Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

‘अमानुष’ : उत्तमकुमार- Sharmila Tagore यांचा अप्रतिम सिनेमा!
बंगाली सिनेमातील सुपरस्टार उत्तम कुमार यांनी काही हिंदी सिनेमा देखील काम केले होते. पण दुर्दैवाने त्यांच्या हिंदी चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही. बंगाली सिनेमात अफाट यश मिळविणारा हा कलाकार हिंदीत तितकाच यशस्वी होऊ शकणार नाही. परंतु उत्तम कुमार यांचा एक हिंदी चित्रपट मात्र कल्ट क्लासिक म्हणून आज देखील आठवला जातो. कोणता होता हा चित्रपट ? या वर्षी हा सिनेमा पन्नास वर्ष पूर्ण करीत आहे.
शक्ती सामंत दिग्दर्शित ‘अमानुष’ (१९७५) या सिनेमात उत्तम कुमार, शर्मिला टागोर, उत्पल दत्त, अनिल चटर्जी, अभी भट्टाचार्य अशी तगडी कलावंतांची टीम होती/ हा चित्रपट हिंदी आणि बंगाली भाषांमध्ये एकाच वेळी बनला होता. कदाचित असा पहिल्यांदाच प्रकार घडत असावा. २१ मार्च १९७५ या दिवशी ‘अमानुष’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या सिनेमाला रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला. एक तर चित्रपटाचे कथानक खूप स्ट्रॉंग होते. कलावंतांचा अभिनय अतिशय उत्कृष्ट होता. चित्रपटाचे संगीत अतिशय मेलोडीयस आणि बंगाली संगीताचा फ्लेवर असलेले होते. संगीतकार होते श्यामल मित्रा. हा त्यांचा पहिलाच हिंदी सिनेमा होता. चित्रपटाची गाणी इंदीवर यांनी लिहिलेली होती.

या सिनेमातील किशोर कुमार यांनी गायलेलं ‘दिल ऐसा किसी ने मेरा तोडा बरबादी की तरफ ऐसा मोडा…’ हे गाणं किशोर कुमारच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक आहे. या गाण्याला या वर्षीचा सर्वोत्कृष्ट गायकाचा फिल्म फेअर पुरस्कार किशोर कुमार यांना मिळाला होता. ‘अमानुष’ या चित्रपटाचे कथानक शक्तीपदा राजगुरू या बंगाली लेखकाने लिहिले होते. ही कादंबरी जेव्हा शक्ती सामंत यांनी वाचली तेव्हा ते या कादंबरीच्या प्रेमातच पडले आणि ते थेट कादंबरीच्या लेखकाला जाऊन भेटले. शक्तिदांनी लेखकाला विचारले,” या कादंबरीतील कथानक कोणत्या गावात घडते?” त्यावर लेखकाने सांगितले,” हे गाव आज देखील तुम्ही जाऊन पहा. असेच आहे. सुंदरबन्स मधील एक टुमदार खेडे गाव आहे. जिथे फक्त मासेमारीचा व्यवसाय चालतो.” शक्ती सामंत हे ऐकून खूप प्रभावित झाले. आणि ते थेट त्या गावात (नया बसत) जाऊन पोहोचले. तिथे गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की कादंबरीतील सर्व ठिकाणं, तिथला समुद्र, तिथला निसर्ग, छोटी छोटी गावे, पोस्ट ऑफिस, पोलीस स्टेशन…. सर्व काही जशाला तसं. अगदी कादंबरीत वर्णन केल्याप्रमाणे.
================================
हे देखील वाचा : हँडसम शशी कपूरला पाहून तरुण शर्मिला टागोर त्याच्यावर लट्टू झाली होती!
=================================
त्यांनी एक निर्णय घेतला. याच ठिकाणी याच लोकेशनवर चित्रपटाचे शूटिंग करायचे. शक्ती सामंत यांनी आपल्या सर्व कृ मेंबर्सला त्या गावी बोलावून घेतले. तिथेच सेट उभारला आणि अवघ्या 25 दिवसात चित्रपटाची शूटिंग पूर्ण केले. या शूटिंगला गावातल्या गावकऱ्यांनी खूप सहकार्य केले. चित्रपटाची शूटिंग झाल्यानंतर शक्ती सामंत यांनी या चित्रपटाचा सेट त्या गावाला गिफ्ट करून टाकला. नंतर हा सिनेमा हिट झाल्यानंतर हा सेट पहायला लांब लांबून लोक येत होते. टुरिस्ट प्लेस बनले होते. या गावाचे नाव होते नया बसत . हा चित्रपट आधी बंगालीमध्ये प्रदर्शित झाला १९७४ साली दुर्गा पूजेच्या काळात प्रदर्शित झाला. बंगाली ‘अमानुष’ ला रसिकांनी प्रचंड गर्दी केली. या सिनेमाचा प्रीमियर कलकत्त्यामध्ये झाला. त्या प्रीमियरला दिग्दर्शक शक्ती सामंत उपस्थित होते. सिनेमा संपल्यानंतर रसिकांनी शक्ती सामंत यांना आपल्या खांद्यावर उचलून घेतले आणि त्यांचा जय जयकार केला. बंगाली मध्ये उत्तम कुमार यांना रसिक गुरु म्हणून ओळखत. शक्ती सामंत म्हणाले त्या दिवसापासून तिथे दोन गुरु झाले. एक उत्तम कुमार आणि दुसरे शक्ती सामंत. गुरुचे गुरु!

शक्ती सामंत जेव्हा हा सिनेमा हिंदी मध्ये करायचे ठरवले; त्यावेळेला राजेश खन्नाला ही भूमिका करायची होती. त्याने शक्तीदा यांना आवर्जून सांगितले,” मला ही भूमिका द्या.” पण त्यावेळी राजेश खन्ना प्रचंड बिझी असल्यामुळे शक्ती सामंत यांनी उत्तम कुमार यांची निवड केली. त्यांना असा अभिनेता हवा होता जो हिंदी आणि बंगाली दोन्ही भाषा कम्फर्टेबल बोलू शकेल. ‘अमानुष’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राजेश खन्नाला ही भूमिका आपल्या हातून गेलाच खूप वाईट वाटलं. या चित्रपटात उत्तम कुमार यांनी अतिशय उत्तम अभिनय करत रसिकांचे लक्ष वेधून घेतले होते. यात त्यांनी रंगवलेला मधुसूदन रॉय चौधरी फार सुंदर होता. त्याचा सहज सुंदर अभिनय आणि फेशियल एक्सप्रेशन यामुळे उत्तम कुमार आज देखील बंगालमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. यात त्याने रंगवलेला श्रीमंत जमीनदाराचा मनाने अतिशय चांगला पण व्यसनाधीन झालेला तरुण अफाट होता. सिनेमाचा सगळा फोकस त्याच्यावरच होता.
================================
हे देखील वाचा : … या घटनेनंतर शर्मिला टागोर कमालीची ‘डिसिप्लिन मॅच्युअर्ड’ बनली!
=================================
१९७७ साली शक्ती सामंत यांनी उत्तम कुमार आणि शर्मिला टागोर यांना घेऊन आणखी एक चित्रपट बनवला ‘आनंद आश्रम’ या चित्रपटाला संगीत शामल मित्र यांचेच होते. ‘सारा प्यार तुम्हारा मैंने बांध लिया है आचल में…’ हे गाणं या चित्रपटात होते. पण ‘अमानुष’ इतके यश या चित्रपटाला मिळाले नाही, उत्तम कुमार यांनी १९६६ साली पहिल्यांदा हिंदी सिनेमात काम केले होते. हा चित्रपट ‘छोटीशी मुलाकात’ यात त्यांची नायिका वैजयंतीमाला होती पण चित्रपट फ्लॉप झाल्याने ते पुन्हा हिंदीकडे फिरकलेच नाहीत. यानंतर शक्ती सामंत यांनी त्यांना १९७५ साली अमानुष आणि १९७७ साली आनंद आश्रम या चित्रपटात भूमिका केल्या. याच वर्षी गुलजार यांच्या ‘किताब’ या चित्रपटात उत्तम कुमार दिसले. यानंतर मनमोहन देसाई यांच्या ‘देश प्रेमी’ या मसाला चित्रपटात उत्तम कुमार यांनी भूमिका केली. दुर्दैवाने ही त्यांची शेवटची भूमिका ठरली. २४ जुलै १९८० या दिवशी उत्तम कुमार यांच्या हृदयविकारांनी निधन झाले.