला विशेष प्राधान्य असे. मग अनेक हिंदी चित्रपटांची चर्चा होऊन एक निवडला जाई. ‘जाॅनी’ पाहिल्यावर देव आनंदच्या ‘मागील चित्रपट कोणते’ याचं शोधकार्य सुरु केले. माझ्या शालेय वयात गल्ली चित्रपट (गाईड, ज्वेल थीफ, तेरे घर के सामने, गॅम्बलर हे सगळे जमिनीवर ताडपत्रीवर बसून एन्जाॅय केले), मॅटीनी शो (नौ दो ग्यारह, काला पानी , प्रेम पुजारी, तेरे मेरे सपने, टॅक्सी ड्रायव्हर भली मोठी रांग लावून स्टाॅल एक रुपया पाच पैसे तिकीटात पाहिले) , दूरदर्शन (बम्बई का बाबू, इन्सानियत, असली नकली, काला बाजार, काला पानी रविवार संध्याकाळी शेजारी पाजारी कोणाहीकडे खाली बसून पाहिले. छोटा पडदा म्हणतात तो असाच कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट टी. व्ही. संच त्या काळात होता. दिवसभर तो शांत असे हेही विशेषच) असे देव आनंदमय चित्रपट पाहत पाहत वाढलो. मिडियात आल्यावर खुद्द देव आनंदची पाली हिलवरील त्याच्या आनंद रेकाॅर्डिंग स्टुडिओतील चकाचक ऑफिसमध्ये दोनदा सविस्तर मुलाखत घेतली असं म्हणण्यापेक्षा तास, दीड तास देव आनंद अनुभवला…(Guide Movie)
‘गाईड’ (Guide Movie) पुन्हा पाहून घरी येत असताना माझाच फ्लॅशबॅक माझ्या डोळ्यासमोर होता. पहिल्यांदा गल्लीत पाहिलेला गाईड मग मॅटीनीला अनेकदा अनुभवला. एकदा मराठा मंदिर थिएटरलाच एक आठवड्यासाठी रिपीट रनला पाहिला. ‘गाईड ‘चा पहिला रनही याच मराठा मंदिरला होता. तारीख ८ एप्रिल १९६७. माझ्या कलेक्शनमधील ‘गाईड’च्या (Guide Movie) प्रिमियर पासावरील ही तारीख. प्रीमियरचा पासही ‘गाईड’मय. चित्रपटाच्या थीमला साजेसा.) थाटात प्रीमियरही झाला. ‘गाईड’ हिंदीसह इंग्लिशमध्येही होता.
देव आनंद जन्मशताब्दीनिमित्त (अर्थातच २६ सप्टेंबर) देशभरातील पीव्हीआर आयनॉक्स मल्टीप्लेक्समध्ये २३ व २४ सप्टेंबर असे दोन दिवस विजय आनंद दिग्दर्शित ‘गाईड’, ‘ज्वेल थीफ’ आणि ‘जाॅनी मेरा नाम’ व राज खोसला दिग्दर्शित ‘सी. आय. डी.’ या फिल्मचे केलेले आयोजन ऑनलाईन बुकिंगलाच शो हाऊसफुल्ल असा जबरदस्त रिस्पॉन्स देणारे. मी ‘गाईड’साठी (Guide Movie) आलो तेव्हाच बाजूच्या स्क्रीनवर ‘जाॅनी मेरा नाम’ होता. एकाच वेळेस दोन्ही चित्रपट पाहता येत नाहीत हे चांगले की वाईट?
तेवढ्यात जॅकी श्राॅफ, राजीव राॅय, दिव्या दत्ता, विजय आनंदचा मुलगा असे अनेक जण येत असतानाच वहिदा रेहमान आल्या. वातावरण एकदम बदलून गेले. त्यांनी चॅनेल्सना बाईट दिले. छोटसं भाषणही केले. त्यांनाही ‘गाईड’ सुरु करा याची उत्सुकता होती. ती त्या पटकन म्हणाल्याही. मल्टीप्लेक्समध्ये येऊन आवर्जून जुने चित्रपट पाहणारा मोठा वर्ग आजही आहे याचा वितरकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करावा. रसिकांअभावी अनेक शो रद्द होतात त्या नामुष्कीपेक्षा हे उत्तम. अनेक जुने पिक्चर त्यातील लोकप्रिय गीत संगीताने सतत पुढील पिढीत जात राहिलेत तेच कालच्या व आजच्या पिढीला मल्टीप्लेक्समध्ये पहावेसे वाटतील. ‘गाईड’ हा काळाच्या पुढचा चित्रपट होता, त्याची थीम व मांडणी पाहता तो आजचाही चित्रपट आहे. विशेष उल्लेखनीय गोष्ट, मूळ लांबी तीन तास व चाळीस मिनिट असूनही आपण त्यात गुंतत जातो. त्यात एकरुप होतो. अगोदर हा चित्रपट चेतन आनंद दिग्दर्शित करणार होता पण त्यांना प्रिया राजवंश ‘रोजी’च्या भूमिकेत हवी होती यावर अडलं ते बरेच झाले.असो, तो वेगळाच विषय.
========
हे देखील वाचा : स्टार्सचे बंगले इतिहासजमा होतायेत…
========
उत्तम चित्रपट म्हणजे काय आणि त्याचा पुनःप्रत्ययाचा आनंद म्हणजे काय तर ते हेच असते. ‘गाईड’सारखे क्लासिक चित्रपट पुन्हा पुन्हा बनत नाहीत पण पुन्हा पुन्हा अनेकदा पाहता मात्र येतात. आणखीन एक विशेष, ‘मै तेरे लिए’ ( सुनील आनंद व मीनाक्षी शेषाद्री यांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाच्या मेहबूब स्टुडिओतील मुहूर्ताला तिघेही आनंद बंधु हजर असल्याचे अनुभवलय हा माझ्यासाठी यादगार पल) हा चित्रपट पूर्ण झाल्यावर खारच्या केतनव डबिंग थिएटरमधील कार्यालयात विजय आनंदची अर्थात गोल्डीची मुलाखत घेतली तेव्हा मला त्याने भेट म्हणून दिलेले ‘गाईड’चे बुकलेट माझ्या कलेक्शनमध्ये आहे, हेही एक सुखच.