रेवथी एक परिपूर्ण अभिनेत्री…
लव चित्रपटात ती सलमानबरोबर चुलबुली मॅगी बनून आली. नंतर रात मध्ये तिचे डोळे बघून अनेकांची झोप उडाली. काही वर्षांनी ती अमिताभसमोर उभी राहीली आणि निशब्द करुन गेली. आता अलिकडच्या वर्षात ती आपल्या लाडक्या मद्रासी लूकमध्ये टू स्टेटस मधील फरक म्हणजे काय हे सांगताना दिसली. ही ती म्हणजे रेवथी. हिंदीमध्ये अत्यंत मोजक्या चित्रपटात झळकलेली ही अभिनेत्री दाक्षिणात्य चित्रपटातील आघाडीची अभिनेत्री आणि दिग्दर्शिकाही आहे.
रेवथी चे मूळ नाव आशा केलुन्नी नायर. आशाचा जन्म केरळच्या कोची शहरातला. तिचे वडील मालांक केलुन्नी नायर हे भारतीय लष्करातमध्ये मेजर पदावर होते. मल्याळम अभिनेत्री गीता विजयन ही आशा यांची चुलत बहिण. शाळेत असतांना त्यांनी एका फॅशन शो मध्ये भाग घेतला. या शो दरम्यान ग्रुप फोटो घेण्यात आले. योगायोगानं यातीलच एक फोटो लोकप्रिय तमिळ मासिकाच्या पहिल्या पानासाठी निवडण्यात आला. हा अंक प्रसिद्ध दिग्दर्शक भारथिराजा यांनी पाहिला. भारथिराजा हे नवीन अभिनेत्रींना लाँच करण्यासाठी प्रसिद्ध होते. आपल्या चित्रपटासाठी नवीन चेहरे शोधण्यासाठी ते ओळखले जायचे. आपल्या चित्रपटात नवीन चेहरा शोधण्यासाठी भारथिराजा अनेकवेळा कॉलेजजवळील बसस्टॉपवरही चकरा मारत असत. त्यांना त्यांच्या मन वासनाई या चित्रपटासाठी असाच फ्रेश चेहरा हवा होता. हा शोध आशापर्यंत येऊन थांबला.
त्यानंतर आशा नामांतर झाले रेवथी. सहज सुंदर अभिनय आणि प्रचंड बोलके डोळे. यामुळे रेवथीची छाप दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पडली. दक्षिण भारतीय सिनेमाच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचा समावेश झाला. विजयशांती, राधिका आणि राधा या सारख्या समकालीन अभिनेत्रींमध्ये सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून तिची ओळख होती. तामिळ, तेलगू आणि मल्याळम मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार जिंकणारी रेवथी 80 आणि 90 या दशकातली एकमेव दक्षिणात्या अभिनेत्री ठरली. यासोबत राष्ट्रीय पुरस्कार आणि अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कारही या अभिनेत्रीच्या नावावर जमा आहेत.
हिंदीमध्ये रेवथीनं एन्ट्री घेतली ती समलान खान सोबत. 1991 मध्ये लव या चित्रपटातून. साथीया ये तूने क्या किया. मैने किया तेरा इंतजार. हे या चित्रपटातलं गाणं तेव्हा चांगलच गाजलं होतं. विशेष म्हणजे तेव्हा रेवथी तामिळ आणि मल्याळम चित्रपटातील यशस्वी अभिनेत्री होती. तर सलमान हिंदीमध्ये नवखा होती. त्यानंतर रात या भयपटात तिच्या अभिनयानं अंगावर काटा उभा राहीला. धूप, मुस्कुराहट, अंजली, डरना मना है, फिर मिलेंगे, दिल जो भी कहे असे तिचे हिंदीत चित्रपट आले. अमिताभ बरोबर तिने निशब्द केला. नवरा त्याच्या मुलीच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडतो. ही प्रेमकहाणी त्याच्या बायकोला समजल्यावर तिची होणारी अवस्था. निशब्द मध्ये अमिताभ आणि रेवथीच्या अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळाली. अलिकडच्या टू स्टेटस् मध्ये या अभिनेत्रीनं धमाल उडवून दिली होती. मद्रासी घरातील मुलीनं पंजाबी मुलाबरोबर केलेलं प्रेम आणि मग लग्न करण्यासाठी या दोघांची होणारी तगमग. त्यात त्यांच्या पालकांची भूमिका. रेवथी यात मद्रासी आईच्या भूमिकेत फिट बसली होती.
प्रसिद्ध दिग्दर्शक सुरेशचंद्र मेनन यांच्याबरोबर रेवथीनं लग्न केलं. अनेक वर्षाच्या संसारानंतर ही दोघं वेगळी झाली. रेवथीनं माही नावाच्या मुलीला दत्तक घेतलं असून आता वयाची पन्नाशी पार केलेली ही अभिनेत्री दिग्दर्शनात अधिक रस घेत आहे. मित्र माय मित्र हा तिनं दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपटही गाजला. इंग्रजी भाषेचा सर्वोत्कृष्ठ राष्ट्रीय पुरस्कारही या चित्रपटाला मिळाला. चित्रपटांव्यतिरिक्त ती अनेक सामाजिक संस्थांमध्ये सक्रीय आहे. क्षमता फाउंडेशन, टँकर फाउंडेशन आणि विद्यासागर अशा संस्थामध्ये तिचे योगदान महत्त्वाचे आहे. तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड या चित्रपटसृष्टीवर रेवथीनं स्वतःचा ठसा उमटवला आहे. तिचे देवर मगन, मौना रागम 86, पुन्नगाई मानन, किलुक्कम, जॅकपॉट, मन वसनाई, दवासुरम, अंकुराम, काकोठी कवि अप्पूपन थडीगल, थालाईमुराई हे चित्रपट म्हणजे अप्रतिम अभिनयाचा नमुना म्हणून अनेक नवोदितांसाठी अभ्यासाचा विषय ठरले आहेत. यशाच्या शिखरावर असूनही ती कधी या चित्रपट सृष्टीच्या अधीन गेली नाही. आपलं खरं वय लवपण्याचा ना कधी प्रयत्न केला ना मेकअपचा आधार घेतला. भारतीय संस्कृतीला सर्वश्रेष्ठ मानणा-या या अभिनेत्रीला कलाकृती मिडीयातर्फे अनेक शुभेच्छा…