डाकूपट एन्जाॅय केले जात…
डाकूंचे पिक्चर काय पाहायचे? पहिल्यापासून शेवटपर्यंत गोळीबार आणि आरडाओरड, असं कदाचित आजही जगभरातील अनेक जाॅनरचे मुव्हीज ओटीटीवर पाहणारी आजची डिजिटल पिढी म्हणेल. या डाकूपटांनीही एक काळ चित्रपट रसिकांच्या मनावर राज्य केले. डाकूपट म्हणजे, वाळवंटी प्रदेश, जबरदस्त घोडेस्वारी, आक्रमक डायलॉगबाजी, चित्कार, बंदूकीचे आवाज, गावठी बाॅम्बचे एकमेकांवरचे हल्ले, सूडाची जबरा भावना, बदले की आग, खून खराबा आणि क्लायमॅक्सला घनघोर फायटींग अशी एक सर्वसाधारण वरकरणी कल्पना. (Robbery Movie)
पण सगळेच डाकूपट सारखे नव्हते, काही वेगळेही होते, आशयपूर्ण होते, काही तर गीत संगीत व नृत्यमय होते.
रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शोले’ (१९७५) हा आपल्याकडील सर्वकालीन बहुचर्चित सुपर हिट चित्रपट डाकूपटच आहे. यावरुन डाकूपटाची संस्कृती दुर्लक्षित करण्यासारखी नाही हे अधोरेखित होतेय. वेगळे डाकूपट म्हणून कायमच राज कपूर अभिनित व निर्मित आणि राघु कर्मकार दिग्दर्शित ‘जिस देश में गंगा बहती है’ आणि सुनील दत्त निर्मित व मोनी भट्टाचार्य दिग्दर्शित ‘मुझे जीने दो’ यांची नावे आवर्जून घ्यायलाच हवीत. डाकूमध्येही माणूस असतो हे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे हे चित्रपट. या दोन्ही चित्रपटातील संगीत आजही लोकप्रिय आहे, येथे दिग्दर्शक दिसतो.(Robbery Movie)
साठ आणि सत्तरच्या दशकात मोठ्याच प्रमाणावर डाकूपट निर्माण होताना त्यात हाणामारीचा फाॅर्मुला जास्त पाॅवरपॅक होता. आणि पब्लिकला असे दे मार पिक्चर फारच आवडत. दारासिंगच्या स्टंटपटात डाकू आणि लूट याच्या गोष्टी दिसल्या. डाकू मंगलसिंग, डंका, लुटेरा, राका या चित्रपटांची नावे आवर्जून सांगता येतील. दारासिंगची पिळदार शरीरयष्टी अशा पिक्चरमध्ये जास्तच ताकदवान ठरे. आणि ढिश्यूम ढिश्यूम मारधाड करीत, गोळीबारी करीत मनोरंजनाचा अनेक प्रकारचा मसाला खच्चून भरलेले डाकूपटही अनेक. मेरा गाव मेरा देश, समाधी, चंबल की कसम, आखरी डाकू, खोटे सिक्के, प्राण जाए पर वचन न जाए, बिंदीया और बंदूक, हीरा, गंगा की सौगंध, आखरी डाकू, अहिंसा, प्रतिज्ञा, पत्थर और पायल, हत्यारा, धरमकांटा, मेरा दोस्त मेरा दुश्मन, गोरा और काला, दो उस्ताद, महावीरा, डकैत, भोला भाला, धर्मसंकट, जय विक्रांत, दाता, ज्वाला डाकू, गुलामी, बटवारा वगैरे वगैरे…(Robbery Movie)
डाकूपटची लागण नायिकाप्रधान पिक्चर्सनाही लागली यात आश्चर्य काय हो? काही नायिकाप्रधान डाकूपट फुलनदेवीच्या पराक्रमच्या गोष्टींवर आधारित ते पिक्चर होते त्यात शेखर कपूर दिग्दर्शित ‘बॅन्डिक्ट क्वीन’ अतिशय वास्तववादी आणि डाकूचे जीवन, त्यांची मानसिकता, सुख, दु:ख दाखवणारा होता. कोणत्या सामाजिक परिस्थितीतून एकादी व्यक्ती डाकू बनते याची त्यात कथा व्यथा होती. याशिवाय कहानी फूलन की, जख्मी जमीन, डाकू हसिना, मेरा शिकार, शेरनी, काली गंगा असे अनेक नायिकाप्रधान डाकूपट आले.(Robbery Movie)
यातील अनेक डाकूपटांचे शूटिंग नाशिक जिल्ह्य़ातील दूरवर कोठेतरी होई, आणि जोडीला मुंबईतील चांदिवली स्टुडिओ, एसेल स्टुडिओ येथेही डाकूपटाला साजेसे स्पाॅट आहेत आणि उत्तम एडिटींगने पडद्यावर हे सगळे दूरवर कुठे तरी घडतयं असं वाटे. दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांनी कायमच फतेहगढ, फतेहपूर सिकरी, राजस्थान येथील आऊटडोअर्सला शूटिंग करण्यात ते प्राधान्य देत. त्यामुळे थीमचा प्रभाव वाढत असे.(Robbery Movie)
डाकूपटांना उत्तर भारतातील अनेक छोट्या शहरात, ग्रामीण भागात भरपूर गर्दी होतेय असे कायमच म्हटले गेले. तशा प्रकारच्या घटना, बातम्या, गोष्टी त्यांच्या वाचनात कदाचित अधिक येत असल्याने आणि असे धमाकेदार पिक्चर समजायला, एन्जाॅय करायला सोपे म्हणून तसे झाले असावे. आजूबाजूच्या परिस्थितीचा आवडीनिवडीवर परिणाम होणे साहजिकच असते.
डाकूपटाच्या याच घौडदौडीतील एक उल्लेखनीय चित्रपट राज खोसला दिग्दर्शित ‘कच्चे धागे’ ( मुंबईत रिलीज ६ जुलै १९७३) ला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. यातही बदले की आग. ठाकूर लखनसिंग ( विनोद खन्ना) हा आपल्या पित्याचा खून करणाऱ्या पंडितचा ( कबिर बेदी) मुलगा तुलसीरामशी ( कबिर बेदी दुहेरी भूमिकेत) पंगा घेतो. दोघांत कडवट दुश्मनी निर्माण होते. चित्रपटात मौशमी चटर्जी, देवकुमार, मुराद, मा. भगवान, टूनटूण, जगदीश राज, रत्नमाला, पूर्णिमा, जेब रहेमान इत्यादींच्याही भूमिका आहेत.(Robbery Movie)
=======
हे देखील वाचा : ती रेखा आहे म्हणून…
=======
या घुमश्चक्रीत आनंद बक्षी यांच्या गीतांना लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे श्रवणीय संगीत हा केवढा तरी मोठाच दिलासा होता. हाय हाय एक लडका मुझको खत लिखता है, कच्चे धागे के साथ जिसे बांध लिया जाए, मेरे बचपन तू जा जवानी ले आ…. डाकूपटातील संगीत हा वेगळाच विषय. ‘कच्चे धागे’ची आणखीन एक खास गोष्ट. ‘मेरा गाव मेरा देश’ (१९७१) आणि ‘शोले’ (१९७५) यांना जोडणारा चित्रपट ‘कच्चे धागे’. आजच्या ग्लोबल युगातील चित्रपट रसिकांना अत्याधुनिक शस्त्रांचे ॲक्शनपट सहज पाहायला मिळताहेत त्यांना अशा डाकूपटांना थ्रील ते काय वाटणार म्हणा. एकेकाळी त्यात रोमांचकता नक्कीच होती…क्लायमॅक्सला पोलीस येऊन व्हीलन डाकूला पकडून नेत आणि पिक्चर संपे.