श्रध्दा कपूरच्या ड्रायव्हिंगच्या आनंदाचे निमित्त झालेय…
राजकुमारची तर्हाच वेगळी होती. वरळी सी फेसवरील आपल्या बंगल्यावरुन तो उघड्या जीपमधून तो स्वतःच ड्राईव्ह करत कधी कुलाब्यातील क्लबला जाई तर कधी मुंबई उपनगरातील स्टुडिओत जाई. त्या काळात उपनगरात फ्लायओव्हर उभे राहिले नव्हते, त्यामुळे सतत सिग्नल लागत आणि पूर्व पश्चिम करताना रेल्वेमार्गावरील फाटकावर थांबावे लागे. तेव्हा चक्क राजकुमार जीपमधून उतरुन जीपला टेकून उभा राही आणि त्याच्या या रुबाबदार स्टाईलचे बघ्यांना कौतुक वाटे. प्रेमनाथचीही हीच खासियत होती. पडद्यावरच्या प्रतिमेत ते जणू प्रत्यक्षात वावरत.
सुरेश ओबेरॉय (Suresh oberoi) ‘अर्धा राजकुमार’ म्हणून ओळखला जाई. तो जुहूला इस्काॅनजवळ राही आणि तोही असाच उघड्या जीपमधून ये जा करे. प्रेमनाथ, सुरेश ओबेरॉय यांना अशा उघड्या जीपमधून प्रवास करताना त्या काळात मुंबईकर बघत. वांद्र्याच्या समुद्र किनाऱ्यावरील कार्टर रोडवरील आपल्या आशीर्वाद बंगल्यातून राजेश खन्नाची इम्पाला कधी बाहेर पडतेय आणि त्याचे ओझरते दर्शन घडतय यासाठी त्याचे चाहते तासन तास वाट पहात. तो ही जणू एक आनंद सोहळा असे आणि त्याच्या गाडीने उडणारा धुरळा आपल्या कपाळावर लावण्याचंही काहीना वेड होते आणि त्याची गाडी स्टुडिओत शिरताच त्या गाडीचे चुंबन घेणाऱ्याही त्याच्या फॅन्स होत्या.
सेलिब्रिटीज आणि त्यांच्या गाड्यांचा मुंबईतील प्रवास हा एक प्रकारचा कधीही न संपणारा प्रवास आहे. यात अनेक प्रकारची वाहने आहेत ( मुक्ता बर्वे मुंबईत नवीन होती तेव्हा काही कामांसाठी सायकलने जाई. नेहा महाजन, सोनाली कुलकर्णी यांनाही सायकल प्रिय आहे.) वाहनांचे प्रकार अनेक म्हटल्यावर त्यात व्हॅनिटी आलीच. चित्रपटसृष्टीत शूटिंग स्पाॅटवर व्हॅनिटी आणण्याचे श्रेय पूनम धिल्लाॅनला जाते. जवळपास पस्तीस वर्ष झाली देखिल. त्याच वेळेस दिग्दर्शक मनमोहन देसाई व अमिताभ बच्चन यांची अगदी सेम टू सेम व्हॅनिटी होती. अंधेरीतील नटराज स्टुडिओत या दोन्ही व्हॅनिटी एकदम दिसल्या तेव्हा येथे ‘गंगा जमुना सरस्वती‘ या चित्रपटाचे शूटिंग असणार याची खात्रीच पटली. आमच्या गिरगावातील खेतवाडीतील प्रताप निवासजवळ व्हॅनिटी दिसली की समजावे मनमोहन देसाई घरीच आहेत.
हे आजच का सांगतोय, तर अशी ही ‘सेलिब्रिटीजच्या गाडीची गोष्ट ‘ आता दक्षिण मुंबईतील काॅस्टल रोडपर्यंत आली आहे. अमिताभ बच्चनने तसा प्रवास करत ट्वीट केल्यावर उलटसुलट चर्चाही झाली. श्रध्दा कपूरने ही आपल्या मित्रासोबत रात्री खूप उशीरा याच मार्गाने प्रवास करत सोशल मिडियात पोस्ट करत म्हटलयं, लेट नाईट ड्राईव्ह का प्यार और बढ गया. नये कोस्टल रोडने तो दिल ही जीत लिया….अर्थात सेलिब्रिटीजच्या पोस्टवरुन बातमी होण्याच्या डिजिटल मिडियात याचीही बातमी झालीच (पोस्ट करण्यामागे तो ही हेतू असतोच म्हणा) श्रध्दा कपूरने डेनिम जॅकेट घालून हा मनसोक्त मनमुराद प्रवास केला हे विशेष. अशा आनंदातूनच काम करण्यासाठी भरपूर एनर्जी मिळत असते. आनंदासाठी दहा वाटा आहेत. (Suresh oberoi)
=========
हे देखील वाचा : ‘प्रेम त्रिकोणा’ची गोष्ट, माधुरी दीक्षित हुकमी प्रेयसी
=========
श्रध्दा कपूरचे पिता शक्ती कपूर यांची तर्हाच वेगळी होती. काही वर्ष त्याचीही व्हॅनिटी होती. विशेष उल्लेखनीय गोष्ट त्यात चक्क छोटासा बार होता आणि यावरुन एका प्रथितयश इंग्लिश साप्ताहिकाने फोटोसह कव्हरेज दिले होते. सेलिब्रिटीजच्या गाड्यांच्या गोष्टी, प्रवासाचा आनंद या गोष्टी मग मैलोन्मैल चालणारा प्रवास आहे. लोकल ट्रेनपासून ते नवीन माॅडेलच्या गाडीपर्यंत आणि सेकंड हँड गाडीपासून ते कोणाची तरी लिफ्ट घेण्यापर्यंत तो चौफेर आहे….. गोष्ट छोटी वाटते पण काही कलाकारांनी कारकीर्दीच्या दहा बारा वर्षांनंतर आपल्या मिळकतीतून स्वतःची गाडी घेतलीय तर काही सेलिब्रिटीज वडिलोपार्जित गाडी चालवतच या मनोरंजन क्षेत्रात आले….