
Sabar Bonda : असा सिनेमा बनवायला हिंमत लागते!
हा आजच्या काळातला सर्वात गरजेचा चित्रपट आहे… असं म्हटलंय जगातल्या सर्वात प्रतिष्ठीत सनडान्स फेस्टिव्हलच्या ज्युरीने आणि तेही एका मराठी चित्रपटाबाबत… ‘साबर बोंडं’… भारताचा पहिला चित्रपट ज्याला याच फेस्टिव्हलमध्ये वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी प्राईज मिळाला. थंबनेलमध्ये तुम्ही वाचलं असेलच की, असा सिनेमा बनवायला हिंमत लागते… आणि ही हिंमत केलीये रोहन कानवडे या तरुण दिग्दर्शकाने ! LGBTQ कम्युनिटीवर भारतात तसे फार कमी सिनेमे बनतात. समलैंगिकता हा विषय अजूनही समाजाने पूर्णपणे स्वीकारलेला नाही. आणि म्हणूनच ‘साबर बोंडं’ हा चित्रपट समाज आणि सिनेमा या दोघांसाठीही महत्त्वाचा ठरतो. त्यात मराठीत असा प्रयोग करण म्हणजे एक भारी गोष्ट जमून आलेली आहे… तर चला जाणून घेऊया हा जगभरात गाजणारा सिनेमा नेमका कसा आहे…

आनंद (भूषण मनोज) नावाचा एक शांत-संयमी तिशीतला मुलगा आपल्या आई-वडिलांसोबत शहरात राहत असतो. वडिलांचं आजारपणाने निधन होतं. यानंतर त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी पार्थिव शरीर गावी आणतात. अंत्यसंस्कार होतो… वडिलांच्या दहाव्यापर्यंत आई (जयश्री जगताप) आणि आनंदला गावीच थांबावं लागतं. आनंद आतून काही गोष्टींमुळे खूप तुटलेला असतो… एक म्हणजे वडिलांचं निधन आणि दुसरीकडे एक असं सत्य जे फक्त त्याच्या आई-वडिलांना माहित असतं. त्यात सतत त्याच्या लग्नाची चर्चा येत असते, जे त्याला करायचं नसतं. याच दरम्यान त्याला त्याचा बालपणीचा मित्र बाळ्या (सुरज सुमन) भेटतो आणि इथेच सुरु होते या सिनेमाची सुंदर गोष्ट !

भूषण मनोज आणि सुरज सुमन या दोन्ही लीड कलाकारांनी आपापल्या पात्रांना न्याय दिलाय. त्या पात्रांची बॉंडिंग, त्यांची मैत्री खुलवण्यात दोन्ही कलाकार यशस्वी ठरले आहेत. एक खरा आधार असलेली आईसुद्धा जयश्री जगताप यांनी उत्तमरीत्या सादर केली आहे. अगदीच पतीच्या मृत्यूचं दु:ख आणि मुलाच्या समलैंगिकतेचं ओझं याचं संतुलन जयास्श्री जगताप यांनी सांभाळलं आहे. याशिवाय इतर सहाय्यक कलाकारांनीही आपला ग्रामीण बाणा सोडला नाही. मुळात ग्रामीण भागात समलैंगिकता या विषयावर सहसा चर्चा देखील होत नाही. त्यात मुलं ऐन तारुण्यात आले की, त्यांच्यामागे लग्नाचा घोडा नाचवला जातो. पण अशा काळात जी मुलं आतून पूर्णपणे वेगळी असतात, ती कशी सर्व्हाइव्ह करतात, याचं दिग्दर्शक रोहन कानवडे यांनी वास्तववादी चित्रण केलं आहे. विशेष म्हणजे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून रोहन यांचा हा पहिलाच चित्रपट आहे.
================================
हे देखील वाचा : Deepika Padukone : दीपिका पादुकोण हिची The Internच्या हिंदी रिमेकमधून एक्झिट
=================================
टेक्निकली पहायचं झालं, तर ROMANTIC ड्रामा चित्रपटात प्रेमाची ४-५ गाणी, एखादा भयंकर दुखद सीन वगैरे हवा असणाऱ्यांसाठी हा सिनेमा नाही. ‘साबर बोंडं’ची सर्वात मोठी ताकद म्हणजे याचा स्क्रीनप्ले, एडिटिंग आणि संवाद… जी लोकं सिनेमा टेक्निकल दृष्टीकोनातूनही बघतात, त्यांना या सिनेमाचे कॅमेरा Angles आणि एडिटिंग नक्की आवडेल. मराठी चित्रपटात अशा प्रकारचं एडिटिंग फार कमी असतं. त्यात ग्रामीण भागातले बेस्ट SHOTS चित्रपटाचे National award winning एडिटर अनादी आठल्ये यांनी घेतले आहेत. चित्रपटाचं पार्श्वसंगीत सुद्धा तुमच्या मनात भरतं. एकही गाण नसलेला मराठी सिनेमा क्वचितच मराठीत येतो, पण त्यासोबतच त्याचं सुंदर background score सुद्धा सोडून जातो.

या चित्रपटाचं background score सुद्धा प्रत्येक सीनसोबत तुमची उत्कंठा वाढवत जातं. अजून एक गोष्ट म्हणजे स्क्रीनप्ले तुम्हाला प्रत्येक सीनमध्ये गुंतवून ठेवतो. सिनेमा सिम्पल असला तरीही कुठे बोर करत नाही, कारण याचे ग्रामीण भागातले संवाद थेट कनेक्ट होतात. एकंदरीत तुम्हाला हा चित्रपट गावची सफर तर घडवून आणतोच, पण यासोबतच गावतली ही नवी कोरी प्रेम कथासुद्धा दाखवतो, जी आजवर तुम्ही मराठी चित्रपटांमध्ये पाहिली नव्हती. मराठवाडा भागातल्या प्रथा-परंपरा, विचारसरणी याचंही चित्रण यामध्ये आहे. आणि यासोबतच ग्रामीण भाग आजही कशाप्रकारे काही परंपरांमध्ये अडकलेला आहे, हेसुद्धा दिग्दर्शकाने मांडलंय. यातली आणखी एक जमेची बाजू म्हणजे, चित्रपटातला एक सीन… ज्यामध्ये आई आणि मुलाचं सुंदर Conversation आहे. आई हा या सिनेमाचा आणखी एक बेस्ट पार्ट आहे, कारण सर्वसामान्य घरातल्या आईप्रमाणेच चित्रपटातल्या आईने आपल्या मुलाचा सांभाळ केलाय आणि प्रत्येक गोष्टीत त्याला साथ दिली आहे.

या चित्रपटाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे… चक्क साउथचा स्टार भल्लालदेवच्या रोलसाठी जगप्रसिद्ध असलेल्या राणा दागुबत्तीच्या स्पिरीट मीडियाने हा चित्रपट Distribute केला आहे. याशिवाय मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीमधल्या मातब्बर कलाकारांनी एकत्र येऊन हा चित्रपट तयार केला आहे ते म्हणजे नागराज मंजुळे… विक्रमादित्य मोटवानी, निखील अडवाणी, सई ताम्हणकर आणि जिम सरभ… कंटेंटच्या बाबतीत ‘साबर बोंडं’ एक माईलस्टोन मानला जातोय. मुळात मराठी सिनेमा इतक्या उंचीवर असतानाही अनेकदा त्याची दखल घेतली जात नाही, खासकरून मराठी इंडस्ट्रीतूनच हे दुर्दैव म्हणाव लागेल. मराठी इंडस्ट्रीसाठी हा चित्रपट फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रत्येक हा सिनेमा थिएटरमध्ये जाउनच पाहायला हवा.
================================
=================================
एकंदरीत साबर बोंडं ही दोन तरुणांची एक संवेदनशील गोष्ट आहे… जे समाजाला त्यांच्याबद्दल काहीच सांगू शकत नाही. फक्त एका आईचा आधार त्यांना कशाप्रकारे असतो, एक साधीशी गोष्ट आयुष्यात अनेक वळण कसे घेते, हे तुम्ही चित्रपटात पाहू शकता. मराठीत असा प्रयोग आधी ग्रेट डीरेक्टर जब्बार पटेल यांनी ४३ वर्षांपूर्वी ‘उंबरठा’ चित्रपटाच्या माध्यमातून केला होता. त्यानंतर मराठीने या महत्त्वाच्या विषयात हात घातला नाही. पण रोहन कानवडे यांनी पुन्हा एकदा LGBTQ विषयावर चित्रपट बनवल्यामुळे संपूर्ण जग त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत आहे. त्यातच अनेक फिल्म फेस्टिव्हल्समध्येही याची प्रशंसा होत आहे. समाजात आजही कित्येकांनी आपल्या सेक्शुआलीटीबद्दलच्या गोष्टी दाबून ठेवल्या आहेत. हा चित्रपट त्यांचीच व्यथा आहे. बाय द वे… ‘साबर बोंडं’ म्हणजे एक गोड फळ आहे… जे निवडुंगाच्या झाडावर उगतं. यामध्ये निवडुंग म्हणजे समाज आणि ते गोड फळ म्हणजे त्यांचं प्रेम आहे…
कलाकृती मीडिया ‘साबर बोंडं’ चित्रपटाला देत आहे… ४/५ स्टार्स
-सागर जाधव
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi