सचिन पिळगावकर… ‘एक की अनेक’ असा प्रश्न पडावा इतका तो अष्टपैलू आहे
सचिन पिळगावकरची अगदी थेट एकाच शब्दात व्याख्या करायची तर ‘एनर्जीक’ अशीच करायला हवी….
केवढा तरी मोठा आणि सतत नवीन भूमिकेतील या ‘शंभर टक्के सिनेमावाल्याचा’ प्रवास आहे हो हा.
बालकलाकार, मग नायक, उर्दूचा अभ्यासक, दिग्दर्शक, निर्माता, सहकलाकार, नृत्य दिग्दर्शक, गायक, संगीतकार, ‘एकापेक्षा एक’ चा अभ्यासू परीक्षक वगैरे वगैरे. ‘महागुरु’च म्हणूया. कदाचित एकादा उल्लेख राहिलाही असेल. या प्रत्येक भूमिकेत त्याच्याशी भेट झाली/आजही होतेय. या सगळ्यात त्याच्यात कायम राहिलेली/मुरलेली एकच गोष्ट… ती म्हणजे एनर्जी.
या माणसाच्या कणाकणात सिनेमा आहे. भले त्याने दिग्दर्शिलेले सगळेच चित्रपट खणखणीत रौप्यमहोत्सवी अथवा सुवर्णमहोत्सवी यश संपादण्यात यशस्वी ठरले नसतील, काही कारणास्तव काही चित्रपट रंगले नसतील, काही व्यावसायिक गणिते चुकली असतील, पण त्यासाठीचे त्याचे गुंतुन घेणे कधीच कमी पडले नाही…
शाळेत असताना शम्मी कपूरचे छक्के पे छक्का… हे ‘ब्रह्मचारी’ चित्रपटातील गाणे विविध भारतीवर ऐकताना ते कसे दिसत असेल याचे विलक्षण कुतूहल असे (त्या काळात गाणी अगोदर रेडिओवर ऐकायला मिळत… ते वैशिष्ट्य म्हणजे एकेक गाणे नवीन अनुभव असे). एकदा गणेशोत्सवात ‘गल्ली चित्रपटात’ चक्क हा ‘ब्रह्मचारी’ पाहताना शम्मी कपूर, मुमताज, प्राण यांच्यासह सचिनही आवडला. त्याने अनेक चित्रपटांत बालकलाकार साकारलाय.
कॉलेजमध्ये असताना संपूर्ण मुंबईत फक्त आणि फक्त मेट्रो थिएटरमध्येच ‘गीत गाता चल’ रिलीज झाला याचे कुतूहल वाटत होते. राजश्री प्रोडक्शनच्याची ती आपल्या चित्रपटाचे महत्व वाढवायची टॅक्टीस होती. तात्पर्य, मेट्रो थिएटरमध्ये स्टाॅलच्या दोन रुपये वीस पैसे तिकीटासाठी रांग लावून हा चित्रपट पाहण्याशिवाय पर्यायच नव्हता. (खिशात मोजून तेवढेच पैसे असत. पण मनात सिनेमा पाह्यचाच हे असे). या चित्रपटाचा ‘नायक’ म्हणून सचिन भावला. त्याचा स्क्रीनवरचा वावर खूप सहज आहे हे जास्त लक्षात आले. त्यानंतर ‘त्रिशूल’, ‘अवतार’, ‘सत्ते पे सत्ता’ अशा अनेक चित्रपटांत सचिन ‘आपला’ वाटू लागला.
आमची प्रत्यक्षात ‘पहिली भेट’ होईपर्यंत मी त्याला पडद्यावर पाहत पाहत त्याच्या जवळ जात होतो. भारतमाता चित्रपटगृहात अभिषेक दिग्दर्शित ‘मायबाप’ (१९८२) चित्रपट पाहताना त्याची मांडणी खूप इंटरेस्टींग वाटली. या चित्रपटात स्वतः सचिन नायक आहे आणि त्याच्यासह संजय जोग, प्रिया तेंडुलकर, श्रीकांत मोघे, अशोक सराफ, शलाका वगैरे कलाकार आहेत. त्या काळात रसरंग साप्ताहिक मराठी रसिकांना चित्रपटाबाबत भरपूर माहिती देत देत मनोरंजन करे. त्यात समजले की अभिषेक हे सचिनचे टोपण नाव. आपले खरे नाव न देताही आपल्या पहिल्या चित्रपटाच्या दिग्दर्शनात त्याने चमक दाखवावी हे कौतुकाचे वाटले. पुढच्याच ‘सव्वा शेर’ या चित्रपटासाठी मात्र त्याने आपले “दिग्दर्शक” म्हणून नाव दिले यात त्याचा वाढलेला आत्मविश्वास दिसला. विशेष म्हणजे यात स्वतः सचिन नाही. तर अशोक सराफ, रमेश देव, काजल किरण, दिलीप कुलकर्णी, सुमती गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
एक प्रेक्षक म्हणून सचिनच्या होत असलेल्या भेटीचा प्रवास प्रत्यक्ष पहिल्या भेटीपर्यंत येईपर्यंत माझ्या बाजूने जरी अंतर कमी झाले असले तरी ते प्रत्यक्षात होत नसते. आणि तसे समजूही नये…
ती भेट चांदिवली स्टुडिओत त्याच्याच दिग्दर्शनातील ‘नवरी मिळे नवराला’ (१९८४) च्या सेटवर झाली. निर्माते सतिश कुलकर्णी यांनी आम्हा काही सिनेपत्रकाराना शूटिंगचा ऑखो देखा हाल पाह्यला बोलावले असता अशोक सराफ आणि नीलिमा यांच्यावर ‘निशाणा तुला दिसला ना’ या गाण्याचे शूटिंग सुरु होते. सचिन गाण्याच्या एकेका ओळीनुसार ज्या पध्दतीने रस घेत होता, ते पाहताना लक्षात आले की, गाण्याच्या शूटिंगच्या वेळी नृत्य दिग्दर्शकासह (येथे मनोहर नायडू होते) मुख्य दिग्दर्शकही तितकाच आग्रही असावा. सचिनच्या अनेक चित्रपटातील गाणी आजही तेवढीच लोकप्रिय का आहेत याचे उत्तर त्या पहिल्या भेटीतच मिळाले. अगदी कॅमेरा मूव्हमेंटपासून त्याला या माध्यमाची खूपच अगोदरपासूनच जाण. (ही नीलिमा अभिनेत्री नंतर अनेक मराठी/हिंदी मालिकेत होती. पण तिचा पहिला हिंदी चित्रपट ‘पेंटर बाबू’. मीनाक्षी शेषाद्रीचाही तो पहिला चित्रपट).
ऐन शूटिंगमध्ये सचिन संवाद साधत नाही आणि आपणही त्याला डिस्टर्ब करु नये हे त्या दिवशी शिकलो. तसं ते कायमच लक्षात राहिले. आणि त्यानंतरच्या गप्पात लक्षात आले की तो बोलत असताना त्याच्या डोळ्यासमोर आपला अख्खा सिनेमा दिसतोय. अगदी उर्वरित राहिलेले शूटिंगही त्याच्या डोक्यात पक्के होते….
सचिन पिळगावकर ‘एक की अनेक’ असा प्रश्न पडावा इतका तो अष्टपैलू आहे. ‘गंमत जम्मत’, ‘आत्मविश्वास’ वगैरे मराठी आणि ‘प्रेम दीवाने’ वगैरे हिंदी चित्रपटाच्या सेटवर अथवा पार्टीत वगैरे अनेकदा त्याच्या भेटीच्या योगात एक गोष्ट कायमच राहिलीय ती म्हणजे सिनेमाच्या सगळ्या तंत्राची बारीकसारीक माहिती असलेले हे एनर्जीक व्यक्तीमत्व आहे.
सिनेमा हा विषयच अस्सल रसिकाला तारुण्यात ठेवणारा आहे….. आणि सचिनमधील प्रेक्षकही आजही उत्साही आहे, बरं का?
दिलीप ठाकूर