‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
ती रेखा आहे म्हणून…
ब्रेकिंग न्यूज कोणती आहे सांगा? चार पर्याय देतो… रेखाने (Rekha) उपग्रह वाहिनीवरील ‘गुम है किसी के प्यार मे’ या मालिकेसाठी टीझरचे उत्साहात शूटिंग केले. याच टीझरच्या शूटिंगसाठीचे घसघशीत मानधन म्हणून तब्बल दहा कोटी घेतले? (मनोरंजक उद्योगातील सगळ्याच गोष्टी सध्या वाढत्या आकड्यात मोजल्या जातात यावरुन हे खरं असू शकेलही कदाचित. प्रत्येक गोष्ट पैशात हा आजचा जणू मूल्यमापनाचा फंडा आहे.) या मालिकेमुळे रेखा तुमच्या खरं तर जगभरातील अनेक देशात एका प्रभावी व्यक्तीरेखेतून उपग्रह वाहिनीवरुन घराघरात दिसणार. (Rekha)
रेखा (Rekha) आपल्या कारकीर्दीच्या वयाच्या पन्नाशीनंतरही बातम्यात आहे. ती कोणत्या नवीन चित्रपटात भूमिका साकारतेय. ती कोणत्या इव्हेन्टसमध्ये सहभागी झाली. तिने कोणत्या म्युझिकल रिॲलिटी शोमध्ये सहभाग घेतला. आपण रुपेरी पडद्यावर साकारलेल्या गाण्यांच्या आठवणी सांगितल्या. ती फ्लॅशबॅकमध्ये गेली हे सगळेच कौतुकाचा विषय असते. या चारपैकी कोणत्या पर्यायाला तुमची पसंती आहे? पब्लिक कौल घेतला तर प्रत्येक पर्यायाला कमी जास्त मते नक्कीच मिळतील असाच रेखाचा जबरदस्त स्टारडम आहे. तो टिकवणे इतकं सोपे नसते. आपल्याभोवती वलय निर्माण करणे आणि मग त्याच वलयात वावरणे हे देव आनंदला शक्य झाले. पण देव भक्त कायमच विजय आनंद दिग्दर्शित ‘जाॅनी मेरा नाम’ (१९७०) पर्यंतच्या रोमॅन्टीक, स्टाईलीश देव आनंदवर बेहद्द प्रेम करत राहिले.
रेखाची (Rekha) गोष्टच वेगळी. एकदा रेखाचा झालेला फॅन कायमच रेखाचा फॅन असतो. तिचा बहुस्तरीय अभिनय, तिचं असणं (दिसणं, पाहणं, हसणं या गोष्टी अर्थात), तिचा फिटनेस, लूक व फोटो सेशनमधील सातत्य आणि ती कायमच वर्तमानात वावरली या गोष्टींसाठी रेखा ओळखली जाते. तिच्याइतकं गाॅसिप्स अन्य कोणाच्याही आसपास फिरकले नाही. त्या गाॅसिप्समध्ये तथ्य किती, रिॲलिटी किती, मीठ मसाला तिखट खारट किती हे खुद्द रेखाच जाणे. अनेकदा त्या गाॅसिप्समध्ये सवंगताच होती. सेलिब्रिटीजबद्दल काहीही वाह्यातपणा ही जणू फॅशन आहे. त्या पलिकडे जाऊन ती एक समंजस, मेहनती, अंतर्मुख होणारी, बुध्दीमान व्यक्ती असतेच असते. म्हणून तर त्या व्यक्तीची जडणघडण होत असते. रेखा नक्कीच तशी आहे. तिच्या नशिबी पहिला चित्रपट मोहन सैगल दिग्दर्शित ‘सावन भादों’ ( १९७०) पासूनच गाॅसिप्स पहिल्या क्रमांकावर राहिलय.
त्यामुळेच खुबसुरत, घर, मुकद्दर का सिकंदर, उमराव जान, आस्था या चित्रपटातील दर्जेदार अभिनयाचं म्हणावं तसे कौतुक झाले नाही. ‘उमराव जान ‘साठी अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला पण जास्त चर्चा तेव्हा तिने कोणाच्या नावाने ‘मांग मे सिंदूर ‘भरला याची झाली. ‘आस्था’च्या दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांच्या वांद्रे येथील कार्टर रोडवरील बंगल्यावर मुहूर्त व शूटिंग रिपोर्टीसाठी सेटवर बराच काळ थांबलो तेव्हा आपल्या दृश्यात, दिग्दर्शकाच्या सूचनांत, रिटेकमध्ये रस घेत घेत आपलं दृश्य अधिकाधिक खुलवणारी रेखा साक्षात पाहता आली आणि तसंच लिहिलं. खरी रेखा अशी आहे आणि म्हणूनच इतकी वर्ष तिचं अभिनयकौशल्य, सेलिब्रिटीज पोझिशन, वाढते फॅन्स फाॅलोअर्स आणि मिडिया फोकस या गोष्टी कायम आहेत. तात्पर्य, सुरुवातीला केलेल्या प्रश्नातील चौथा पर्याय हेच उत्तर असू शकते.
रेखा (Rekha) म्हणजे तिच्या छोट्या छोट्या गोष्टींची हुकमी बातमी असं कायमच घडत आले आहे. रेखाने सबकुछ सुषमा शिरोमणीच्या मसालेदार मनोरंजक चित्रपट ‘फटाकडी’मध्ये कुठं कुठं जायाचं हनिमूनला ही फक्कडबाज लावणी साकारली आणि पिक्चर धो धो गर्दीत चाललं याची बातमी झाली. मराठी चित्रपटातील पहिलं आयटेम साँग हे ठरले. यश चोप्रा दिग्दर्शित ‘सिलसिला’मध्ये अमिताभ, जया बच्चन व रेखा एकत्र आले तोच अनेक गाॅसिप्स, स्कूप्स, काॅन्ट्रोव्हर्सिस, मिडिया स्टोरीजचा जन्म झाला. अबब म्हणावं असा हा भन्नाट प्रकार होता. अनेक स्टार्स, सेलिब्रिटीजना रेखाला भेटण्याचा मनमुराद आनंद होतोच. वर्षा उसगावकरने आपल्या रेखा भेटीचे फोटो सोशल मिडियात पोस्ट करत भरपूर लाईक्स मिळवले. अर्थात, वर्षा भेटीचा रेखालाही तितकाच आनंद झाल्याचे फोटोत दिसतयं.
======
हे देखील वाचा : ‘खोताची वाडी’ अख्खं पिक्चर काय, वेबसिरिज बनेल
======
सिनेमा बदलला, तो पाहण्याच्या पध्दतीत सिंगल स्क्रीन थिएटर्स ते ओटीटी फ्लॅटफाॅर्म असा प्रवास झाला, मिडियात केवढा तरी बदल दिसतोय. आज लहान मोठी गोष्ट घडताच त्याची बातमी होतेय. या सगळ्यात रेखा (Rekha) टिच्चूनपणे टिकून आहे आणि तिचं ग्लॅमर, तिची पोझिशन याचेच उत्तम मूल्य तिला ‘गुम है किसी के प्यार मे’ या मालिकेच्या टीमधील सहभागाला दिले आहे.
असं कौतुकाने म्हणता येईल, ती रेखा आहे म्हणून…