सत्येन कप्पू : व्यक्तीरेखा कोणतीही असू देत…
गुलशन राॅय निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित “दीवार” (मुंबईत प्रदर्शित २४ जानेवारी १९७५) ला ४९ वर्ष होऊन देखील तो चित्रपट “आजचा” म्हणूनही ओळखला जातो. रसिकांच्या किमान चार पिढ्यांवर विलक्षण गारुड असलेल्या या चित्रपटातील एक अतिशय भावपूर्ण आणि नाट्यमय गोष्ट म्हणजे, अगदी लहानपणीच बंडखोर विजयच्या (अमिताभ बच्चन) हातावर कोरले गेलेले, मेरा बाप चोर है…(Satyen Kappu)
एका पध्दतशीर कटकारस्थानातून विजय व रवि (शशी कपूर) या भावांच्या वडिलांना (सत्येन कप्पू) कामगारांच्या आंदोलनात गैरसमजाच्या जाळ्यात अडकवले जाते. त्यांना कामगारांकडून बेदम मारहाण होतेच आणि शिक्षा म्हणून विजयच्या हातावर या कुटुंबाची आयुष्यभर बदनामी होईल असे लिहिले जाते. यातून विजय मनातल्या मनात धुमसत राहतो. आई ( निरुपा राॅय) मग काबाडकष्ट करीत, इमारतीच्या बांधकामावर वीटा उचलण्याचे काम करत करत या आपल्या मुलांना मोठे करते.
सलिम जावेद यांच्या “दीवार” च्या अतिशय बंदिस्त पटकथा आणि धारदार संवादात ‘मेरा बाप चोर है’ या डायलॉगलाही जणू एका व्यक्तीरेखेचे वलय निर्माण झाले. (चित्रपट असा बघावा हे सांगायची गरज नाही.) आणि हा ‘बाप’ साकारला होता, सत्येन कप्पू या अष्टपैलू व मेहनती अभिनेत्याने. अशा अनेक छोट्या छोट्या भूमिकांतून सत्येन कप्पूने खूपच मोठी यशस्वी वाटचाल करीत आपली एक ओळख निर्माण केली. खरं तर त्यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकताना चरित्र भूमिकांवरच आपले सगळेच लक्ष्य केंद्रित करायचे ठरवल्याने त्यांना अनेक प्रकारच्या व्यक्तीरेखा साकारण्याची संधी मिळाली आणि अनेक प्रकारचे दिग्दर्शक व कलाकार यांच्यासोबत काम करत करत तब्बल चाळीस वर्ष ते हिंदी चित्रपटसृष्टीत वावरले.(Satyen Kappu)
सत्येन कप्पू (Satyen Kappu) यांचा जन्म ७ फेब्रुवारी १९३१ रोजीचा मुंबईतील एका ब्राह्मण कुटुंबातील. वडील बुध्दसेन शर्मा यांचा डिलाईट कुल्फी बनवण्याचा व्यवसाय होता. ते व त्यांचा भाऊ राधेश्याम यांनी आपला घरचाच व्यवसाय सांभाळावा अशीच वडिलांची इच्छा होती. सत्येन कप्पू वयात येत असतानाच आई वडीलांचे निधन झाल्याने हे दोन्ही भाऊ गुरुकुलमध्ये गेले. तेथे असतानाच सत्येन कप्पू हे दादामुनी अशोककुमार यांचे निस्सीम चाहते झाले. इंडियन पीपल्स थिएटर यात आवड म्हणून अभिनय शिक्षण घेत असतानाच आपणही अभिनय क्षेत्रात यावे असे त्यांना मनोमन वाटू लागले. संधीसाठीची त्यांची चित्रपटसृष्टीतील धडपड त्यांना फळली आणि दिग्दर्शक बिमल राॅय यांनी त्यांना छोट्या भूमिकेसाठी का होईना पण पहिली संधी दिली. चित्रपट होता, ‘काबूलीवाला’ ( १९६१). त्या काळात चित्रपटसृष्टीतील वातावरण अगदीच वेगळे होते. नवीन कलाकारांना आघाडीचे निर्माता व दिग्दर्शक भेटत होते. त्यांची अपेक्षा व क्षमता जाणून घेत होते. ‘कामाचे आश्वासन देताना’ही ते आश्वासक असे. त्यामुळेच तर त्या काळात चित्रपटसृष्टीत आलेले नवीन कलाकार हळूहळू आपला एकेक चित्रपट करत करत वाटचाल करु लागले. आणि चांगली संधी प्राप्त होताच स्वत:चे अस्तित्व अधोरेखित करण्यात यशस्वी ठरले.
सत्येन कप्पूबद्दल (Satyen Kappu) हेच तर झाले. त्यामुळेच ‘काबूलीवाला ‘ ( १९६१) ते ‘राजा भय्या ‘ ( २००३) अशा तब्बल बेचाळीस वर्षांच्या वाटचालीत त्याने अनेक प्रकारच्या भूमिका साकारल्या. त्यांचे खरे नाव सत्येन्द्र शर्मा. लहानपणापासून त्यांना कप्पू असे म्हणत, तेच चित्रपटसृष्टीसाठी आडनाव घेताना सत्येन्द्र बदलून सत्येन केले. आणि मग काही वर्षांतच त्यांनी “सत्येन कप्पू” या नावाने वाटचाल करत करत तब्बल ३९० चित्रपटांतून त्यांनी भूमिका साकारल्या.
प्रेमपत्र ( १९६२), बंदिनी ( १९६३) असे एकेक चित्रपट करत असतानाच सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीपासूनच त्यांची मागणी वाढली. कटी पतंग, खिलौना, लाल पत्थर, दो गज जमीन के नीचे, अनुराग, खोटे सिक्के, दीवार, शोले, मजबूर, नमक हलाल , खेल खेल मे, मि. नटवरलाल, नया कदम, रेड रोझ, आजका एमएलए रामअवतार…नावे वाढत वाढत गेली . या प्रवासात सत्येन कप्पूना मोठ्याच प्रमाणावर पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिका मिळत राहिल्या. ‘जंजीर ‘मधील पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका छोटी तरी लक्षात राहणारी.
किमत ( इन्स्पेक्टर देशपांडे), हसते जख्म ( इन्स्पेक्टर कुमार), बेनाम ( इन्स्पेक्टर जाधव), डाॅन ( इन्स्पेक्टर वर्मा), पत्थर से टक्कर ( इन्स्पेक्टर कुलकर्णी), कैद ( इन्स्पेक्टर कौशिक), प्रतिज्ञा ( इन्स्पेक्टर डिसोझा), खतरो के खिलाडी ( इन्स्पेक्टर नारायण) असे करता करताच कयामत चित्रपटात जणू बढती देण्यात येऊन वरिष्ठ पोलीस इन्स्पेक्टर, प्रोफेसर प्यारेलाल या चित्रपटात पोलीस कमिशनर अल्बर्ट डिसोझा, कातिल, अशांती, बाजी, शपथ, इंतकाम की आग, जादुगर, जलजला, गोपी किशन यात पोलीस कमिशनर, साया, सौतेला भाई, आंखो मे तुम हो या चित्रपटात वकील, ‘गैर ‘ या चित्रपटात न्यायाधीश अशा अनेक प्रकारच्या भूमिका साकारत साकारत खूपच मोठी वाटचाल केली.
=============
हे देखील वाचा : संगीतकार एन दत्ता यांच्या कारकिर्दीला अचानक ब्रेक लागला ?
=============
खान दोस्त चित्रपटात जेलर तसेच खेल खेल मे चित्रपटात लेक्चरर, आप्तकाल, तिरंगा या चित्रपटात डाॅक्टर, चुनौती चित्रपटात डाकू ठाकूर शमशेरसिंग, दलाल चित्रपटात मंत्री चरित्रप्रसाद, हकिकत चित्रपटात मुख्यमंत्री ए. के. चौधरी, यासह नायक अथवा नायिकेचा पिता वगैरे वगैरे अनेक प्रकारच्या भूमिका साकारत साकारत आपली ओळख वाढवली. पटकथेत अशा भूमिकांना स्थान असले तरी त्याची लांबी निश्चित नसते, जरी अशा भूमिकांचे मोठ्याच प्रमाणावर शूटिंग झाले तरी संकलन टेबलावर ती भूमिका किती राहिल हे अजिबात सांगता येत नाही, ऐनवेळी सेटवरही नायकाला जास्त महत्व देताना थोडासा दुय्यमपणा घ्यावा लागतो. अशी बेभंरवशाची कार्यपद्धती अंगिकारली की मनस्ताप होत नाही. कारकीर्द पुढे सरकत राहते. आपण भूमिका साकारलेले अनेक चित्रपट मध्येच बंदही पडतात. चित्रपट निर्मितीची संस्कृती हा पूर्णपणे वेगळाच विषय. सत्येन कप्पूंच्या निमित्ताने ही थोडक्यात त्याची ओळख.(Satyen Kappu)
अशी दीर्घकालीन वाटचाल केलेल्या सत्येन कप्पू (Satyen Kappu) यांना वयपरत्वे आजारपण सहन करावे लागले. आणि २७ ऑक्टोबर २००७ रोजी त्यांचे निधन झाले. बातमी समजताच त्यांनी साकारलेला ” दीवार “मधील आनंद वर्मा पटकन डोळ्यासमोर आला. या चित्रपटात सत्येन कप्पूंची भूमिका लांबीने फार नाही पण त्या व्यक्तीरेखेचा संपूर्ण चित्रपटभर प्रभाव पडत राहतो. मेरा बाप चोर है यातील दुर्दैवी बाप सत्येन कप्पूने साकारलाय.आज सत्येन कप्पूची एक मुलगी तृप्ती हिंदी दूरदर्शन मालिकेची संवाद लेखक आहे.