‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
अमिताभ बच्चन पेक्षा जास्त मानधन सलीम जावेद यांनी घेतले !
हिंदी सिनेमाच्या दुनियेत कथा पटकथा आणि संवाद लिहिणाऱ्या लेखकाला पूर्वी फारशी किंमत नसायची. इथे ‘किंमत’ हा शब्द प्रतिष्ठा आणि पैसा या दोन्हीसाठी वापरला आहे ! या पेशाला खऱ्या अर्थाने सन्मान मिळवून दिला तो सलीम जावेद या जोडीने. सत्तर आणि ऐंशीच्या दशकामध्ये त्यांनी चित्रपटातील प्रमुख नायका एवढे किंवा त्याहूनही अधिक मानधन निर्मात्याकडून घेतले होते. कारण सलीम जावेद (Salim Javed) यांची कथा, पटकथा आणि संवाद असेल तर चित्रपटाला शंभर टक्के यशाची खात्री मिळत असे.
पोस्टरवर देखील सलीम जावेद (Salim Javed) यांचे नाव ठळक अक्षरांमध्ये लिहिले जायचे. लेखकाला चित्रपटाच्या दुनियेमध्ये मानाचे स्थान मिळून देण्यामध्ये या जोडीचा फार मोलाचा वाटा आहे. गंमत म्हणजे याच प्रकारचे एक विधान सलीम (सलमान खानचे वडील) यांनी लेखक अब्रार अल्वी यांच्याकडे साठच्या दशकात केलं होतं. अब्रार अल्वी गुरुदत्त यांच्या सिनेमांचे लेखक होते. सलीम यांच्या त्या विधानाला अब्रार अल्वी यांनी तेव्हा हसण्यावर नेलं होतं. पण सलीमने (जावेद च्या जोडीने) जिद्दीने आपण केलेले विधान खरे करून दाखवले. हा किस्सा मोठा इंटरेस्टिंग आहे.
सलीम खान हिंदी सिनेमाच्या दुनियेत अभिनेता बनण्यासाठी मध्य प्रदेशातून मुंबईत आले होते. सुरुवातीला काही चित्रपटातून त्यांनी अभिनयाचा प्रयत्न केला. परंतु अभिनय हे आपले क्षेत्र नाही हे त्यांनी लवकरच ओळखले आणि चित्रपट लिखाणाच्या क्षेत्राकडे वळाले. तिथे देखील खूप स्ट्रगल होता आणि पैसे देखील खूप कमी मिळत असायचे. त्यावेळी सलीमखान गुरुदत्त यांच्या चित्रपटाचे लेखक अब्रार अल्वी यांना सहाय्यक म्हणून काम करत होते.
एकदा असेच काम करत असताना सलीम अब्रार अल्वी यांना म्हणाले,” खरंतर चित्रपटाचा आत्मा म्हणजे चित्रपटाचे कथानक असते. परंतु हे कथानक लिहिणाऱ्या लेखकाला अतिशय कमी पैसे मिळतात. पण हे चित्र एक दिवस नक्की बदलेल. चित्रपटाच्या लेखकाला देखील सिनेमाच्या हिरोइतके पैसे मिळू लागतील!” त्यावर अब्रार अल्वी हसले आणि म्हणाले ,” तुला असं म्हणायचंय का की दिलीप कुमारला आता बारा लाख रुपये मिळतात तर लेखकाला देखील तेवढेच पैसे मिळायला पाहिजेत?” त्यावर सलीम म्हणाला,” हो नक्कीच!” त्यावर अब्रार अल्वी म्हणाले,” तू हे जे बोललास ते माझ्याशी बोलला हे ठीक आहे. पण बाहेर कुठे बोलू नकोस. लोक तुला वेडा समजतील!” आणि खरोखरच त्यावेळेला परिस्थिती तशीच होती. गंगा जमुना, मुगल ए आजम, मदर इंडिया या बिग बजेट सिनेमाच्या लेखकांना देखील वीस ते पंचवीस हजार पेक्षा जास्त पैसे कधी मिळत नसायचे. आणि ते देखील एक रकमी कधीच मिळत नसायचे. टप्प्याटप्प्याने पैसे मिळत. त्यामुळे अब्रार अल्वी यांनी सलीमच्या वाक्यावर जी प्रतिक्रिया दिली ती त्या काळाशी सुसंगत अशीच होती. (Salim Javed)
पण काळ कधीच सारखा राहत नाही. प्रत्येकाचा एक ना एक दिवस जमाना येतोच. सलीम आणि जावेद हे दोघे सत्तरच्या दशकात एकत्र आले आणि सर्व चित्र बदलून टाकले. ‘सीता और गीता’ या चित्रपटासाठी त्यांनी दहा हजार रुपये मानधन घेतले. ‘जंजीर’ साठी पंचवीस हजार मानधन घेतले. असं करत करत त्यांचा रेट पाच लाख झाला होता. आणि १९८० साली धर्मा प्रॉडक्शनच्या ‘दोस्ताना’ या चित्रपटासाठी त्यांनी यश जोहर यांच्याकडून तब्बल साडेबारा लाख रुपये घेतलं ! या सिनेमाचा हिरो अमिताभ बच्चन यांना बारा लाख रुपये मानधन मिळाले होते. त्याच्यापेक्षा पन्नास हजार जास्त सलीम-जावेद (Salim Javed) यांना मिळाले.
============
हे देखील वाचा : संजीव कुमारच्या ‘फिल्मी बारशा’ चा वळणदार प्रवास
============
त्यावेळी सलीम (Salim Javed) यांना खूप वर्षापूर्वीचा किस्सा आठवला. त्यांनी अब्रार अल्वी यांना फोन करून सांगितले,”अब्रार अल्वीजी, तुम्हाला पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट आठवते का? ज्या वेळेला मी तुम्हाला म्हणालो होतो की, सिनेमाच्या लेखकांना हिरो पेक्षा जास्त पैसे मिळतील.” त्यावर अब्रार अल्वी म्हणाले,” हो चांगलीच आठवते.” तेव्हा सलीम खान म्हणाले,” सर जी, आज तो दिवस आलाय. आज ‘दोस्ताना’ या सिनेमासाठी आम्हाला साडेबारा लाख रुपये मानधन मिळाले आहे; तर या चित्रपटाचा हिरो अमिताभ बच्चन याला बारा लाख रुपये मानधन मिळाले आहे!” अब्रार अल्वी आनंदी झाले आणि त्यांनी सलीम यांचे तोंड भरून कौतुक करत अभिनंदन केले. तुमच्यामुळे लेखकाला सिनेमात मानसन्मान मिळतो आहे असे देखील आवर्जून सांगितले.