आदिनाथ आणि दिप्ती यांच्या ‘शेवंती’ लघुपटास उस्फुर्त प्रतिसाद
लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकजण आपल्या कुटुंबाला वेळ देतोय. आपल्या जोडीदारासोबत पुन्हा काही आनंदी क्षण जगतोय. पण कधी कधी नात्यांमध्ये अधिक जवळीक आली तरी दुरावा निर्माण होतो. वाद, तक्रार वाढू लागतात. जबाबदारी आणि कामाच्या ओघात तो तीच्या किंवा ती त्याच्या भावना समजून घेण्यात कमी पडतात का ? ती आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी करत असलेली धडपड या कशातच तो नव्हता याची त्याला जाणीव होते का? या अशा अनेक प्रश्नाची उत्तर आपल्याला तेव्हाच मिळायला लागतात जेव्हा ती व्यक्ती सोबत नसते. आणि जेव्हा नात्यांचा खरा अर्थ कळू लागतो तेव्हा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक शेवंतीच फुलून येते. ‘शेवंती’ हा लघुपट तरुणांना नात्यातील गुंता हळुवार सोडवण्याचा संदेश देतो.
‘शेवंती’ नाते संबंध जपायला आणि जगायला शिकवणारी कथा आदिनाथ आणि दिप्तीच्या अभिनयातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. पती पत्नी मध्ये असणारे प्रेम, वाद-संवाद, सहवास, आपलेपणा आणि दुरावा या सर्व अबोल भावना आदिनाथ आणि दिप्तीच्या जोडीने अतिशय सुंदर अभिनयाद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहचविल्या आहेत. यामध्ये प्रथमच आदिनाथ कोठारे आणि दीप्ती देवी ही जोडी लोकांसमोर येते आहे.
प्रसिद्ध कवी आणि लेखक चंद्रशेखर गोखले लिखित आणि निलेश अरुण कुंजीर दिग्दर्शित “शेवंती” हा लघुपट आपल्या भेटीस आला आहे. आदिनाथ कोठारेचे बोलके डोळे आणि दिप्ती देवीची निरागसता शेवंतीला अजून टवटवीत करते. शेवंतीसाठी छायाचित्रण प्रथमेश रांगोळे, संकलन जागेश्वर ढोबळे, साऊंड डिझायन प्रशांत कांबळे आणि डीआय अमित धनराज यांनी काम केले आहे.
या लघुपटाचे कथावाचन सुमधुर आवाज लाभलेले असे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार मिलिंद इंगळे यांनी केलंय. तसेच त्यांनी त्यांच्या मुलासमवेत म्हणजेच सुरेल इंगळे याच्यासोबतीने शेवंतीला पार्श्वसंगीत दिले आहे. बेस्ट शॉर्ट फिल्म, बेस्ट डिरेक्टर असे तब्बल ५ पुरस्कार विजेती वननेस फिल्म्स निर्मित शेवंती आता हंगामा प्ले, मॅक्स प्लेअर, एअरटेल एक्ट्रिम, वोडाफोन प्ले या ॲप वर पाहू शकता.
शेवंती लघुपट पाहण्यासाठी –
[Shevanti] https://www.mxplayer.in/detail/shorts/c91e1c21f692f352275cdef2039938e0?utm_source=mx_android_share