Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

शशी कपूरचा पहिला सुपरहिट सिनेमा
साठच्या दशकात जेव्हा हिंदी सिनेमा सप्तरंगात धावून निघत होता ; त्यावेळी देश आणि परदेशातील नयनरम्य लोकेशन्स वर हिंदी सिनेमाची चित्रीकरण होत होते. भारतामध्ये काश्मीरला तेंव्हा मोठी पसंती होती. १९६५ साली दिग्दर्शक सुरज प्रकाश यांनी एक चित्रपट दिग्दर्शित केला होता ‘जब जब फूल खिले’ हा सिनेमा त्यावर्षीचा ब्लॉकबस्टर सुपरहिट सिनेमा होता. या सिनेमात शशी कपूरची (Shashi Kapoor) नायिका नंदा होती. ही जोडी या सिनेमानंतर प्रचंड लोकप्रिय झाली आणि त्यांचे अनेक चित्रपट पुढच्या पाच सहा वर्षात आले. या चित्रपटाची गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती. तर सिनेमाला संगीत कल्याणजी आनंदजी यांचे होते. गंमत म्हणजे या कल्याणजी आनंदजी यांचे सहाय्यक म्हणून संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल होते ! खरंतर एलपी यांची कारकीर्द १९६३ सालच्या ‘पारसमणी’ पासून सुरू झाली होती. पण तरीही ते अनेक संगीतकारांकडे सहाय्यक म्हणून कार्यरत होते. ‘जब जब फूल खिले’ या चित्रपटाची निर्मिती १९६४ सालापासून चालू होती.

त्यामुळे हे दोघे येथे असिस्टंट म्हणून काम करीत होते. चित्रपट रोमॅण्टिक होता, त्याला अमीर गरिबीचा फॉर्मुला होता. कश्मीरच्या नयनरम्य लोकेशनवर या सिनेमाचे शूट झाले होते. सिनेमातील गाणी कर्ण मधुर होती. त्यामुळे हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरला. शशी कपूर साठी हा सिनेमा खूप लकी होता; कारण त्यापूर्वी त्याचे चित्रपट एका पाठोपाठ एक धडाधड आपटत होते. सोलो हिरो म्हणून त्याचा हा पहिला सुपरहिट सिनेमा होता. हा चित्रपट कितपत चालेल यावर अभिनेता शशी कपूर आणि दिग्दर्शक सुरज प्रकाश यांच्यात पैज लागली होती. शशी कपूर (Shashi Kapoor) यांच्या मते हा चित्रपट फार तर सात आठ आठवडे चालेल असे सांगितले. तर दिग्दर्शक सुरज प्रकाश यांनी हा चित्रपट २५ आठवडे चालेल असे सांगितले. दोघांनी पैज लावली आणि जो ही पैज हरेल त्याने जिंकणाऱ्याला बरलिंग्टन या टॉप ब्रँड चा एक सूट प्रेझेंट द्यायचा असे सांगितले. चित्रपट प्रदर्शित झाला आणि सुपरहिट झाला. शशी कपूर ने दिग्दर्शक सुरज प्रकाश यांना आनंदाने भारी सूट प्रेझेंट दिला.
या चित्रपटाच्या गोल्डन ज्युबली सेलिब्रेशन मध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक सुरज प्रकाश यांनी चित्रपटाचे कथाकार ब्रिज कत्याल यांना एक प्रश्न विचारला,” या चित्रपटातील नायक राजा हा कोणत्या धर्माचा आहे? कारण काश्मीरमधील बहुतेक हाऊस बोट वाले मुस्लिम धर्मिय आहेत.” त्यावर लेखकाने सांगितले,” मी मुद्दामच राजा हे या पात्राचे नाव ठेवले आहे . यातून कुठल्या धर्माची ओळख होत नाही. आणि मला या सिनेमाला हिंदू मुस्लिम लव स्टोरी बनवायचे नव्हते. म्हणून मी हे मुद्दाम नाव ठेवले!” या चित्रपटाची कथा घेऊन ब्रिज कत्याल अनेक निर्मात्यांना भेटले होते. त्यात जी पी सिप्पी, एन एम सिप्पी असे मातब्बर निर्माते होते. पण सर्वांनी एक मुखाने या कथेला नकार दिला. परंतु दिग्दर्शक सुरज प्रकाश यांना हे कथानक आवडले आणि त्यांनी यावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. सुरज प्रकाश यांचा हा पहिलाच रंगीत चित्रपट होता. या चित्रपटात अभिनेत्री नंदा हिचे ज्या व्यक्तीसोबत लग्न ठरते त्या कलाकाराचे नाव जतीन खन्ना होते. खरंतर राजेश खन्नाचे नाव देखील जतीन खन्ना च होते. परंतु तो जेव्हा सिनेमात आला तेव्हा या जतीन खन्ना सोबत स्पर्धा नको म्हणून त्याने स्वतःचे नाव बदलून राजेश खन्ना ठेवले!! ( या जतीन खन्ना चे नंतर काय झाले?)
‘जब जब फूल खिले’ या चित्रपटातील गाणी आज देखील तितकीच लोकप्रिय आहेत. ‘ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे’ हे सुमन कल्याणपुर आणि मोहम्मद रफी यांचे एकमेव युगलगीत या चित्रपटात आहे. (या चित्रपटाच्या वेळी लता मंगेशकर आणि रफी परस्परांसोबत गाणे गात नव्हते) या चित्रपटात परदेसियो से ना आंखिया मिलाना, एक था गुल और एक थी बुलबुल, ये समा समा है ये प्यार का, अफ्फू खुदा हे गाणे जबरदस्त गाजली होती! गीतकार आनंद बक्षी यांचे करिअर याच चित्रपटापासून स्थिरस्थावर झालं. हाऊसबोट मधील नाविकांचे जीवन पाहण्यासाठी शशी कपूर मुद्दाम अनेक दिवस या हाऊस बोट चालकांसोबत राहिला होता. त्यांच्यासोबत जेवण केले त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला.या सिनेमाचा रिमेक राजा हिंदुस्तानी १९९५ साली आला होता ! (Shashi Kapoor)
===========
हे देखील वाचा : बॉलीवूडची पहिली डान्सिंग क्वीन
==========
‘जब जब फूल खिले’ भारतात आणि परदेशात प्रचंड लोकप्रिय ठरला. विशेषतः उत्तर आफ्रिकेमध्ये या सिनेमाला फार मोठे यश मिळाले. मोरक्को, अल्जेरिया, लिबिया या देशांमध्ये हा चित्रपट पुढे अनेक वर्ष दरवर्षी नियमित पणे प्रदर्शित होत होता आणि प्रेक्षक त्याला उत्तम प्रतिसाद देत होते. एवढेच काय भारतातील पर्यटक जेव्हा या देशांमध्ये जात आणि तिथे दुकानांमध्ये सांगत आम्ही भारतातून आणला आहोत शशी कपूरच्या देशातून आलेले आहोत तेव्हा त्या पर्यटकांना घसघशीत डिस्काउंट देखील दिला जायचा !!