Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    indian cinema

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    bollywood big star amitabh bachchan

    नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून का डच्चू दिला होता?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Sachin Pilgoankar :  ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

War 2 x Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली बाजी?

Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन

“Ramayana चित्रपट हॉलिवूडपेक्षा कमी नसणार”; सनी देओलची प्रतिक्रिया चर्चेत

Mahesh Manjrekar : डॉन बॉस्कोचा विद्यार्थी ते सिनेसृष्टीतला बेस्ट आर्टिस्ट

Supriya Pilgoankar : सबनीस ते पिळगांवकर होण्यापर्यंतचा फिल्मी प्रवास…

Sholay सिनेमात हि कव्वाली का समाविष्ट होऊ शकली नाही?

Shah Rukh Khan : लेक सुहाना खानसोबतचा ‘किंग’ चित्रपट पुढे

Independence Day : वीकेंडला बॉलिवूडचे ‘हे’ ब्लॉकबस्टर देशभक्तीपर चित्रपट नक्की

Maharashtrachi Hasyajatra टीमचा गोविंदा आला रे…!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Shalimar चित्रपटगृहही पडद्याआड!

 Shalimar चित्रपटगृहही पडद्याआड!
कलाकृती विशेष

Shalimar चित्रपटगृहही पडद्याआड!

by दिलीप ठाकूर 12/08/2025

मल्टीप्लेक्स, ओटीटीचा प्रभाव जसजसा वाढत वाढत जातोय, तस तशी जुन्या काळातील एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सची वाटचाल अधिकाधिक अवघड होत चाललीय…एकेक चित्रपटगृह काळाच्या पडद्याआड जातेय अशा बातमीची आता जणू सवय झाली आहे. आता दक्षिण मध्य मुंबईतील ग्रॅन्ड रोड पूर्वेकडील शालिमार चित्रपटगृहाचीही इमारत पाडली जात आहे….तेथील चित्रपटाचे खेळ काही वर्षांपूर्वीच बंद झाले होते. इतकेच नव्हे तर ते बंद करुन त्यात लग्न सोहळे, वाढदिवस इत्यादी इव्हेन्टसचे आयोजन करण्यात येवू लागले. आता तेदेखील बंद होत गेले. आणि आता तर चित्रपटगृहाची इमारतच पाडली जात आहे… 

शालिमारचा पहिला चित्रपट ‘प्रेम पुजारी’ (१९७०). देव आनंद अतिशय उत्साहात दिग्दर्शनात उतरला तो याच चित्रपटाने. या चित्रपटाच्या प्रीमियर शोला बाळासाहेब ठाकरे यांची खास उपस्थिती होती. स्वत: देव आनंदचा उत्साह नेहमीप्रमाणेच अमर्याद. शालिमार हे पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वीच्या एकपडदा चित्रपटगृह संस्कृतीनुसारचे चित्रपटगृह. स्टॉल, अप्पर स्टॉल व बाल्कनी असा ठरलेला पॅटर्न… ते वातानुकूलित होते हे विशेष. त्यापूर्वीच्या काळातील काही चित्रपटगृह एअर कुल म्हणून आपली ओळख करुन देत. हे एअर कंडिशन होते. ऐन मार्केट परिसरात असल्यानेच या परिसरात कायमच गजबजाट. खेतवाडी, गिरगाव, ग्रॅन्ड रोड, ताडदेव, मुंबई सेन्ट्रल, कामाठीपुरा परिसरातील चित्रपट रसिकांना शालिमार एक उत्तम पर्वणीच. स्टॉलचे तिकीट शोपूर्वी मिळत असे . त्यासाठी बाहेरच्या बाजूस तिकीट विंडो होता आणि स्टॉलच्या फक्त दोनच रांगा असल्याने ती तिकीटे खिडकी उघडताच संपत..हा माझा अनेकदाचा अनुभव.

तर अप्पर स्टॉल व बाल्कनीचे तिकीट आगाऊ तिकीट विक्रीला काढता येई. तिकीट खिडकीसमोरच शो कार्डस पाह्यला मिळत. तीदेखील त्या काळात चक्क पर्वणीच वाटे… मुख्य चित्रपटगृह या पठडीतील शालिमार असल्यानेच सुपर हिट पिक्चर हमखास पंचवीस आठवडे. नरेशकुमार दिग्दर्शित ‘गंवार’ (वैजयंतीमालाचा शेवटचा चित्रपट),   ‘मै सुंदर हु’ (मेहमूद पुरी तरह से छा गया), नासिर हुसेन दिग्दर्शित ‘कांरवा’, रामानंद सागर दिग्दर्शित ‘गीत’, मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘रामपूर का लक्ष्मण’ व ‘रोटी’, प्रमोद चक्रवर्ती दिग्दर्शित ‘वॉरंट’, ब्रीज दिग्दर्शित ‘चोरी मेरा काम’, दासरी रामायण राव दिग्दर्शित ‘ज्योती बने ज्वाला’, अनिल शर्मा दिग्दर्शित ‘एलान ए जंग’, के. राघवेंद्र राव दिग्दर्शित ‘फर्ज और कानून’ असे अनेक चित्रपट येथे रौप्य महोत्सवी ठरले. येथे काही चित्रपट बर्‍यापैकी यश प्राप्त करु शकले.

मनमोहन देसाई दिग्दर्शित सच्चा झूठा येथेच सुपर हिट ठरल्यावर चित्रपटगृह करारानुसार तो येथून मोती चित्रपटगृहात शिफ्ट करण्यात आला. राज खोसला दिग्दर्शित ‘कच्चे धागे’, सुरेन्द्र मोहन दिग्दर्शित ‘हत्यारा’, ब्रीज दिग्दर्शित ‘एकसे बढकर एक’,राजकुमार कोहली दिग्दर्शित ‘मुकाबला’, अझिझ मिर्झा दिग्दर्शित ‘राजू बन गया जंटलमन’, अवतार भोगल दिग्दर्शित ‘जख्मी औरत’, बी. सुभाष दिग्दर्शित ‘कसम पैदा करनेवाले की’. तसेच, ‘बनारसी बाबू’,  ‘परदे के पीछे’ वगैरे अनेक चित्रपट येथे बर्‍यापैकी यश संपादन करु शकले. तर काही चित्रपट फ्लॉपही ठरले. ‘द ग्रेट गॅम्बलर’, ‘उंचे लोग’, ‘दुनिया मेरी जेब मे’, ‘खून खून’, ‘इन्स्पेक्टर ईगल’, ‘एहसान’, ‘चोर के घर चोर’, ‘सितमगर’, ‘डबल क्रॉस’ असे अनेक चित्रपट येथेच अपयशी ठरले. शालिमारला मॅटीनी शोला नवीन चित्रपट प्रदर्शित होत हेही विशेष. त्यात विशेष उल्लेखनीय चित्रपट महेश भट्ट दिग्दर्शित पहिला चित्रपट ‘मंझिले और भी है’(१९७५) हा बहुचर्चित चित्रपट. सेन्सॉरने हा चित्रपट तब्बल पावणेदोन वर्ष कैचीत पकडला होता. तो सोडवून घेण्यासाठी महेश भट्टला जोरदार संघर्ष करावा लागला.

शालिमार परिसरात कधी कधी तिकीटाचा काळाबाजार होत असल्याचे दिसे. पण आम्ही सर्वसामान्य मध्यमवर्गीय अशा चढ्या भावाने तिकीटे विकत घेत नसत. आमच्या तत्वात ते बसत होते की नाही हा वेगळा विषय पण अशा पध्दतीने आपण तिकीट घेत आहोत हे कोणी पाहिले तर? याची भीती. अशा मानसिकतेचाही चित्रपट रसिक होता. शालिमार चित्रपटगृहात पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपट प्रदर्शित होत. मास अपिल असणारे असे. दिग्दर्शक मनमोहन देसाई यांचे ते  फेवरेट. त्यांच्या येथे प्रदर्शित झालेल्या ‘सच्चा झूठा’, ‘रामपूर का लक्ष्मण’ व ‘रोटी’ या तीन चित्रपटांनी यशाची हॅटट्रिक साध्य केली. इतकेच नव्हे तर, शालिमारच्या कार पार्किंगमध्ये रामपूर का लक्ष्मण या चित्रपटातील मारधाड दृश्य चित्रीत केली. शालिमार थिएटर मनजींच्या खेतवाडीतील प्रताप निवासमधील घरापासून जवळच. म्हणूनच त्यांना शालिमार चित्रपटगृहाबाबत विशेष आस्था असावी.

================================

हे देखील वाचा : आणीबाणी उठली आणि Dada Kondke यांनी आपल्या पिक्चरचे नाव ठेवले ‘रामराम गंगाराम’

=================================

शालिमार चित्रपटगृहांच्या इमारतीत चौथ्या मजल्यावर राजश्रीच्या वितरण विभागाचे कार्यालय होते. प्रभादेवीत निर्मितीचे कार्यालय आणि हे इकडे व्यवसाय वृध्दीचे कार्यालय. राजश्रीसह अन्य चित्रपट निर्मिती संस्थेचेही चित्रपट ते प्रदर्शित करीत. भव्य उभे डेकोरेशन हेदेखील शालिमारचे वैशिष्ट्य. जवळून पाहताना मान वर करावी लागे. पलिकडच्या फूटपाथवरुन पाह्यचे तर वरचा व एका बाजूचाच भाग दिसतोय असे होई. त्यातही गंमत असे. समोरच सुपर चित्रपटगृह. एकिकडे तिकीट मिळाले नाही तर रस्ता क्रॉस करा. तरीही हाऊसफुल्ल तर ब्लॅक मार्केटमध्ये तिकीट घ्या. पण पिक्चर पाहिल्याशिवाय घरी कसे जायचे? ” पापी ” चित्रपटासाठी कलरफुल भव्य डेकोरेशन हवे म्हणून त्याचा निर्माता, दिग्दर्शक व कलाकार ओ. पी. रल्हन स्वतःच दोन दिवस अगोदर आला. त्या काळातील फिल्मवाले आपला चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी अशी मेहनत घेत. चित्रपट इतिहासातील हीदेखील एक महत्वाची गोष्ट. जख्मी औरतच्या थिएटर डेकोरेशनवरची पोलीस इन्स्पेक्टर रुपातील डिंपल अतिशय लक्षवेधक हे आजही आठवतेय.

================================

हे देखील वाचा : Mumbai’s Single Screen Theatres : नॉव्हेल्टी… पडद्याआड, आठवणी मात्र पडद्यावरच्या

=================================

मल्टीप्लेक्स युगात अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्सना एक प्रकारची अवकळा आली. नवीन पिढीतील चित्रपट रसिकांना मोबाईल स्क्रीन, मल्टीप्लेक्स, ओटीटीचे विशेष आकर्षण वाटू लागले. त्याचा शालिमारलाही फटका बसलाच. अखेरच्या काळात येथे सवंग चित्रपट प्रदर्शित होवू लागले. आंबटशौकीन प्रेक्षकांना त्याचे आकर्षण वाटे इतकेच. अशातच शालिमारचे खेळ बंद झाले. कधीही शालिमारला जावे तर एक प्रकारची उदासी जाणवे. हळूहळू ते इतिहास मानसिक होत होत गेले. आणि आता तर ते पाडलेही. शालिमारला पिक्चर पाहण्यासाठी खेतवाडीतून ये जा करताना मध्येच जगभरातील कोणत्याही दोन देशातील कसोटी क्रिकेट सामन्याचा बदलता धावफलक हमखास दिसे ( आपल्या देशाच्या क्रिकेट सामन्याचे फलक नाकानाक्यावर लागत. ) इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातीलही स्कोर समजे. आणि प्रार्थना समाजवरुन जाणे येणे झालेच तर रेल्वे बेकरीतून खारी बिस्किट घेणे नेहमीच आवडे. चित्रपट रसिकांच्या किमान दोन तीन पिढ्यांनी चित्रपटगृहाच्या आजूबाजूचेही जग अनुभवले. शालिमार चित्रपटगृह अशा अनेक गोष्टींसह आठवणीत राहिल.

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Entertainment multiplex in mumbai shalimar theatre single screen theatres in mumbai
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.