Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

Shahu Modak : या खिश्चन कलावंताने २९ वेळा श्रीकृष्णाची भूमिका साकारली!
एखादी भूमिका एखाद्या अभिनेत्याने कितीदा करावी? अभिनेते शाहू मोडक (Shahu Modak) यांनी तब्बल २९ चित्रपटांमधून कृष्ण साकारला. प्रभातच्या संत ज्ञानेश्वर (१९४०) या चित्रपटात त्यांनी रंगविलेला ज्ञानेश्वर आजही रसिकांच्या लक्षात आहे. पूर्वीच्या काळाच्या अनेक धार्मिक सिनेमातून शाहू मोडक विविध देव देवतांच्या भूमिकेत दिसत. देवतांच्या भूमिका ही त्यांची खासियत बनली होती. शाहू मोडक यांचा जन्म २५ एप्रिल १९१८ रोजी अहमदनगर येथे एका मराठी खिश्चन कुटुंबात झाला. त्या काळात इतर धर्मियांनी हिंदू देवतांची भूमिका केल्यावर सनातनी समाज नाराज होत असे त्यामुळे हे कलाकार आपले नाव बदलत असत. शाहू मोडक यांच्या बाबत मात्र तसे झाले नाही. कारण मोडक हे नाव कुठल्याही अँगलने ख्रिश्चन वाटत नव्हतं.

सरस्वती सिनेटोन निर्मित आणि भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘श्यामसुंदर‘ या १९३२ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात शाहू मोडक पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर चमकले. १३ व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा श्रीकृष्ण साकारला आणि वयाच्या पन्नाशीत ही त्यांनी श्रीकृष्ण साकारला! संपूर्ण कलायुष्यात त्यांनी तब्बल २९ वेळा कृष्ण साकारला. देखणं रूप, प्रसन्न चेहरा आणि अप्रतिम अभिनय याने शाहू मोडक (Shahu Modak) अल्पावधीत प्रेक्षकांचे लाडके बनले. देव देवतांच्या भूमिका आल्या की निर्मात्यांना हमखास त्यांची आठवण व्हायची. त्यामुळे संत तुलसीदास, नरसी भगत, संत ज्ञानेश्वर अशा असंख्य भूमिका त्यांनी पडद्यावर साकारल्या. त्यांना बहुतांश भूमिका या धार्मिक, पौराणिक सिनेमात मिळत गेल्या. अर्थात काही सामाजिक सिनेमात देखील ते चमकले. ओ पी रल्हन (O. P. Ralhan) यांच्या ‘तलाश’ (१९७०) चित्रपटात त्यांच्यावर ‘तेरे नैना तलाश करे जिसे…’ हे क्लासिकल गाणे चित्रित केले होते.

१९३९ साली प्रभातच्या ’माणूस’ या सिनेमात ते मुख्य भूमिकेत होते. त्या वेळचा एक किस्सा आहे. दिग्दर्शक होते शांताराम बापू. सिनेमातील प्रत्येक व्यक्तीरेखा ही तशीच वाटायला हवी यावर त्यांचा विशेष भर असायचा. यात शाहू मोडकांना (Shahu Modak) मुख्य नायकाची गणपत हवालदाराची भूमिका मिळाली होती. वसंत देसाई, वसंत ठेंगडी व शंकरराव कुलकर्णी यांची देखील या भूमिकेकरीता स्क्रीन टेस्ट झाली होते. बापूंनी मोडकांची निवड केली खरी पण त्यांची देहयष्टी व देहबोली काही पोलीस हवालदाराची नव्हती.
या सिनेमात इतरही पोलीस होते. या सर्वांसाठी बापूंनी एक सैन्यातील निवृत्त अधिकार्याची नियुक्ती केली. या अधिकार्याकडून कसून व्यायाम सुरू झाला. पहाटे लवकर उठून लष्करी शिस्तीत कसून व्यायाम सुरू झाला. दंड बैठका, सूर्यनमस्कार, धावणे या घाम गाळेस्तोवर व्यायाम झाल्यावर शाहू मोडक (Shahu Modak) यांच्या खुराकासाठी बापूंनी जातीने लक्ष घातले. पोलीस हा पोलीसच वाटला पाहिजे यावर त्यांचा भर होता. दोन महिन्यात मोडकांची तब्येत मजबूत झाली. एक दिवस त्यांना पोलीसाचा पेहराव घालायला दिला. तो आणखी मर्दानी दिसावा म्हणून साहेब मामा फत्तेलाल यांनी त्याच्या चेहर्यावर जखमेची खूण रेखाटली! शाहू मोडकांनी जबरदस्त भूमिका निभावली.
सिनेमाचं शूटींग संपल तरी सकाळचा व्यायाम, परेड, दंड बैठका चालूच होत्या. बापूंना कुणी तरी विचारले ‘अहो आता सिनेमाचं शूटींग पूर्ण झालयं मग आता हा व्यायाम, परेड कशाला ?’ यावर बापू म्हणाले ’ प्रशिक्षकाची नियुक्ती सहा महिन्यासाठी केली आहे अद्याप तो कालावधी संपायला काही दिवस बाकी आहेत त्यामुळे सिनेमाचं शूटींग पूर्ण झालं म्हणून काय झालं? व्यायाम चालूच राहीलं!’ (Untold stories)

Shahu Modak हे जन्माने ख्रिश्चन जरी असले तरी ते उत्तम किर्तनकार होते. त्यांचे वडील अतिशय रसाळ किर्तन करीत. त्यांचा भविष्य सांगण्याचा देखील अभ्यास होता. एकदा अहमदनगरला ते गेले असताना एक मुलगी त्यांना भेटायला गेली. ही मुलगी जैन धर्मीय होती. साध्वी होण्याची दिक्षा घेण्यासाठी नगरला आली होती. त्यांच्या आश्रमात शाहू मोडक यांचे प्रवचन त्यांना ठेवायचे होते.
============
हे देखील वाचा : Kishore Kumar : किशोर कुमार ‘हे’ गाणं गातांना का नर्व्हस होते !
============
मोडक (Shahu Modak) हस्तरेषा बघून भविष्य सांगतात याची तिला जाणीव होती. तिने मोठ्या उत्साहाने आपला हात त्यांच्या पुढे केला. मोडकांनी तीन फूटावरूनच तिचा हात बघत सांगितले ‘तू लवकरच हा आश्रम सोडणार आहेस’ या उत्तराने ती उडालीच. ती साध्वी बनण्यासाठी इथे आली होती. पण ’होनी को कौन टाल सकता हैं?’ पुढे घटनाच अशा क्रमाने घडत गेल्या की मोडकांची भविष्यवाणी खरी ठरली आणि ती मुलगी काही दिवसांनी प्रतिभा शाहू मोडक बनली! ११ मे १९९३ रोजी त्यांचे निधन झाले. एक गुणी कलावंत म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवला. पुण्यात त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने त्यांच्या नावाचा पुरस्कार दिला जातो.
शाहू मोडक (Shahu Modak) यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील हा एक किस्सा!