‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
शिज्स क्रीज: राजेशाही थाटला मानसाळण्याची गोष्ट
मनोरंजन विश्वामध्ये प्रत्येक शो, मालिका, सिरीज, सिनेमा आपलं नशीब घेऊन येतात असं म्हणतात. नाहीतर बघा ना, ‘अंदाज अपना अपना’सारखा सिनेमा जो आज कल्ट सिनेमा म्हणून गौरवला जातो, तो त्याच्या प्रदर्शनाच्या काळात सपशेल अपयशी ठरलेला. या क्षेत्रामध्ये अशी उदाहरणे कितीतरी देता येतात. या सिरीजची गोष्टही अशीच काहीशी आहे. युजेन लेव्ही आणि डॅन लेव्ही ही पितापुत्रांची जोडी कॅनेडामध्ये विनोदी कलाकार म्हणून प्रसिद्ध होते. एकेदिवशी या नावाच्या जोरावर डॅनने ‘कॅनेडा ब्रॉडकास्टिंग नेटवर्क’ला एका सिरीजची कल्पना सांगितली. कथेची उभारणी आणि या दोघांची लोकप्रियता या बळावर नेटवर्कने सिरीजला मान्यता दिली आणि सिरीज टीव्हीवर आलीसुद्धा. पण इथे कहाणी संपत नाही. सिरीजचे चार सिझन संपले तरी म्हणावी तशी प्रसिद्धी त्याला मिळत नव्हती. लेखकांपासून ते कलाकारांना सगळ्यांनाच प्रसिद्धीसाठी झगडावं लागत होतं. त्यात ही सिरीज नेटफ्लिक्सच्या संपर्कात आली आणि जगभराचा प्रेक्षक सिरीजला मिळाला. मग मात्र डॅनला मागे वळून पहायची गरजच भासली नाही. केवळ प्रेक्षकांच्या प्रचाराच्या जोरावर सिरीजची लोकप्रियता वाढू लागली. लोकं पहिल्या सिझनपासून सिरीज पुन्हापुन्हा पाहू लागले. भारतातही या सिरीजचे वारे घोंगवायला लागले. विशेषतः यंदा त्याचा सहावा आणि शेवटचा सिझन नेटफ्लिक्सवर आला, त्यानिमित्ताने भारतीय समाज माध्यमांमध्ये या सिरीजची चर्चा जोर धरू लागली.
असं काय आहे या सिरीजमध्ये? खरा प्रश्न आहे नवीन काय आहे? रोज कुटुंब. गडगंज श्रीमंत. ‘पैसा पाण्यासारखा वाहणे’ म्हणजे काय हे त्यांच्याकडून शिकावं. जॉनी रोज हा मोठं उद्योगपती आणि त्याची बायको मॉयरा रोज ही कधीकाळी टीव्हीविश्वातील आघाडीची नायिका होती. अॅलेक्सी आणि डेव्हिड ही त्यांची तरुण मुले. डेव्हिडला कलाविश्वामध्येरस आहे तर अॅलेक्सीला पार्टीजमध्ये. सिरीजची सुरवात होते, ती रोज कुटुंब दिवाळखोरीमध्ये निघण्याने. कधीकाळी केवळ डेव्हिडला चिडविण्यासाठी जॉनीने शिज्स क्रीज नावचं एक गाव विकत घेतलेलं असतं. लिलावामध्ये त्यावर कोणी बोली न लावल्यामुळे तेच फक्त त्यांच्या मालकीत राहिलेलं असतं. अशाप्रकारे रोज कुटुंबिय शिज्स क्रीजमध्ये येतात आणि सिरीजच्या कथानकाला सुरवात होते. तिथे त्यांच्या राहण्याची सोय एका छोट्याशा मॉटेलमध्ये होते.
हे हि वाचा : अ सुटेबल बॉय : पन्नासच्या दशकातील वरसंशोधनाचा वेगळाचं प्रवास
कथा ऐकल्यावर प्रश्न पडतो यात नवं काय? विनोदी मालिका म्हटलं तरीही नवीन असं काही नाही. या कथेचं नाविन्य आहे, त्याला हाताळण्याच्या पद्धतीमध्ये. राजाचा रंक होणे. मग जया सामान्य माणसांना, त्यांच्या जीवनशैलीला त्याने हिणवलेलं असतं, त्यांच्यातच त्याला राहण्याची पाली येणं. मग त्याचं अवघडलेपण, नंतर होणारी फजिती आणि शेवटी राजातील ‘माणूस’ जागा होणे. हे कथानक या आधीही कित्येकदा पहाण्यात आलं आहे. पण इथे सिरीजकर्ते ना रोज कुटुंबीयांना बदलण्याचा घाट घालत ना गावाला बदलण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर घालतात. रोज कुटुंबीय आणि गावकरी हे नदीचे दोन किनारे समांतर रेषेतचं जाणार ही बाब लेखकांनी अधोरेखित केली आहे. पण या समांतर चालण्यामध्येसुद्धा त्यांना त्यांच्यामध्ये सहवासामुळे नैसर्गिकरीत्या काही बदल होणार हे अपेक्षित आहेच, हे मात्र सिरीज सांगते. या मांडणीमध्येचं सिरीजचं वेगळेपण सामावलेलं आहे.
अतिश्रीमंत जीवनशैलीची सवय असलेलं रोज कुटुंब या छोट्याशा गावामध्ये कायमस्वरूपी जुळवून घेतील हे शक्य नसतं. पण गावात पाऊल टाकण्यापासून गाव विकून मिळालेल्या पैशामध्ये पुन्हा न्यूयॉर्कला जाऊन नवीन आयुष्याला सुरवात करायची या विचारात असलेलं कुटुंब कालांतराने हा विचार बाजूला टाकत. ते न्यूयॉर्कला जातात, पण गावामध्ये नवीन उद्योगाची कवडसे उघडी करून. स्वतःच्या जोरावर उभारलेला उद्योग डबघाईला जाताना पाहिलेल्या जॉनीला पुन्हा नव्याने उभं राहायची उमेद गावकरी देतात. भूतकाळामध्येच अडकून पडलेल्या मॉयराला तिच्यातील अभिनयगुणांचा वेगळ्या पद्धतीने वापर करायची संधी गावातील महिलांमुळे मिळते. डेव्हिडला तर त्याचं भविष्य आणि जीवनसाथीसुद्धा गावातच भेटतो. डेव्हिडचं समलिंगी असणं, हे लेखकांनी सुंदरपणे रेखाटल आहे. ‘मला वाईन आवडते, लेबलशी मला कर्तव्य नाही,’ हे सहजतेने डेव्हिड व्यक्त करतो आणि लेखकसुद्धा गावकऱ्यांमध्ये उगाचच ओढवून आणलेला समलिंगी व्देषाचा कोन घालून कथानक खेचत नाहीत. अॅलेक्सीचा मनमौजी जगण्यापासून ते स्वतःला शोधण्याचा प्रवाससुद्धा इथेच होतो. हे सगळं घडत असतं, कारण गावकरी आणि रोज कुटुंबीय यांच्यात कुठेही वादविवाद स्पर्धा रंगत नाही. दोन्ही बाजूंना आपल्या जमेच्या आणि कमकुवत बाजू ठाऊक आहेत. त्यामुळे ते एकमेकांच्या कलाने जातात.
सिरीजचं कथानक विनोदी असलं तरी ते तुम्हाला प्रत्येकवेळी पोट धरून हसायला लावत नाही. कुठेतरी मार्मिक चिमटे आहेत, तर कुठे कोपरखळ्या आहेत. काही ठिकाणी विनोद प्रासंगिक होते तर काही ठिकाणी हसताहसता डोळ्यात पाणी आणतो. डॅन, युजेन, कॅथेरिन ओ’हारा, अॅनी मर्फी, ख्रिस्त इलोइट, एमिली हॅमशिअर, जेनिफर रोबर्टसन आणि सिरीजमधील प्रत्येक कलाकार आपली भूमिका चोख बजावतात. मॉयराचे चित्रविचित्र विग, अॅलेक्सीचा बोलण्यातील ‘हायप्रोफाईल’ लहेजा, डेव्हिडचे नखरे या विरुद्ध गावाचा अध्यक्ष रोनाल्डचा अस्ताव्यस्त वागणं, त्याची बायको जोसेलीनचा मनमोकळा स्वभाव, स्टीव्हीचा प्रामाणिकपणा पण आत्मकेंद्रीपणा असे वेगवेगळे पदर प्रत्येक व्यक्तिरेखेला दिले आहेत. त्यामुळे प्रत्येक पात्र उठून दिसतं. अगदी सहव्यक्तीरेखांनासुद्धा लेखकांनी तितकचं महत्त्व दिलं आहे. म्हणूनच सहा पर्वापर्यंत सिरीजचा टवटवीतपणा टिकून राहतो. यंदा या सिरीजने पूर्णविराम घेतला आहे. कथानक उगाचच लांब खेचण्यापेक्षा लेखकांच्या सल्ल्याने पूर्णविराम देणं उत्तम, हा विचार करत डॅन ही गोष्ट थांबवतो. पण प्रेक्षक मात्र नेटफ्लिक्सवर या सिरीजची आवर्तन करण सुरूच ठेवतात.