‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणाचा ‘सामना’
‘सामना’ (Samna) या चित्रपटाला ४७ वर्षे उलटली तरीही त्यातील राजकीय संदर्भ आजच्या काळाशीही सुसंगत आहेत. तेव्हा घडणाऱ्या चुकीच्या गोष्टी आजही आजूबाजूला दिसतात. त्या घटनांशी आपण आजही स्वतःला जोडू शकतो. हा चित्रपट आजच्या पिढीलाही पाहावासा वाटतो, हे या चित्रपटाचे यश आहे, अशा भावना वात्रटीकाकार व चित्रपट निर्माते रामदास फुटाणे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केल्या. या चित्रपटाचे संपूर्ण श्रेय लेखक विजय तेंडुलकरांचे आहे, असे सांगताना या चित्रपटासाठी कलाकारांची निवड आधी झाली व त्यानंतर या चित्रपटाची कथा लिहिली गेली, ही आठवण फुटाणे यांनी यावेळी आवर्जुन सांगितली. या चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी तेंडुलकर तयार नव्हते. पण तयार झाल्यावर मग त्यांनी ग्रामीण भागात फिरून सहकारी चळवळींचा आणि ग्रामीण राजकारणाचा देखील अभ्यास केला.
नंदू माधव यांनी लहानपणी जत्रेत पाहिलेल्या एका चित्रपटाचे वर्णन आणि त्यानंतर निर्माण झालेल्या प्रभावाचे उल्लेख या चित्रपटामध्ये केले. निळू फुले (Nilu Phule), डॉ. श्रीराम लागू (Shreeram Lagoo) या चळवळीतील मंडळींचा हा सिनेमा असल्याने तो चळवळीचा चित्रपट असल्याचे मत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या एका कार्यक्रमात त्यांनी व्यक्त केले. जब्बार पटेल यांचा दिग्दर्शन केलेला सामना हा अर्थातच पहिला चित्रपट होता. यानंतर जब्बार पटेल (Dr. Jabbar Patel) यांनी ‘जैत रे जैत’, ‘सिंहासन’, ‘उंबरठा’, ‘एक होता विदुषक’, ‘मुक्ता’ आणि ‘डॅा. बाबासाहेब आंबेडकर’ असे वेगवेगळे विषय असलेले चित्रपट दिग्दर्शन केले.
जब्बार पटेल हे त्या काळामध्ये एक प्रयोगशील नाट्यदिग्दर्शक म्हणून गाजत होते. काशिराम कोतवालच्या एका शो दरम्यान रामदास फुटाणे यांनी पटेल यांना आमच्या चित्रपटामध्ये दिग्दर्शक म्हणून काम कराल का असे विचारले. त्यावेळी चित्रपट हे नाटकापेक्षा थोडे वेगळे असतात, असे कारण देत पटेल यांनीसुद्धा तेंडूलकर यांच्याप्रमाणेच सुरुवातीला फुटाणे यांना चित्रपटासाठी नकार दिला होता. पण नंतर पटेल यांना चित्रपटासाठी लागणारा अनुभव नसतानाही फुटाणे यांनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासामुळे शेवटी जब्बार पटेल यांनी दिग्दर्शनासाठी होकार दिला.
सामना या नावामागे पण एक किस्सा आहे. १९७३ मध्ये स्क्रिप्ट पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाचे लेखक विजय तेंडूलकर (Vijay Tendulkar) यांनी चित्रपटासाठी अगोदर ‘सावलीला तू भिऊ नकोस’ असे नाव सुचवले होते. पण रामदास फुटाणे यांना ते नाव नाटकाप्रमाणे वाटले. मग ते बदलून ‘सामना’ असे ठेवण्यात आले.
शब्दांकन – शामल भंडारे.