प्राईम टाइम: अब तेरा क्या होगा चंद्रमुखी?
खरंतर आजचा दिवस फार कुतुहलाचा होता. कारण गेले अनेक महिने ज्या सिनेमाचं भरभरून प्रमोशन चालू आहे तो प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ चित्रपट रिलीज झाला. अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, समीर चौगुले, वंदना वाकनीस, मृण्मयी देशपांडे आदींच्या यात मुख्य भूमिका आहेत.
आजचा पेपर उघडल्यावरही ‘चंद्रमुखी’ने सुखद धक्का दिला. विमानापासून पेपरच्या पहिल्या पानापर्यंत सगळीकडे चंद्रमुखी भरून उरली आहे. मी तरी अगदी ‘चंद्रमुखी’च्या टीमला शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडिया उघडला होता… अन् तोच भलत्यावर नजर पडली. ती पोस्ट होती अभिनेता आस्ताद काळेची. त्या पोस्टमध्ये त्याने मलाही टॅग केल्यामुळे त्याचं नोटिफिकेशन मला आलं.
आस्ताद ‘शेर शिवराज’ या चित्रपटात असल्यामुळे साधारण ‘शेर शिवराज’च्या यशस्वी घोडदौडीबद्दल काही पोस्ट असावी असं वाटून पोस्ट पाहिली आणि एकदम सगळा मनातला प्रफुल्लतेचा माहौल गळून पडला. कारण, पोस्ट होती प्राईम टाइमबद्दलची. पुन्हा एकदा तीच अडचण.. तोच मुद्दा आ वासून उभा राहिला होता.. मराठी सिनेमाला मिळणाऱ्या प्राईम टाइमचा.
या पोस्टमध्ये आस्तादने ‘बुक माय शो’द्वारे ‘शेर शिवराज’ला असलेल्या खेळाच्या वेळा दिल्या होत्या. यात एकही ‘प्राईम टाइम’ नसल्याचं दिसत होतं. आता काय बोलणार?
कंटाळा कसा येत नाही या सतत उभ्या राहणाऱ्या अडचणीचा? यातून कायमचा मार्ग काढावा असं का वाटत नाही कुणालाच? जो सिनेमा यात भरडला जातो त्याचे कलाकार या अडचणीबद्दल सोशल मीडियावर बोलू लागतात. पण बाकीची इंडस्ट्री यावर काहीच का नाही बोलत?
आता सहज म्हणून विचार करून बघा… सिनेमाला थिएटर्स मिळत नाहीयेत, प्राईम टाइम दिला जात नाहीये, आता काय होणार? त्या त्या सिनेमातले कलाकार निषेध करणार. जो चालू आहे. मग? मग निर्माते जाणार थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे. म्हणजे अर्थात अमेय खोपकर यांच्याकडे. कारण मनसेने नेहमीच मराठी चित्रपटासाठी भूमिका घेतलेली आहे.
मनसेच्या आक्रमक पवित्र्यामुळे तात्पुरता का असेना त्या सिनेमाचा प्रश्न सुटलेला दिसतो तरी आहे. त्यामुळे साहजिकच पहिल्यांदा मनसेकडे धाव घेतली जाईल. शिवाय, राज्य सरकारी चांगली ओळख आणि वजन असलेल्या दोन नावांकडेही कदाचित आशेनं बघितलं जाईल. ही नावं आहे अर्थातच आदेश बांदेकर आणि सुबोध भावे. ही मंडळीही आपल्या परीने जे शक्य आहे ते करू पाहातील. पण त्यापुढे काय? हा प्रश्न तात्पुरता सोडवला जाईल. कायम स्वरुपी यावर तोडगा काढला जाताना दिसत नाही.
आता मुद्दा असाही येतो की, सिनेमा चांगला असेल, तर तो बघितला जातोच. हे जरी खरं असलं तरी चांगला सिनेमा बघता यावा यासाठी किमान तो आपल्या वेळेत हवा. सध्या असलेला उन्हाच्या झळा पाहता सर्वसाधारणपणे दुपारी फार कमी मंडळी सिनेमा बघायला म्हणून बाहेर पडतात. मराठी सिनेमा पाहण्याचा संस्कार लक्षात घेतला, तरी सर्वसाधारणपणे संध्याकाळी किंवा रात्री सिनेमा पाहायला लोक जातात. या वेळात सिनेमाचा खेळ नसणं हे त्या सिनेमाची कुचंबणा केल्यासारखं होईल यात शंका नाही.
मुद्दा प्राईम टाइमला मराठी सिनेमा असण्याचा आहे. सध्या ‘शेर शिवराज’ हा एकमेव मराठी चित्रपट चालू होता. ‘पावनखिंड’ या चित्रपटाच्या यशामुळे दिग्पाल लांजेकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बनवलेल्या चित्रपटाचा आपला असा ‘क्राऊड’ तयार झाला आहे. त्यामुळे सिनेमाला लोक येणार हे साहजिक आहे. पण ते येण्याआधी या चित्रपटाला ‘ऑड’ वेळा देऊ करणं हे फारच निंदनीय आहे.
कोणत्याही मल्टिप्लेक्समध्ये सर्वसाधारणपणे सहा स्क्रीन्स असतात. अशावेळी किमान दोन ते तीन स्क्रीन्स मराठी चित्रपटाला प्राईम टाइमवेळी मिळू नये, याला काय म्हणाव. सध्या हा प्राईम टाइम दिला जातोय कुणाला तर ‘केजीएफ २’ ला. ‘शेर शिवराज’ दुसऱ्या आठवड्यात पोचल्यानंतर त्याचे शो वाढले खरे पण त्यात प्राईम टाइम अपवाद वगळता कुठेच दिसत नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर भागात तर ‘शेर शिवराज’चं पोस्टर लपवून ठेवलं जात असल्याची घटना घडली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना शो असल्याचंच कळत नाहीय. हे फार गंभीर आहे. पहिल्या आठवड्यात चांगलं ओपनिंग मिळाल्यानंतर साहजिकच दुसऱ्या आठवड्यात शो वाढतात. ‘शेर शिवराज’चं तसंच झालं. या चित्रपटाने अल्पावधीत २०० शो मिळवले. यात आणखी वाढ होईल असं वाटत असतानाच प्राईम टाइम नसल्यामुळे या चित्रपटाच्या खेळाची संख्या पुन्हा कमी होऊ लागली आहे.
यामध्ये दुसरा आठवडा निघून जातो आहेच, पण आता लगेच पुढे ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यामुळे या चित्रपटानेही प्राईम टाइमची मागणी करणं साहजिक आहे. त्यालाही त्या वेळा मिळायला हव्यातच. चांगल्या वेळा देऊनही जर खेळाला प्रेक्षक येत नसतील, तर तिथे दुसरा चित्रपट लागणं हे समजू शकतं. शिवाय, दुसरा कुठलाच चित्रपट स्पर्धेत त्या आठवड्यासाठी नसेल, तर या चित्रपटाला काही स्क्रीन्सवर प्राईम टाइम द्यायला हरकत काय आहे?
सातत्याने प्राईम टाइमची ओरड चालू असते. पण यातून साध्य काहीच होत नाही. कारण, मराठीचं आपलं असं ‘सिंडिकेट’ नाही. व्यवसाय वृद्धीसाठी.. त्याच्या विस्तारासाठी आवश्यक शिस्त-नियम लावणारंही कुणी नाही आणि पाळणारंही. इथे एकजण गटांगळ्या खात असेल, तर दुसरा कुणीही त्याच्या मदतीला धावत नाही. ना कुणी इतरांना सावध करत.
खरंतर इंडस्ट्री म्हणून यात काम करणारा प्रत्येक जण न मिळालेल्या प्राईम टाइमने भाजून निघाला आहे. पण, पुन्हा पुन्हा हे घडत असताना कुणीच एकमेकांच्या सुरात सूर मिसळताना दिसत नाही. उलटपक्षी हिणकस वृत्तीने मनातल्या मनात मांडे खाणाऱ्यांचा टक्काच वाढताना दिसतो. खरंतर लॉकडाऊनंनतर मराठी चित्रपटाला चांगले दिवस आले आहेत. सतत एकापेक्षा एक चित्रपटांना लोकाश्रय मिळतो आहे. पण त्याला पुन्हा एकदा प्राईम टाइमचं ग्रहण लागलं आहे.
‘शेर शिवराज’च्या टीमने प्राईम टाइमबद्दल निषेध नोंदवून एव्हाना सहा तास उलटले आहेत. पण यावर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने तोंडातून ‘ब्र’ देखील काढला नाही. कुणाचंच काही अडलेलं नाही. हे असंच चालू राहणार आहे, हे आता नग्न सत्य आहे. कारण, रिलीज झालेला सिनेमा चालला जरी नाही तरी त्यामुळे फक्त आणि फक्त निर्मात्याचं बिघडतं. बाकी सगळ्यांना त्यांचं मानधन मिळालेलं असतं. दिग्दर्शक-तंत्रज्ञ-कलाकार यांची त्यातून एका अर्थाने सुटका झालेली असते.
याचीच दुसरी बाजू अशी की या लोकांनीही आपली कामगिरी करून झालेली असते. त्याचंच ते मानधन असतं. हे एकाअर्थी बरोबर असलं तरी आपण केलेलं काम जर लोकांसमोर जात नसेल, तर त्या कामगिरीला काय अर्थ? म्हणजे, हा लेख मी लिहीला आणि तो कुठेच पब्लिश झाला नाही.. म्हणजे अगदी मी माझ्या सोशल मीडियावरही टाकला नाही, तर त्या लेखाला आणि त्यात मांडलेल्या माझ्या विचारांना काय अर्थ? तसंच झालं ना हे?
=========
हे देखील वाचा – मराठी चित्रपटसृष्टी कात कधी टाकणार? ‘सिंडिकेट’ बनाना मंगता है!
=========
म्हणूनच, या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मला चंद्रमुखी या चित्रपटाची काळजी वाटतेय. या सिनेमातही मोठी स्टारकास्ट आहे. सिनेमाचं प्रमोशनही जोरदार झालेलं नाही. अशावेळी या चित्रपटाला जर प्राईम टाइमच मिळाला नाही, तर मग कसं होणार? आणि मग गब्बरचा डायलॉग मला आठवला.. तो मी जरा ट्विस्ट केला, अब तेरा क्या होगा चंद्रमुखी… ??