Tejaswini Lonari : अभिनयापाठोपाठ अभिनेत्री झाली बिझनेस वुमन!

Saraswati Rane : जब दिलको सताये गम तू छेड सखी सरगम
भारतीय शास्त्रीय संगीतातील प्रख्यात गायिका सरस्वती राणे (Saraswati Rane) यांचा जन्म महाराष्ट्रातील मिरज ४ ऑक्टोबर १९१३ रोजी झाला. त्यांचे वडील ख्यातनाम गायक आणि किराणा घराण्याचे संस्थापक उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेब आणि आई ताराबाई माने होत्या. सरस्वती बाई यांनी संगीताचे प्राथमिक धडे त्यांचे मोठे बंधू सुरेश बाबु माने आणि थोरली भगिनी हिराबाई बडोदेकर यांच्याकडून घेतले.

सरस्वती बाईंचे (Saraswati Rane) सुरुवातीचे नाव सकिना होते पण त्यांच्या आईने खांसाहेबांपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्यांचे नाव सरस्वती ठेवण्यात आले. लहानपणी त्यांना अल्लादिया खाँ जयपूर उस्ताद नत्थनखाँ, प्रा. बी आर देवधर आणि ग्वालियर घराण्याचे पंडित मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्याकडून संगीताचे शिक्षण मिळाले. त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिल्यांदा रंगमंचावरून गायन /अभिनय केला . संगीत सौभद्र, संगीत संशयकल्लोळ, संगीत एकच प्याला या नाटकात त्यांनी भूमिका केल्या. मराठी रंगभूमीचे वैभव बालगंधर्व, नानासाहेब फाटक, छोटा गंधर्व यांच्यासोबत अनेक नाटकांमधून त्यांच्या भूमिका गाजल्या. सुंदरराव राणे यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले.

१९३३ सालापासून सरस्वती बाईंनी (Saraswati Rane) आकाशवाणी वरून गायनाचा शुभारंभ केला. पुढील चाळीस वर्षे आकाशवाणीच्या त्या आघाडीच्या गायिका होत्या. काही मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी देखील त्यांनी पार्श्वगायन केले. प्रभातच्या ‘रामराज्य’ या चित्रपटातील ‘बिना मधुर मधुर कछू बोल’ या गाण्याच्या ध्वनी मुद्रिकानी विक्रमी यश संपादन केले. ‘जब दिल को सताये गम तू छेड सखी सरगम’ या सरगम (१९५० सं सी रामचंद्र) सालच्या चित्रपटात त्यांनी लता मंगेशकर सोबत द्वंद्व गीत गायले. तसेच श्याम बेनेगल यांच्या ‘भूमिका’ (१९७७-सं वनराज भाटीया ) या चित्रपटात गाणी गायली. सी रामचंद्र, शंकरराव व्यास, के सी डे, वसंत देसाई आणि सुधीर फडके यांच्याकडे त्यांनी गायलेली गाणी लोकप्रिय ठरली. आचार्य अत्रे यांच्या ‘पायाची दासी’ मधील त्यानी गायलेल्या ‘अंगणात फुलल्या जाई जुई‘ (सं. अण्णासाहेब माईणकर) हे गीत खूप गाजले. गदिमा आणि सुधीर फडके या जोडी कडील त्यांचे ‘घनश्याम नयनी आला’ या गीताला रसिकांनी मोठी दाद दिली.

पन्नास सालानंतर त्यांनी आपले लक्ष पूर्णपणे शास्त्रीय संगीतावर केंद्रित केले. १५ ऑगस्ट १९४७ भारताच्या स्वातंत्र्यदिनी दिल्ली येथे आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्र दिनाच्या स्थापनेच्या दिवशी शिवनेरीवर त्यांच्या गायनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. मराठी भावगीताच्या क्षेत्रात देखील सरस्वती बाईंनी आपल्या स्वरांनी रसिकांना वेड लावले. सरस्वतीबाई या अशा कलावंत आहेत ज्यांना अधिकाधिक संगीत संमेलनात निमंत्रित करण्यात आली. ज्यात मुंबई, कलकत्ता, दिल्ली, चेन्नई, बरोडा, भोपाल, ग्वालियर, तसेच पुण्यातील सवाई गंधर्व संगीत महोत्सवात देखील त्यांनी आपल्या स्वरांची जादू दाखवली. (Untold stories)
=============
हे देखील वाचा : Mohammed Rafi यांच्या दिलदारपणाचे आणि लोकप्रियतेचे किस्से
=============
सरस्वतीबाई आणि त्यांची मोठी बहीण हिराबाई बडोदेकर यांनी शास्त्रीय गायनाच्या क्षेत्रात पहिल्यांदा जुगलबंदी या प्रकाराची सुरुवात केली. त्यांच्या या जुगलबंदीला संपूर्ण विश्वातील रसिकांनी दादा दिली. सरस्वती बाई राणे (Saraswati Rane) यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. यात प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाचा बालगंधर्व पुरस्कार, बालगंधर्व सुवर्णपदक, आय टी सी संगीत रिसर्च ॲकॅडमी अवार्ड, यशवंतराव चव्हाण पुरस्कार, गुरु महात्म्य पुरस्कार, उस्ताद फैयाज अहमद खान मेमोरियल ट्रस्टचा पुरस्कार मिळाला. वयाच्या ९३ व्या वर्षी म्हणजे १० ऑक्टोबर २००६ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.