ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
जावेद अख्तर यांची लव्हस्टोरी पूर्ण करण्यासाठी सलीमचा हात
हिंदी सिनेमातील काही गाजलेल्या प्रसंगांना वैयक्तिक जीवनात घडलेल्या काही घटनांची जोड असते. राजकपूर नर्गिसला ज्या वेळी पहिल्यांदा भेटायला गेला. त्यावेळी ती स्वयंपाक घरात पकोडे तळत होती आणि बेसनाने भरलेला हात घेऊनच तिने दार उघडले होते आणि राजला पाहून तिने केस मागे सारले आणि ते बेसन तिच्या केसांना लागले. ती म्हणाली,” अरे बाबा जल्दी बोलो, मेरा तेल जल रहा है….” हाच प्रसंग राज कपूर ने अनेक वर्षानंतर ‘बॉबी’ या चित्रपटात ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांच्या पहिल्या भेटीच्या वेळी घेतला होता. असाच काहीसा प्रकार जावेद अख्तर यांच्याबाबत देखील झाला. जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि हनी इराणी यांचे लग्न १९७२ साली झाले. या लग्नाच्या वेळेचा हा किस्सा आहे.
सलीम आणि जावेद (Javed Akhtar) यांनी हिंदी सिनेमाच्या दुनियेत साठच्या दशकामध्ये पाऊल ठेवले होते. सलीम नायक बनण्यासाठी हिंदी सिनेमामध्ये आले होते तर जावेद रायटर म्हणून सिनेमात आले. योगायोगाने एका चित्रपटाचे नायक सलीम होते आणि सिनेमाचे संवाद जावेद लिहीत होते. चित्रपट काही चालला नाही पण या दोघांची मैत्री झाली. पुढे सत्तरच्या दशकामध्ये या दोघांनी एकत्रित काम सुरू केले आणि मोठा इतिहास निर्माण केला. चित्रपटांमध्ये पटकथा आणि संवाद लेखकाला मानाचे स्थान मिळवून देण्यामध्ये सलीम जावेदचे फार मोठे कॉन्ट्रीब्युशन आहे. हा किस्सा हे दोघे लोकप्रिय होण्याच्या आधीचा आहे. दोघांचे स्ट्रगल चालू होते. सिप्पी फिल्म्स मध्ये दोघेजण साडेसातशे रुपये पगारावर काम करत होते. ‘सीता और गीता’ हा चित्रपट त्यावेळी फ्लोअरवर होता. या सिनेमात हनी इरानी एक छोटी भूमिका करत होती. शूटिंग झाल्यानंतर सर्वजण पत्ते खेळायला बसत. एके दिवशी पत्ते खेळताना जावेद अख्तर (Javed Akhtar) सारखा हरत होता. वैतागला होता. त्यावेळी हनी तिथे आली आणि त्याला म्हणाली ,”काळजी करू नकोस. यावेळी पत्ते मी उचलते. मला खात्री आहे, तुला नक्की चांगले पत्ते येतील आणि तू जिंकशील!” जावेद (Javed Akhtar) सकाळपासून हरत असल्यामुळे प्रचंड चिडला होता. वैतागला होता आणि हनीचे ते आश्वासक उद्गार ऐकून तो म्हणाला,” तसं झालं तर मी तुझ्याशी लग्नच करेल!” अगदी सहजपणे तो म्हणून गेला आणि हनीने पत्ते उचलले आणि तो डाव जावेदने जिंकला! तिथून पुढचे सगळे डाव जावेद जिंकत गेला. सकाळ पासून हरलेले पैसे तर वसूल झालेच शिवाय आणखी पैसे मिळाले. खुश होऊन जावेद हनीला म्हणाला,” चल लग्न करूया!” ती मस्त लाजली. तिथूनच दोघांची आंख मिचौली सुरू झाली. काही दिवसात जावेद (Javed Akhtar) आणि हनी प्रेमात पडले. नंतर जावेद सलीमला म्हणाला,” यार तू माझा सच्चा मित्र आहेस आणि हनीच्या आईला जाऊन तू माझ्याबद्दल सांग आणि आमचे लग्न जमव. ही जबाबदारी तुझी!”
त्यानंतर सलीम खान आणि हनी इराणीच्या आईला भेटायला तिच्या घरी गेला. आईला सांगितले ,”माझा एक मित्र आहे जो हनी सोबत लग्न करू इच्छितो.” त्यावर हनीची आई म्हणाली,” ते सर्व ठीक आहे. पण मुलगा करतो काय?” त्यावर सलीम म्हणाला,” अजून स्ट्रगलच करतोय.” आई ने विचारले ” त्याला पैसे किती मिळतात?” सलीम म्हणाला,” मिळतात साडेसातशे रुपये. पण त्याला पत्ते खेळायचा खूप नाद आहे.” त्यावर आई म्हणाली,” ठीक आहे. पत्ते तर आता सगळेच जण खेळतात.” त्यावर सलीम म्हणाला,” ते बरोबर आहे. पण तो पत्त्याच्या खेळात कायम हरत असतो. त्यामुळे बरेच पैसे त्याचे पत्त्यावरच जातात.” त्यावर आई म्हणाली ,” आणखी काय काय करतो तुझा मित्र?” त्यावर सलीम म्हणाला ,” आणखी काही नाही पण फक्त हरल्यानंतर तो दुःख विसरण्यासाठी दारू प्यायला जातो. अर्थात रोजच दारू पीत नाही पण रोज रोज पत्त्याच्या खेळात तरी कुठे जिंकतो?”
त्यावर आई हात जोडून म्हणाली,” तुझ्या मित्रात एखादा तरी चांगला गुण आहे का?” त्यावर सलीम म्हणाला,” तिच्यावर तो जिवापाड प्रेम करतो त्यापेक्षा आणखी काय पाहिजे?” आईला ही मात्रा लागू पडली आणि तिने होकार दिला! पुढे काही वर्षांनी ज्यावेळेला ‘शोले’ या चित्रपटात अशाच टाईपचा एक प्रसंग त्यांना लिहायचा होता, त्यावेळेला सलीमने तोच प्रसंग अमिताभच्या आणि लीला मिश्रा सीन मध्ये वापरला. सिनेमा आणि वैयक्तिक आयुष्य एकमेकात किती मिसळून गेलेलं असतं नाही कां?
======
हे देखील वाचा : युसुफ खानचा दिलीपकुमार कसा झाला?
======
जाता जाता जावेद अख्तर (Javed Akhtar) आणि हनी इराणीचे लग्न १९७२ साली झाले. लग्नानंतरची काही वर्ष खूप आनंदात गेली. झोया आणि फरहान यांचा जन्म झाला पण सत्तरच्या दशकाच्या शेवटी त्यांच्या नात्यांमध्ये कटूता यायला लागली. कारण जावेद अख्तर (Javed Akhtar) शबाना आजमी मध्ये गुंतत चालला होता. हे नातं आणखी काही काळ टिकणार नाही याची जाणीव हनीला झाली आणि तिने हॅपीली वेगळं व्हायचं ठरवलं. १९८३ साली त्यांच्यात घटस्फोट झाला आणि ९ डिसेंबर १९८४ रोजी मध्ये शबाना आणि जावेद यांचे लग्न झाले. लग्नानंतर देखील जावेदने आपल्या पहिली पत्नी आणि मुलांची काळजी घेतली आज देखील हे दोन्ही कुटुंब आनंदात आहेत.
धनंजय कुलकर्णी