‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
दृश्यमचा सिक्वल… खिळवून ठेवणारा अनुभव….
२०१३ मध्ये दि ग्रेट ॲक्टर म्हणून गौरविलेले मोहनलाल आणि जीतू जोसेफ दिग्दर्शित दृश्यम हा अप्रतिम चित्रपट आला होता. एक सामान्य माणूस… सुखी कुटुंब… या कुटुंबातील मुलीला पोलीस अधिका-याचा मुलगा त्रास देतो… नकळत हा मुलगा मारला जातो… एका पोलीस अधिका-याच्या मुलाची हत्या… ती नकळत झाली असली तरी त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्धस्त होणार असते.. अशावेळी हा सामान्य माणूस पोलीस व्यवस्थेलाच आव्हान देतो. सगळे पुरावे असे काही गायब करतो की पोलीसांचा मोठा फौजफाटा येऊनही या माणसाची सहीसलामत सुटका होते… मोहनलाल (Mohanlal) यांनी या मुळ मल्याळम भाषेतील चित्रपटात जॉर्जकुट्टी या सामान्य माणसाची भूमिका साकारली आहे… दृश्यमची कथा जबरदस्त होती. आणि त्यासोबत जीतू जोसेफ यांचे दिग्दर्शनही. त्यामुळेच हिंदीसह अनेक भाषांमध्ये दृश्यम चित्रपट करण्यात आला.
चिनमध्ये सुद्धा दृश्यमच्या कथेची कॉपी झाली. बॉक्सऑफीसवर लोकप्रिय ठरलेल्या या दृश्यमचा दुसरा भाग १९ फेब्रुवारी रोजी अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. वयाची साठी पार केलेले मोहनलाल यांचा अतिशय उत्कृष्ट अभिनय आणि दिग्दर्शक जीतू जोसेफ यांची काटेकोर कथा या जोरावर हा दृश्यमचा दुसरा भाग प्रदर्शित झाल्या झाल्या हिट ठरला आहे. अनेक मान्यवर समिक्षकांनी चित्रपटाचा सिक्वेल कसा असावा याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे दृश्यम-2 (Drishyam 2) या शब्दात चित्रपटाचा गौरव केला आहे. यासोबत ग्रेट अभिनेते मोहनलाल यांच्या अभिनयाचेही कौतुक होत आहे. तब्बल सात वर्षानंतर आलेला हा दृश्यम चा सिक्वल मल्यळम भाषेत आहे. पण भाषा हा धागा बाजुला ठेऊन चित्रपट बघितला तरीही तो आपलासा वाटतो आणि एका जागी खिळवून ठेवतो. गेल्यावर्षभर भारतातील तमाम चित्रपटसृष्टीला कोव्हीडमुळे टाळे लागले होते. पण काही काळानं सर्व काळजी घेत शुटींग करण्यात आली. या काळात दृश्यम -2 चे शुट झाले. दृश्यम चित्रपटाचा पहिला भाग जिथे संपतो तिथूनच दुसरा भाग सुरु होतो. तेच घर…तेच कलाकार.. अगदी घरातील फर्निचरही तेच… त्यामुळे पहिल्याच फटक्यात दिग्दर्शक प्रेक्षकांना बांधून ठेवतो.
पोलीस अधिका-याचा मुलगा वरुण हरवल्याला आता सहा वर्ष झाली आहेत. या सहा वर्षात जॉर्जकुट्टी याच्या मुली मोठ्या झाल्या आहेत. जॉर्जच्या रहाणीतही बदल झाला आहे. शहरात त्याने चित्रपटगृह चालवायला घेतले आहे. घरची परिस्थिती सुधारली पण त्यासोबत साध्या जॉर्जचे गावातील चाहतेही बदलले आहेत.
त्याच्या प्रगतीवर आता जळफळाट अधिक होत आहे. त्यातच जॉर्जची मोठी मुलगी अंजू अजूनही पोलीसांना पाहून घाबरीघुबरी होते. या सर्वात पोलीसांना मात्र एका सामान्य माणसानं आपल्याला हरवल्याची भावना स्वस्थ बसू देत नाही. वरुणचं नेमकं जॉर्जनं केलं काय याचा तपास सुरुच आहे. यातच एक धागा पोलीसांच्या हाती लागतो. जॉर्ज आणि त्याचं कुटुंबिय कायद्याच्या कचाट्यात अडकणार अशी शक्यता दिसू लागते. मग सुरु होतो उंदीर मांजराचा खेळ एक वेळ पोलीस जॉर्जवर पकडणार अशी परिस्थिती तर दुस-या क्षणी जॉर्जची सरशी… दिग्दर्शक जीतू जोसेफ यांचं सर्व यश यातच आहे.
कुठल्याही सेकंदाला हा चित्रपट बोअर करत नाही. की घरात बसून चित्रपट बघतांनाही मध्ये उठावेसे वाटत नाही. पुढे काय होणार… याची कायम उत्सुकता वाटते. मोहनलाल चित्रपाट छा गये असंच आहे. विनोद…रहस्य…भीती… या सर्वांत त्यांचे टायमिंग… संवादफेक जबरदस्त आहे. त्यासोबत मीना, अनसिबा हासन, एस्थर अनिल, आशा सरत, मुरली गोपी, केबी गणेश कुमार या कलाकारांनीही उत्कृष्ठ साथ दिली आहे. आता ओटीटी माध्यमावर हा चित्रपट उपलब्ध असला तरी चार महिन्यानंतर दृश्यम-2 मोठ्या पडद्यावर प्रदर्शित करण्यात येणार आहे. मात्र त्याआधी घरात बसून आवर्जून बघण्यासारखाच दृश्यम-2 आहे.