पद्मिनी कोल्हापुरेने लगावली ऋषी कपूरच्या कानशिलात
चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान असे अनेक किस्से घडतात जे नंतर बरीच वर्ष प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. अलीकडे कलावंत आपले आत्मचरित्र लिहीत आहेत त्यातून आपल्याला या अनेक घटनांची माहिती होते. ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांनी त्यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या आत्मचरित्रामध्ये अशाच काही गमतीशीर घटनांची नोंद केली आहे. त्यातीलच हा एक किस्सा आहे. हा किस्सा आहे ‘प्रेम रोग’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यानचा.
१९८१ साली प्रदर्शित झालेला ‘प्रेम रोग’ हा चित्रपट आर के बॅनर खाली राज कपूर यांनी दिग्दर्शित केला होता. विधवा पुनर्विवाह हा विषय खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी यात मांडला होता. खरंतर हा विषय तसा त्यावेळी देखील कालबाह्य होत होता पण तरीही राज कपूर नाही त्याच्या खास स्टाईलने हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात ऋषी कपूरची (Rishi Kapoor) नायिका होती पद्मिनी कोल्हापुरे. पद्मिनी आणि ऋषी कपूर यांनी अनेक चित्रपटात एकत्र भूमिका केल्या. जमाने को दिखाना है, राही बदल गये, प्यार के काबील, ये इश्क नही आसान… त्यामुळे दोघांमध्ये चांगले ट्युनिंग झाले होते. दोघांच्या वयात तसे १५ वर्षाचे अंतर होते. पद्मिनी कोल्हापुरे बालकलाकाराकडून अभिनेत्रीच्या भूमिकांकडे वळत होती. त्यामुळे तिच्यासाठी देखील हा चित्रपट खूप महत्त्वाचा होता. या चित्रपटामध्ये एका सीनमध्ये पद्मिनी कोल्हापुरेला ऋषी कपूरच्या तोंडात एक थप्पड मारायची होती. हा या चित्रपटातील खूप महत्त्वाचा सीन होता. त्यामुळे राजकपूर यांनी या सीनवर विशेष लक्ष दिले होते. जनरली चित्रपटांमध्ये थप्पड चित्रित करत असताना जरी हात वेगाने येत असला तरी तो जेव्हा गालावर पडतो तेव्हा तो सॉफ्ट असतो आणि त्यात फक्त थपडेचा मोठा आवाज क्रिएट केला जातो.
पण या दृष्यात राज कपूरला इथे फिल्मी थप्पड नको होती. त्यांना खरी खुरी थप्पड हवी होती. त्यामुळे त्यांनी पद्मिनीला सांगितले,” तू ऋषी कपूरच्या गालावर जोरात थप्पड मार!” पद्मिनी ऋषी कपूर पेक्षा सर्वच बाबतीत लहान होती. वयाने तर लहान होतीच पण स्टेटस नुसार देखील ती लहान होती. त्यामुळे एवढ्या मोठ्या अभिनेत्याला थप्पड कशी मारायची ? ती घाबरत होती. त्यामुळे सारखे रिटेक्स होत होते. त्यामुळे राज कपूर चिडले ते पद्मिनीला म्हणाले,” तुझा काय प्रॉब्लेम आहे ? विसरून जा तू पद्मिनी कोल्हापुरे आहेस आणि हा ऋषी कपूर आहे. सिनेमातील व्यक्तीरेखा मनोरमा देवधरला मारत आहे ! ती प्रचंड चिडली आहे. द्विधा मनस्थितीत आहे. तो संताप, त्वेष, चीड या थप्पडमध्ये दिसली पाहीजे. तेव्हा आता काही मागेपुढे न पाहता त्या व्यक्तिरेखेत घूस आणि जोरदार थप्पड मार!” अशा पद्धतीने पद्मिनीने सगळा जीव हातात आणून ऋषी कपूरच्या गालावर थप्पड मारली. राज कपूर म्हणाले,” नाही अजून जोरात पाहिजे, अजून जोरात पाहिजे!” असे म्हणत चक्क पाच-सहा थप्पड मारल्यानंतर आठव्या थपडेला शॉट ओके झाला. बिचाऱ्या ऋषी कपूरचा (Rishi Kapoor) गाल लाल लाल झाला होता आणि सुजला देखील होता. पद्मिनीला खूपच ओशाळल्यासारखं झालं होतं. ती रडायलाच लागली आणि ऋषी कपूरला सॉरी सॉरी म्हणू लागली. ऋषी कपूर हसू लागला तो डोळे मिचकावत म्हणाला,” ठीक आहे. नो प्रॉब्लेम. मेरा भी टाईम आयेगा. तब देख लूंगा!”
आणि त्यानंतर खरोखरच काही वर्षातच हा प्रसंग पुन्हा आला हा चित्रपट होता ‘राही बदल गये’. या चित्रपटात ऋषी कपूरला (Rishi Kapoor) पद्मिनीच्या गालावर एक थप्पड मारायची होती. ऋषी कपूर पद्मिनीला म्हणाला,” आ गया, अब मेरा टाईम आ गया!” पद्मिनी खूपच घाबरली पण ऋषी कपूर जंटलमन होता तो तसा म्हटला तरी त्याने तिला खोटी खोटी फिल्मी थप्पडच मारली. अशा पद्धतीने ऋषी कपूरने कुठलाही बदला न घेता प्रोफेशनलीझम दाखवला.
============
हे देखील वाचा : यामुळे शांताराम बापूंनी वसंतराव यांना मिठी मारली
============
प्रेम रोग हा चित्रपट १९८१ सालचा सुपरहिट सिनेमा ठरला. बाल विधवा झालेल्या पद्मिनीची भूमिका प्रेक्षकांना आणि समीक्षकांना इतकी आवडली की तिला त्यावर्षीचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. या चित्रपटासाठी राज कपूर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. खरंतर या चित्रपटाचे शूट होत असताना राज कपूर यांची तब्येत बरी नव्हती. संपूर्ण चित्रपट त्यांनी खुर्चीवर बसूनच दिग्दर्शित केला. यावर्षी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ‘शक्ती’ या चित्रपटासाठी दिलीप कुमार (Rishi Kapoor) यांना मिळाला. त्यावेळी दिलीप कुमार चे वय त्या वेळी ६० वर्षे होते आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ची भूमिका करणाऱ्या पद्मिनी कोल्हापुरेचे वय १६ वर्षे होते. हीच बॉलीवूडची खरी गंमत आहे. प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला भरभरून प्रेम दिले. आज देखील हा चित्रपट जेव्हा चॅनलवर लागतो तेव्हा प्रेक्षक तो आवडीने पाहतात.