रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम: रशियात आता थेट थिएटरमध्येच ‘पायरसी’
रशियाने युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारल्यानंतर त्याचे परिणाम रशियातील मनोरंजन उद्योगावरही झाले. रशियाच्या युद्धखोरीचा जगभरातून निषेध व्हायला लागला आणि मग नेटफ्लिक्स, ॲमेझाॅन, डिस्कव्हरी यांनी रशियातली आपली ओटीटी सेवा बंद केली. ऑस्कर सारखे पुरस्कार सोहळे तसंच कान, व्हेनिस आणि युरोपातील मानाच्या फिल्म फेस्टीव्हल्समधून रशियन चित्रपट बाद करण्यात आले. रशियातील फिल्ममेकर्ससाठी हा मोठाच धक्का होता. रशियाबाहेर अनेक देशांत रशियन चित्रपटांच्या प्रदर्शनावरही बंदी घालण्यात आली.
पॅरामाउंट, डिस्नी, सोनी आणि वॉर्नर ब्रदर्स या हॉलिवूड स्टुडिओजनी रशियामध्ये आपले चित्रपट प्रदर्शित करणार नाही, असं जाहीर केलं. म्हणजेच ‘द बॅटमॅन’ सारखे ब्लॉकबस्टर्स रशियात प्रदर्शित होणार नाहीत हे मार्च महिन्यातच स्पष्ट झालं होतं. (Russia-Ukraine war & Entertainment industry)
रशियातील चित्रपटगृह मालकांच्या संघटनेनं एक पत्रक जारी केलं. त्यात त्यांनी म्हटलं, “महत्त्वाच्या देशांनी त्यांच्या चित्रपटांचं रशियातील प्रदर्शन रोखल्यामुळे आम्हाला खूप मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. रशियन चित्रपटांचा दर्जा आणि संख्या ही स्थानिक प्रेक्षकांची मनोरंजनाची भूक भागवू शकत नाही. त्यातच काही रशियन चित्रपटांनी प्रदर्शन पुढे ढकललं आहे. या परिस्थितीत आमचं ८० टक्के उत्पन्न घटणार आहे. म्हणूनच सांस्कृतिक खात्याकडून आम्हाला तातडीच्या मदतीची गरज आहे.”
आता रशियामधल्या सांस्कृतिक खात्याने काही ठोस मदत अजूनतरी केलेली नाही, पण दरम्यानच्या काळात अशा कोणत्याही मदतीची वाट न बघता काही चित्रपटगृहांनी यातून मार्ग काढण्यासाठी अजब पण बेकायदेशीर शक्कल लढवली आहे. (Russia-Ukraine war & Entertainment industry)
रशियातील काही प्रांतात हॉलिवूड चित्रपट दाखवले जात आहेत, अशी माहिती गेल्या महिन्यात सोशल मीडियावरून पसरायला लागली. यात ‘द बॅटमॅन’, पिक्सरचा ॲनिमेशनपट ‘टर्निंग रेड’ हे चित्रपट तर होतेच, पण थेट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेले ‘डोन्ट लूक अप’ आणि ‘रेड नोटीस’ सारखे चित्रपटही मोठ्या पडद्यावर दाखवले जाऊ लागले. हळूहळू रशियातील मुख्य शहरांमध्ये या चित्रपटांचे शोज वाढायला लागले. २१ एप्रिल रोजी मॉस्को मधील एका आर्ट सेंटरमध्ये ‘द बॅटमॅन’चं खास स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं. त्यासाठी ५०० रुबल्स (६०० रुपये) एवढं तिकीटही ठेवण्यात आलं होतं.
यातला बेकायदेशीर भाग म्हणजे ‘टोरंट’सारख्या साईटवरून चक्क डाउनलोड करून हे चित्रपट दाखवले जाऊ लागले. संबंधित चित्रपटाची रशियन भाषेत डब केलेली प्रिंटही ‘टोरंट’वर उपलब्ध होत होती. थेट मल्टिप्लेक्समध्ये खुलेआम पायरसी सुरु असतानाही ‘ग्रीनिच सिनेमा’ मल्टिप्लेक्स मालकांनी यावर थातुर-मातुर उत्तरं दिली. (Russia-Ukraine war & Entertainment industry)
“आम्ही एका खाजगी संस्थेला केवळ स्क्रीन्स भाड्याने दिली आहेत आणि त्या स्क्रीन्सवर ते कोणते चित्रपट दाखवतात याच्याशी आमचा संबंध नाही”, असा पवित्रा घेतला. जे हॉलिवूड चित्रपट दाखवले जातायत त्याची तिकीटविक्री सुद्धा त्या खाजगी कंपन्या त्यांच्या पोर्टलवरून करत आहेत असाही दावा ‘ग्रीनिच’ने केलाय.
रशियामध्ये ‘पायरसी’ हा गुन्हा आहे आणि मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट प्रदर्शित करत असताना सेन्सॉर प्रमाणपत्रासारखी कागदपत्रं चित्रपटगृहाकडे जमा करावी लागतात, पण या सर्व नियमांचं रशियात उघडउघड उल्लंघन सुरु आहे. जर हे प्रकरण कोर्टात गेलं तरच कळू शकेल की, या सगळ्या प्रकारांना कोण जबाबदार आहे ते… सध्या तरी ‘सिनेमा नॉन-स्टॉप’ आणि ‘वर्ल्ड मूव्हीज ऑन द बिग स्क्रीन’ या ग्रुप्सकडून हॉलिवूड चित्रपट कुठे कुठे दाखवले जात आहेत, त्याची सोशल मीडियावर जोरदार प्रसिद्धी सुरु आहे. (Russia-Ukraine war & Entertainment industry)
एकीकडे काही चित्रपटगृहांमध्ये उघड पायरसी सुरु आहे आणि दुसरीकडे चित्रपटगृह मालकांच्या संघटनेने या पायरसीचा निषेध केलेला आहे. समस्त रशियन फिल्म इंडस्ट्रीने या प्रकारांचा जोरदार विरोध करायला हवा, असं आवाहनही त्यांनी केलंय.
हॉलिवूडच्या सिनेमाबंदीनंतर काही श्रीमंत कट्टर चित्रपट चाहत्यांनी इतर देशांमध्ये जाऊन ब्लॉकबस्टर्सची भूक भागवली, पण सगळ्याच प्रेक्षकांना हा पर्याय शक्य नव्हता. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या शोज ना सर्वसामान्य प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळतोय. सोशल मीडियावरसुद्धा प्रेक्षक पायरसीला भरभरून पाठिंबा देत आहेत. हॉलिवूडने जर बंदी वगैरे न घालता त्यांचे चित्रपट प्रदर्शित केले असते, तर ही पायरसीची वेळ का आली असती, असा उलटा सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय. (Russia-Ukraine war & Entertainment industry)
हॉलिवूड निर्मात्यांनी अजूनही या पायरसीविरोधात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही, पण या पायरसीमुळे युद्ध संपल्यानंतरही रशिया आणि हॉलिवूडचे संबंध काही काळ ताणलेले राहतील अशी भीती काहीजणांना वाटतेय.
=========
हे देखील वाचा – ‘एलन डिजनरेस’चा जगप्रसिद्ध टॉक शो घेणार निरोप
=========
बॉलिवूड ठरु शकेल पर्याय?
रशिया आणि भारतीय सिनेमाचं नातं पूर्वीपासून खूप घट्ट आहे. दाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमे रशियात खूप आवडीने बघितले जातात. मार्च महिन्यात हॉलिवूडने बंदी घातल्यावर प्रभासच्या ‘राधेश्याम’चे खास शो ठेवण्यात आले आणि त्यांना हाऊसफुल्ल प्रतिसादही मिळाला.
३० एप्रिल रोजी ‘द इंडियन नॅशनल कल्चरल सेंटर’तर्फे मॉस्कोमध्ये बॉलिवूड फिल्म फेस्टीव्हलचं आयोजनही केलं होतं, तिथे ‘रनवे ३४’चं खास स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं.
असं जरी असलं तरी सध्याच्या युद्धकाळात नियमित चित्रपट प्रदर्शित करण्याबाबत भारतीय निर्मात्यांमध्ये अजूनतरी काही धोरण ठरलेलं नाही. भारतीय निर्मात्यांना रशियात येऊन शूटिंग करण्यासाठी सबसिडीही मिळते, पण सध्या रशियात चित्रीत झालेल्या चित्रपटांवरही बहिष्कार टाकण्याचं धोरण जगातील अनेक देशांमध्ये असल्यामुळे सबसिडीसाठी आता रशियात जाण्याचंही निर्माते टाळतायत. एकंदरीत, हॉलिवूडने बहिष्कार घातल्यानंतर तयार झालेली पोकळी भरुन काढणं हे आंतरराष्ट्रीय धोरणांमुळे, सध्यातरी भारतीय सिनेमासाठी किंवा बॉलिवूडसाठी तितकं सोपं नाहीच!