
‘अरे भाई, गाने मे इतना दर्द का कहां से लाते हो?’ असं Shammi Kapoor कुणाला म्हणाले होते?
किशोर कुमार आणि शम्मी कपूर या दोघांचा सिनेमांमध्ये प्रवेश पन्नासच्या दशकामध्ये झाला. या दशकात किशोर कुमार गायक कमी आणि अभिनेता जास्त होता. या दोघांनी पहिल्यांदा १९५६ सालच्या ‘मेमसाहब’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात किशोर कुमारने स्वतःसाठीच पार्श्वगायन केले तर शम्मी कपूर साठी तालात मेहमूद यांनी आपला स्वर दिला. १९५७ सालच्या ‘तुमसा नही देखा’ या चित्रपटाच्या यशानंतर शम्मी कपूर आणि मोहम्मद रफी यांची जोडी जमली. ही जोडी इतकी परफेक्ट आणि घट्ट होती की काही तुरळक अपवाद वगळले तर शम्मी कपूर यांच्या जवळपास 90% गाण्यांना म. रफी यांनी प्ले बॅक दिला होता. त्यामुळे किशोर कुमार आणि शम्मी कपूर भलेही समकालीन असले तरी शम्मी कपूर साठी किशोर कुमार असा प्रसंग कधी आलाच नाही. तो आला तब्बल वीस वर्षानंतर १९८१ ‘अरमान’ या चित्रपटाच्या वेळी. पण त्यापूर्वी देखील एकदा शम्मी कपूरच्या एका चित्रपटांमध्ये किशोर कुमारने पार्श्वगायन केले होते. त्यावेळेस एक भावस्पर्शी किस्सा मध्यंतरी वाचायला मिळाला.

शक्ती सामंत यांनी साठच्या च्या दशकात १९६७ साली ‘जाने अंजाने’ या बिग बजेट सिनेमाची निर्मिती सुरू केली होती. शम्मी कपूर, लीना चंदावरकर आणि विनोद खन्ना यांच्या या चित्रपटात प्रमुख होत्या. या चित्रपटाचे शूटिंग थोडेसे लांबत असल्यामुळे त्यांनी एक लो बजेटचा (क्विकी सिनेमा) करायचे ठरवले आणि ‘आराधना’ ची निर्मिती सुरु केली. खरं तर ‘जान अंजाने’ हा चित्रपट ‘आराधना’ च्या आधी लॉन्च झाला होता. पण तो प्रदर्शित झाला ‘आराधना’च्या नंतर दोन वर्षानी १९७१ साली. ‘जाने अंजाने’ या चित्रपटातील गाणी हसरत जयपुरी यांनी लिहिली होती तर संगीत शंकर जयकिशन यांचे होते. या चित्रपटात शम्मी कपूर नायक असल्यामुळे साहजिकच गाणी रफी गाणार होते. मन्नाडे यांच्या स्वरातील ‘छम छम बाजे रे पायलिया…’ हे राग दरबारी वर आधारित गाणं होतं. रफी – लता च्या स्वरातील ‘ तेरी नीली नीली आंखो के दिल पे तीर चल गये…’ हे युगल गीत मस्त जमून आलं होतं.

शक्तीसामंत यांना या चित्रपटातील एक गाणं किशोर कुमार यांच्याकडून गाऊन घ्यायचं होतं. कारण ‘आराधना’ या चित्रपटानंतर किशोर कुमार यांची जबरदस्त चलती सुरू झाली होती. पण शक्ती सामंत यांच्या मित्रांनी सांगितले की शम्मी कपूरला किशोर कुमार यांचा आवाज सुट होणार नाही. त्यामुळे रफी कडूनच गाणी गाऊन घ्या.” यातील रफी यांनी गायलेली गाणी देखील खूप गाजली. तेरी नीली नीली आखो के दिल पे तीर चल गये चल गये… खास शम्मी स्टाईल साठी आजही आठवले जाते. पण शक्ती सामंत यांना एक गाणं मात्र किशोर कुमार यांच्याकडून जाऊन घ्यायचंच होतं. पण या गाण्याला चित्रपटात कुठे जागा नव्हती. म्हणून शेवटी त्यांनी हे गाणं चक्क सिनेमाचे सुरुवातीचे क्रेडिटस/टायटल चालू असताना टाकले. गाण्याचे बोल होते ‘जाने अंजाने लोग मिले मगर कोई ना मिला अपना…’ किशोरने अतिशय आपल्या दर्द भऱ्या भावस्पर्शी स्वरात हे गाणं गायलं होतं.

या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला शम्मी कपूर उपस्थित होते. किशोर कुमार थोडेसे सावध झाले. कारण शम्मी कपूर नायक असलेल्या सिनेमात पहिल्यांदाच गात होते. गाण्याचं रेकॉर्डिंग झालं. किशोर कुमार निघाले. तेव्हा शम्मी कपूर म्हणाले ,” अरे भाई किशोर कहा जा रहे? थोडा आपका गाना सुनते है…” है किशोर कुमार थांबले आणि त्यांनी शम्मी कपूर यांनी आता रेकॉर्ड केलेले गाणं प्ले करायला सांगितला. किशोर कुमार यांना पुन्हा थोडी धास्ती वाटली . याला आपला आवाज आवडतो की नाही? पण झाले उलटेच. शम्मी कपूरला ही गाणे इतकं आवडले की त्याने लागोपाठ तीन चार वेळेला हे गाणं ऐकलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. ते किशोर कुमार कडे गेले त्यांना आपल्या मिठी मारली आणि म्हणाले ,”अरे भाई गाने मे इतना दर्द का कहां से लाते हो? कितना मधुर गाना आपने गाया है…” किशोर कुमार यांच्या देखील डोळ्यात पाणी आले. शम्मी कपूर आणि किशोर कुमार यांनी परस्परांसाठी काम जरी केलं नसलं तरी या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होती. पण गाण्याची सिच्युएशन येत नव्हती. त्यामुळे शम्मी कपूर साठी किशोर कुमार हे कॉम्बिनेशन काही जमत नव्हतं.
====================================
हे देखील वाचा : Shammi kapoor: ‘या’ मुलींनी शम्मी कपूरचे फुटबॉल करीअर संपुष्टात आणले?
====================================
सत्तरच्या दशकात शम्मी कपूर चरित्र अभिनेत्याच्या भूमिकेमध्ये गेले. त्यावेळेला किशोर कुमार पार्श्वगायनाच्या क्षेत्रात टॉप वर होता पण या दशकात देखील शम्मी साठी प्लेबॅक करण्याची संधी त्यांना मिळाली नाही. ती मिळाली १९८१ साली ‘अरमान’ या चित्रपटात. या चित्रपटाचे संगीतकार होते बप्पी लहरी आणि गाण्याचे बोल होते ’ सारे जहां की अमानत है ये जीवन तुम्हारा तुम्हारा नही जीवन मिटाना है दीवानापन..’ हे किशोर ने शम्मी साठी गायलेलं पहिलं गाणं होते. पण शम्मी कपूर आणि किशोर कुमार या दोघांचे कॉम्बिनेशन असलेलं सर्वात गाजलेले गाणं म्हणजे ‘विधाता’ या चित्रपटातील जो सिनेमा १९८३ साली आला होता आणि गाण्याचे बोल होते ‘सात सहेली या खडी खडी फरयाद सुनाये घडी घडी…’ शम्मी कपूर खऱ्या अर्थाने संगीताचा जाणकार होता. ‘जाने अंजाने’ हे गाणं ऐकून त्याने किशोरच्या स्वरातील ताकद ओळखली होती. पुढे शम्मी कपूर १९७४ साठी ‘मनोरंजन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होता. त्यावेळी त्यातील सर्व गाणी त्याने किशोर कुमार यांच्याकडून गाऊन घेतली होती!