Sairat : आर्ची-परशा पुन्हा येणार भेटीला; रि-रिलीज ट्रेण्डमध्ये सैराटची वर्णी

Sairat : आर्ची-परशा पुन्हा येणार भेटीला; रि-रिलीज ट्रेण्डमध्ये सैराटची वर्णी
सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत जुने चित्रपट रि-रिलीज करण्याचा ट्रेण्ड सुरु आहे. ‘तुंबाड’, ‘कहो ना प्यार है’, ‘रहना है तेरे दिल में’, ‘सनम तेरी कसम‘ असे अनेक जुने गाजलेले चित्रपट प्रेक्षकांच्या आग्रहामुळे रि-रिलीज करण्यात आले आणि विशेष म्हणजे या चित्रपटांनी आधीपेक्षा आता जास्त प्रतिसाद मिळवत बॉक्स ऑफिस कलेक्शनही केलं. याच रि-रिलीजच्या ट्रेण्डमध्ये आता मराठी चित्रपटसृष्टीही पहिलं पाऊल टाकत आहे. मराठी चित्रपटांच्या इतिहासात १०० कोटी कमावणारा पहिला चित्रपट असा मान मिळवणारा अर्थात ‘सैराट’रि-रिलीज होणार आहे. पण,या रि-रिलीज ट्रेण्डचा मराठी चित्रपटांना कसा फायदा होऊ शकतो? जाणून घेण्याचा प्रयत्न करुयात…
२०१६ साली आलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता हिच हवा प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. येत्या २१ मार्च २०२५ रोजी ‘सैराट’ रि-रिलीज होणार असून पुन्हा एकदा आर्ची आणि परशाला मोठ्या स्क्रिनवर पाहता येणार आहे. या चित्रपटामुळे एका रात्रीत रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांना स्टारडम मिळालं. मराठीत १०० कोटींची कमाई करणारा पहिला चित्रपट अशी ओळख निर्माण करणाऱ्या ‘सैराट’नेच मराठीत पहिल्यांदाच रि-रिलीजचा ट्रेण्ड आणला आहे हे कौतुकास्पदच… (Movie Re-release trend)

मराठी चित्रपट कायमच content driven असल्यामुळे हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार, मेकर्सही मराठी दिग्दर्शक, कलाकारांचं कौतुक करतात. मराठी चित्रपटांमध्येही फारसं नवं काही पाहायला मिळत नाही अशी तक्रार कायम केली जाते.साऊथ इंडस्ट्री ज्या पद्धतीचा कंटेन्ट देत आहे त्या स्टाईलचं मनोरंजन प्रेक्षकांना आवडू लागलं आहे. आणि त्यामुळेच जुने चित्रपट परत दाखवता आले तर प्रेक्षकांना पुन्हा एकदा मराठी चित्रपटांच्या आशयांची ताकद समजेल अशी आशा करायला हरकत नाही. (Marathi films)

केदार शिंदेंचा ‘बाई पण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) हा चित्रपट एक माईलस्टोन होता, ज्याने प्रत्येक वयोगटातील बाईला थिएटरमध्ये आणलं. त्यामुळे हिंदी सारखे मराठी चित्रपटही काही रि-रिलीज व्हावे अशी मागणी सध्या केली जातेय. मग यात ‘दुनियादारी’ (Duniyadari), ‘टाईमपास’, ‘बालक-पालक’, ‘मुंबई-पुणे-मुंबई १’, ‘अशी ही बनावाबनवी’, ‘माहेरची साडी’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय…’ या चित्रपटांची आवर्जून मागणी आहे. कारण, या प्रत्येक चित्रपटाने एक इतिहास रचला आहे. (Marathi movies update)
===============================
हे देखील वाचा : Re-Release 2025 : जुनं ते सोनं; Re-release trend का होतोय व्हायरल?
===============================
आता शेवटचा अगदी महत्वाचा मुद्दा म्हणजे बॉक्स ऑफिस कलेक्शन. हिंदीत originally release झालेले काही चित्रपट रि-रिलीजमध्ये दुप्पट कमाई करत आहेत. त्याचं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे ’सनम तेरी कसम’ चित्रपट. २०१६ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने ९ कोटी कमावले होते. पण रि-रिलीजमध्ये या चित्रपटाने ५० कोटी कमावून कसर भरुन काढली. त्यामुळे मराठी चित्रपटांनाही रि-रिलीजमध्ये आर्थिक फायदा होईल; जेणेकरुन भविष्यात येणाऱ्या मराठी चित्रपटांची आर्थिक अडचण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल असं म्हणायला काही हरकत नाही. मराठी चित्रपटसृष्टीनेही ‘सैराट’च्या निमित्ताने उचलेलं रि-रिलीजचं पाऊल असंच पुढे पडत राहावं. (Marathi movie box office collection)