या कारणामुळे भाऊ कदमला डोंबिवली प्रिय
चला हवा येऊ द्या मध्ये अनेकदा आपण डोंबिवलीच्या संदर्भात वेगवेगळे विनोद ऐकले आहेत. अनेकदा या शो मध्ये डोंबिवलीचा उल्लेख आपण ऐकतो. सुप्रसिद्ध अभिनेते आणि हवा येऊ द्या मधील विनोदवीर भाऊ कदम यांच्या तोंडीसुद्धा हे विनोद अनेकदा आपण ऐकतो. या डोंबिवली कनेक्शन मागे कारणसुद्धा खास आहे. जाणून घेऊया….
भाऊ कदम आणि डोंबिवली शहराचे नाते विशेष आहे. अनेक वर्षे भाऊ कदम डोंबिवलीमध्ये राहिलेले आहेत. टीव्हीवर फु बाई फु सुरू असताना भाऊ कदम आणि अभिनेते कुशल बद्रिके ट्रेनने दररोजचा प्रवास करून शूटिंगला पोचायचे. डोंबिवलीतील गर्दी त्यांनी अनुभवलेली आहे. याच कारणामुळे डोंबिवलीशी भाऊ कदम यांचे अत्यंत जवळचे नाते आहे. वडाळ्यामध्ये राहणारे भाऊ कदम वडिलांच्या निधनानंतर डोंबिवलीमध्ये आले. त्यानंतर अडीअडचणीच्या काळात डोंबिवलीने भाऊ कदम यांना नेहमीच आधार दिला आहे. नोकरी आणि करिअर अशी तारेवरची कसरत करत असताना डोंबिवलीने सामर्थ्य दिले असल्याचे भाऊ कदम यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
भाऊ कदम डोंबिवलीमध्ये आल्यानंतर वडाळा आणि डोंबिवली या दोन परिस्थितीत बरीच तफावत होती. पण जगण्याचे स्पिरीट डोंबिवली शहराने त्यांना दिले. अभिनय क्षेत्रातच करिअर करण्याचे त्यांनी नक्की केले होते. पण केवळ यावर अवलंबून बसणे शक्य नसल्याने लहान-मोठ्या नोकऱ्या भाऊ कदम यांनी सुरू केल्या. याच काळात काही कार्यालयांत कारकुनीचे काम ते निवडणुकीच्या काळात मतदारांची नावे नोंदवणे अशा अनेक कामांचा अनुभव मिळत होता. पण नाटकात करिअर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या नोकऱ्या करणे भाग होते.
याच दरम्यान अभिनय क्षेत्रात पदार्पण झाले. वेगवेगळ्या छोट्या भूमिका मिळत होत्या. पण घरखर्च चालविण्यासाठी काही तरी दुसरा उपाय शोधणे अपरिहार्य होते. याच वेळी डोंबिवलीत त्यांनी भावाबरोबर पानाचे दुकान थाटले. त्यावेळी लहान-मोठ्या भूमिका करत असल्याने थोडे फार प्रेक्षक ओळखत होते. अशा वेळी दुकानात आलेल्यांना वाटणारे आश्चर्य त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असे. पण कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्याचे सामर्थ्य डोंबिवलीनेच भाऊ यांना दिले.
याच कारणाने अनेकदा भाऊ कदम यांच्या संदर्भाने चला हवा येऊ द्या मध्ये डोंबिवलीचा संदर्भ घेतला जातो. कितीतरी डोंबिवली स्पेशल विनोद भाऊ कदम यांच्या नावाने व्हायरल झाले आहेत. मात्र विनोदाचा भाग बाजूला सोडला तरी भाऊ कदम यांना डोंबिवली शहराविषयी प्रेम आणि आत्मियता आहे.
केवळ कलाकार म्हणूनच नाही, तर एक सक्षम माणूस म्हणून घडविण्यात डोंबिवलीचे मोठे श्रेय आहे असं भाऊ नेहमी सांगतात. भाऊ आणि डोंबिवली हे नातंच इतकं स्पेशल आहे. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून ते डोंबिवलीबद्दल असलेलं आपलं प्रेम व्यक्त करत असतात. डोंबिवलीबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी जोक्सच्या माध्यमातून हवा येऊ द्या मधून ते मांडत असतात. डोंबिवलीकर भाऊ कदम अशीच हवा येऊ द्या मुळे ओळख झाली आहे. याचबरोबर या सर्व जोक्समुळे डोंबिवलीलाही एक वेगळी उंची मिळाली आहे हे निश्चित.
-आदित्य बिवलकर .