‘साजन’ : ऑल टाईम हिट म्युझिकल लव्ह स्टोरी.
दिग्दर्शक लॉरेन्स डिसुझा यांनी १९९१ साली संजय दत्त, माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांना घेऊन एक ट्रँग्यूलर लव्ह स्टोरी बनवली होती चित्रपटाचे नाव होते ‘साजन’. हा चित्रपट त्या वर्षीचा सर्वाधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन करणारा चित्रपट ठरला. आज तीस-पस्तीस वर्षानंतर देखील यातील गाणी रसिकांच्या ओठावर आहेत.(reema)
या चित्रपटात संजय दत्त याने एका दिव्यांग व्यक्तीची भूमिका केली होती. खरंतर तो त्या काळात ॲक्शन सिनेमाचा आवडता हिरो होता. असे असतानाही त्याने रुपेरी पडल्यावर अपंग व्यक्ती सादर करण्याची रिस्क घेतली होती. हा चित्रपट बऱ्यापैकी १८९७ साली एडमंड रोस्तंड यांनी लिहीलेल्या Cyrano de Bergerac या फ्रेच नाटकावर आधारित होता. त्या नाटकात देखील एक अपंग व्यक्ती आपल्या मित्रासाठी त्याचे स्वत:चे प्रेम असलेल्या प्रेयसीला पत्र लिहीत असते. मागचे शतक भर हे कलाकृती जगभर लोकप्रिय राहिली आणि त्यावर अनेक भाषांमधून नाटके आणि चित्रपट आले.
या कलाकृतीचा मूळ जर्म असला तरी त्याला एक भारतीय टच रीमा राकेश नाथ यांनी दिला होता. ‘साजन’ या सिनेमाची कथा पटकथा रीमा राकेश नाथ(reema) यांची आहे. रीमा स्वतः एक दिव्यांग व्यक्ती होत्या. त्यामुळे अपंग व्यक्तीच्या व्यथा, दुःख, वेदना, यातना त्या खूप चांगल्या पद्धतीने मांडू शकल्या. रीमा यांची खरंतर ही एक दर्द भरी स्टोरी आहे.
रीमा(reema) या ख्यातनाम चरित्र अभिनेते डी के सप्रू यांची कन्या. वडील चित्रपटात असल्यामुळे सहाजिकच लहानपणापासून तिला देखील चित्रपटात काम करण्याची आवड होती. दिसायला सुंदर, संवेदनशील चेहरा त्यामुळे तिला पहिला चित्रपट मिळाला रणधीर कपूर सोबतचा ‘जवानी दिवानी’. रिमा अर्थातच खूप खूष झाली. पण दुर्दैव आडवे आले. चित्रपटाचा मुहूर्त होण्याच्या अगोदरच रीमाला एका भीषण अपघाताला सामोरे जावे लागले. या अपघाताने तिचं आयुष्य बदलून गेले. तिच्या दोन्ही पायाला जबरदस्त फ्रॅक्चर झाले तिचा कॉलर बोन कम्प्लीट डॅमेज झाला. चेहऱ्याला अकरा टाके पडले. हीरोइन बनायचं स्वप्न एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पुढचे तीन वर्ष रिमा हॉस्पिटलच्या बेडवर पडून होती. तिच्या दोन्ही पायांमध्ये रॉड टाकण्यात आले होते.
हळूहळू ती यातून बरी झाली पण आता ती काठी शिवाय चालू शकत नव्हती. तोवर तिच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व संधी निघून गेल्या होत्या. ‘जवानी दिवानी’ या चित्रपटातील तिची भूमिका नंतर जया भादुरीला देण्यात आली. रिमाला(reema) हताशपणे सर्व पाहण्यापलीकडे दुसरा काही पर्याय तिच्याकडे नव्हता. तिच्या पालकांना तिची खूप चिंता वाटत होती. एक तर मुलगी त्यात पुन्हा अपंग कसं व्हायचं? पण रिमा लहानपणापासूनच वाचनाची आवड. प्रचंड वाचन केले. त्यातूनच तिने मग लिहायला सुरुवात केली. भरपूर लिखाण करू लागली. यातूनच चित्रपटासाठी लिहायची तिला संधी मिळाली आणि तिचा चित्रपटात प्रवेश झाला!
१९९० साली आलेल्या माधुरी दीक्षितच्या ‘सैलाब’ या चित्रपटाची कथा, पटकथा रीमाची(reema) होती. माधुरीने तिला खूप सहकार्य केले. लॉरेन्स डिसुझा यांनी जेव्हा तिला ‘साजन’ या चित्रपटाची स्टोरी लाईन सांगितली तेव्हा ती आतून खूप आनंदी झाली. कारण तिला तिचं दुःख आपल्या लेखणीतून याद्वारे मांडता येणार होते. त्या पद्धतीने तिने चित्रपट अतिशय अप्रतिमपणे लिहिला. प्रेक्षकांची प्रचंड सहानुभूती संजय दत्तच्या कॅरेक्टरला मिळाली याचे बऱ्यापैकी श्रेय रिमाच्या लिखाणात होते.
‘साजन’ हा चित्रपट १९९१ चा सुपरहिट सिनेमा होता. चित्रपटाला संगीत नदीम श्रवण यांचे होते. यातील सर्वात गाजलेले गाणे ‘बहुत प्यार करते है तुमको सनम’ हे गाणं खरंतर यांनी पाकिस्तानी गायक नसरत फतेह अली खान यांच्या ‘बहुत खूबसूरत हो तुम’ या गाण्यावरून सही सही उचललं होतं. या चित्रपटात एकूण बारा गाणी होती आणि सर्व गाणी लोकप्रिय ठरली होती. ‘मेरा दिल भी कितना पागल है’ हे कुमार सानू आणि अलका याग्निक यांनी गायलेले युगलगीत तसेच ‘बहुत प्यार करते है तुमको सनम’ हे अनुराधा पौडवाल एस पी बालसुब्रमण्यम यांनी स्वतंत्र आणि युगल स्वरुपात गायलेलं गाणं, त्याच प्रमाणे ‘जिये तो जिये कैसे…’ हे एस पी बालसुब्रमण्यम, कुमार सानू, अनुराधा पौडवाल या तिघांचं गीत या चित्रपटात होतं. (reema)
=======
हे देखील वाचा : लता दीदी आणि दिलीप यांची ‘ही’ भेट ठरली शेवटची
=======
‘तू शायर है मै तेरी शायरी’ या अलका याग्निक यांचं गीत माधुरी दीक्षित वर चित्रित होतं जे प्रचंड गाजलं. त्याचप्रमाणे पंकज उधास यांनी ‘जिये तो जिये कैसे…’ हे गाणं रुपेरी पडल्यावर साकारल होतं. हेच गाणं एस पी बालसुब्रमण्यम आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातदेखील चित्रपटात स्वतंत्ररित्या गायले होते. ‘तुमसे मिलने की तमन्ना है और एक वादा है जानम…’ हे एस पी बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं गाणं तरुणाई मध्ये खूप लोकप्रिय ठरले होते.
या चित्रपटातील गाण्यांची एकूण लांबी तब्बल ६७ मिनिटांची होती! या चित्रपटाला फिल्मफेअरची एकून नऊ नामांकने मिळाली होती. त्यापैकी सर्वोत्कृष्ट संगीतकार नदीम श्रवण आणि सर्वोत्कृष्ट गायक कुमार सानू (मेरा दिल भी कितना पागल है) ही पारितोषिके मिळाली. लेखिका रीमा राकेश नाथ(reema) यांचे माधुरी दीक्षित यांच्या सोबतचे असोसिएशन पुढे अनेक दिवस कायम राहिले. ‘याराना’(१९९५) हा चित्रपट त्यांनी प्रोड्युस केला तर ‘मुहोब्बत’ (१९९९) हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. हे दोन्ही चित्रपट माधुरी दीक्षितसाठी आजही आठवले जातात. माधुरी दीक्षित यांचा पर्सनल सेक्रेटरी राकेश नाथ यांच्याशी रिमा(reema) यांचे लग्न झाले!
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी