
ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
मराठी मनोरंजनविश्वातील अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय चेहरा म्हणजे अभिनेत्री ऋतुजा बागवे. नाटक, मालिका, चित्रपट अशा मनोरंजनाच्या तिन्ही माध्यमांमध्ये काम करणाऱ्या ऋतुजाचे अनेक फॅन्स आहेत. मराठीमध्ये मोठे नावलौकिक कमावलेली ऋतुजा सध्या हिंदी टेलिव्हिजनविश्व गाजवताना दिसत आहे.ती स्टार प्लस वरील ‘माटी से बंधी डोर’ या हिंदी मालिकेत पाहायला मिळत आहे. तिच्यासोबत या मालिकेत अभिनेता अंकित गुप्ता प्रमुख भूमिकेत आहे.
सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असणारी ऋतुजा सध्या खूपच चर्चेत आहे. याचे कारणही तसेच आहे. ऋतुजाने आपल्या अभिनयकौशल्याच्या जोरावर मोठा पुरस्कार पटकावला आहे. हो नुकताच ऋतुजाला संगीत नाटक अकादमीचा ‘उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार २०२३’चा पुरस्कार मिळाला आहे. याबद्दल ऋतुजाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, ती सध्या खूपच व्हायरल झाली असून, ऋतुजावर कौतुकाचा, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ऋतुजाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार २०२३ (रंगमंच अभिनय) संगीत नाटक अकादमी..मी नाटकवेडी, तुला कोणत्या माध्यमात काम करायला जास्त आवडतं विचारल्यावर मी क्षणाचाही विलंब न घेता उत्तर देते ‘नाटक’…इतका मोठा मानाचा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा जरा मनात धस्स झालं. मनात आलं आपण फार काम केलं नाहीये, आपण या पुरस्कारच्या पात्र आहोत का? (२२) एकांकिका (२) प्रायोगिक नाटक (३) व्यावसायिक नाटक…पण जे काम केलं जीव ओतुन केलं एवढं मात्र नक्की आणि त्याची जेव्हा राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाते…तो आनंद आत्मा सुखावणारा असतो…आणि यात मोलाचा वाटा आहे ‘अनन्या’ नाटकाचा.
अनन्या नाटकाचे मी ३०० प्रयोग केले. या नाटकाने कौतुक, पुरस्कार, समाधान, प्रसिद्धी, पैसा, मायबाप रसिक प्रेक्षकांच प्रेम खूप काही दिलं… आज हा पुरस्कार मी ‘अनन्या’ ला आणि माझ्या अनन्याच्या संपूर्ण टीमला समर्पित करते…माझ्या नाटकांचे दिग्दर्शक भिमराव मुडे, प्रल्हाद कुडतरकर, प्रताप फड, सचिन गोस्वामी, अमोल भोर, सिद्धार्थ साळवी तुमचे माझ्या हृदयात विशेष स्थान आहे. मी तुमची कायम कृतज्ञ आहे.”
सर्व द्वेष करणारे, ट्रोल करणारे, ज्यांनी माझा अनादर केला आणि मला परावृत्त केलं त्यांची मी आभारी आहे. माझं कुटुंब, मित्र-मैत्रीण, शुभचिंतक, ज्यांनी मला पाठिंबा दिला आणि माझ्यावर विश्वास ठेवला, मायबाप रसिक प्रेक्षक ज्यांनी भरभरून प्रेम दिलं, यांची मी कायम ऋणी राहीन. खूप सारं प्रेम आणि आदर…संगीत नाटक अकादमी खूप खूप धन्यवाद…राम कृष्ण हरी…स्वामी समर्थ,”
ऋतुजाच्या या पोस्टवर मनोरंजनविश्वतील कलाकारांसोबतच नेटकऱ्यांनी देखील कौतुकाचा वर्षाव करत तिच्या कमेंट्स केल्या आहेत. या पोस्टसोबत ऋतुजाने काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत. यामध्ये ती पुरस्कारासह दिसत असून, तिच्यासोबत तिचे आईबाबा देखील दिसत आहे.