कोणत्या चित्रपटाच्या अपयशाने ऋषी कपूर डिप्रेशनमध्ये गेला?
मनाचे खेळ खूप विचित्र असतात. काल्पनिक भीती माणसाचं जिणं कठीण करून टाकते. भीतीचे रुपांतर मग नैराश्यात होते. या डिप्रेशनमुळे माणूस आणखी खचत जातो. अभिनेता ऋषी कपूर यांना एकदा याच सिच्युएशनमधून जावे लागेले होते. ‘खुल्लम खुल्ला’ या त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी हा किस्सा खूप विस्ताराने लिहिला आहे. अभिनेता ऋषी कपूर एकदा प्रचंड डिप्रेशनमध्ये गेला होता. इतका की त्याला मानसोपचार तज्ञाची मदत घ्यावी लागली होती. त्याच्या या नैराश्यांच्या आजारामुळे त्याच्या चार चित्रपटांचे चित्रीकरण थांबले होते. यातून तो कसा बाहेर आला? काय होता तो नेमका किस्सा? आणि मुख्य म्हणजे ऋषी कपूर डिप्रेशन मध्ये का गेला होता? (Karz)
चॉकलेट हिरो ऋषी कपूर ‘बॉबी’ या चित्रपटापासून नायकाच्या रुपात रुपेरी पडद्यावर आला. यानंतर त्याच्या रोमँटिक इमेजच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगला बिजनेस केला. खेल खेल मे, हम किसीसे कम नही, जहरीला इंसान, रफूचक्कर…. हे त्याचे सिनेमे त्याच्या चॉकलेट इमेजमुळे सुपर हिट होत होते. १९८० साली सुभाष घई यांनी ऋषी कपूर, टीना मुनीम यांना घेऊन ‘कर्ज’(Karz) हा चित्रपट बनवला. पुनर्जन्मावर आधारित हा म्युझिकल हिट सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच गाजत होता. कारण याच्या गाण्यांच्या रेकॉर्डसने लोकप्रियतेचा कळस गाठला होता. त्यातील ‘ओम शांती ओम’ या गाण्याने जबरदस्त हंगामा केला होता.
१३ जून १९८० या दिवशी ‘कर्ज’ प्रदर्शित झाला आणि पहिल्या दिवशीपासून त्याला जबरदस्त ओपनिंग मिळाले. ११ जूनला त्याचा मोठा प्रीमियर झाला. सर्वांनी सिनेमाची तारीफ केली. ऋषी कपूर प्रचंड खुश झाला. आपल्या कारकीर्दीतील हा नक्कीच महत्त्वाचा सिनेमा ठरणार असे त्याला वाटले. आजच्यासारखे त्या वेळी चित्रपटाचे भवितव्य पहिल्या आठवड्यातच ठरत नसायचे. हळूहळू टप्प्याटप्प्याने चित्रपट संपूर्ण देशभर प्रदर्शित होत असे. ‘कर्ज’(Karz) या चित्रपटाच्या यशाची चर्चा सुरुवाती पासून वाढू लागली.
‘कर्ज’ हा चित्रपट मुंबईमध्ये १३ जूनला प्रदर्शित झाला आणि नंतर टप्प्याटप्प्याने तो संपूर्ण देशात प्रदर्शित होत गेला. पण पुढच्या शुक्रवारी फिरोज खान यांचा ‘कुर्बानी’ हा चित्रपट २० जून १९८० या दिवशी प्रदर्शित झाला आणि ‘कर्ज’(Karz) या चित्रपटाच्या तिकीट खिडकीवरील रसिकांच्या गर्दीचा ओघ अचानक कमी झाला. पुढची तीन महिने ‘कुर्बानी’च्या समोर एकही चित्रपट टिकू शकला नाही. याला ‘कर्ज’ देखील अपवाद नव्हता. देशात सर्वत्र ‘कुर्बानी’ची प्रचंड हवा निर्माण झाली होती. यातील गाणी, सिनेमाचा स्टायलिश चकाचक लुक, फिरोज खान विनोद खन्ना, झीनतमानसारखे तगडे स्टार कास्ट, ‘आप जैसा कोई हे’ बिडूने संगीतबध्द केलेले आणि नाझिया हसनने गायलेले गाणे तेव्हा देशभर प्रचंड हिट झाले होते. यामुळे आठ दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘कर्ज’ या चित्रपटाची रयाच गेली!
या साऱ्या प्रकाराने ऋषी कपूर प्रचंड डिप्रेशनमध्ये गेला. इतका की त्याने त्याच्या नव्या सिनेमाच्या शूटिंगला जाणेच बंद केले. अपयशाच्या काल्पनिक भीतीने त्याने स्वतःला कोंडून घेतले. त्यावेळी त्याचे नसीब, प्रेमरोग, जमाने को दिखाना है आणि दीदार ए यार या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते पण पुढचे पाच महिने ऋषी कपूर यांनी स्वतःला घरातच कोंडून घेतले होते. ‘कुर्बानी’च्या तुलनेत ‘कर्ज’(Karz) या चित्रपटाला आलेल्या अपयश त्याला मान्यच होत नव्हते.
राजकपूर यांना आता काळजी वाटू लागली. त्यांनी एका psychiatrist ला बोलवून ऋषी कपूरवर प्रॉपर ट्रीटमेंट सुरू केली. त्याला घेऊन ते पुण्याजवळच्या लोणी येथील फार्म हाऊसवर घेऊन गेले. ‘दिदार ए यार’चे दिग्दर्शक रवेल यांनी त्याला एक लाख रुपये पाठवून त्याला तू संपलेला नाहीस अशी जाणीव करून दिली. रिना रॉय देखील आपल्या बिझी शेड्युलमधून डेट्स काढत ऋषी कपूरसाठी ‘दीदार ए यार’ या चित्रपटातील कवालीसाठी आली. ऋषी कपूरचे त्या काळात घाबरणे देखील खूप वाढले होते. सेटवर गेल्यानंतर कुठला लाईट आपल्या डोक्यावर पडून आपण जायबंदी होतो का अशी भीती त्याला वाटत होती.
========
हे देखील वाचा : जेव्हा दिलीप कुमार यांनी भर कोर्टात मधुबाला वरील जाहीर प्रेमाची कबुली दिली!
========
त्याचे लग्न होऊन तीन-चार महिने झाले होते. अशा दुरुमुखलेल्या स्थितीत तो आपल्या लग्नाला देखील दोष देत होता. मानसिक अवस्था विचित्र असली की असेच घडत जाते. सगळीकडून कोंडी झाली होती. आता बॉलिवूडमध्ये मिडीयात देखील ऋषी कपूरच्या आजारपणाची चर्चा होऊ लागली होती. पण हळूहळू दिवस पालटू लागले. दिवाळीच्या वेळेला पुन्हा एकदा ‘कर्ज’(Karz) चित्रपटाची हवा निर्माण झाली पुन्हा एकदा हा चित्रपट काही चित्रपटगृहात नव्याने प्रदर्शित करण्यात आला. सिनेमाची गर्दी आणि यश पाहून ऋषी बरा होत गेला. चित्रपट सृष्टीतील अनेकांनी ऋषी कपूरला मनाच्या उभारी साठी प्रयत्न केले आणि हळूहळू तो या डिप्रेशन मधून संपूर्ण पणे बाहेर आला!